इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
धरित्रीच्या लेकी : अपूर्वा आणि आदिती संचेती
आजकाल 10 वी किंवा बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चांगल्या करियरचे पर्याय काय काय असू शकतात, याबद्दल विविध कार्यशाळा, व्याख्याने आयोजित केली जातात. पण, या करिअरच्या पर्यायांमध्ये शेतकरी व्हा असा पर्याय कधी दिसला का हो? कारण स्वेच्छेने किंवा स्वखुशीने शेतीसारखा कष्टाचा पर्याय आयुष्यभरासाठी करिअर ऑप्शन म्हणून निवडणारे तरुण अगदी बोटावर मोजता येण्यासारखे असतात. त्यात सुशिक्षित मुली तर क्वचितच असा पर्याय निवडतात. हा पर्याय बऱ्याचदा तरुणाईवर पिढीजात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून लादला गेलेला असतो. शेतीसारख्या निसर्गावर आधारित बेभरवशाच्या उत्पन्नावर आजची तरुणाई त्यांचं आयुष्य पणाला लावू इच्छित नाही. परंतु अपूर्वा आणि आदिती संचेती या भगिनींची स्वप्नच वेगळी होती. आज याच दोघींविषयी आपण आज जाणून घेऊया..
कोणत्याही प्रकारची शेतीची पार्श्वभूमी नसताना, शेतीबद्दल ज्ञान अवगत नसताना, तसेच शेतीसाठी पिढीजात जमीन उपलब्ध नसताना या दोन भगिनींनी भविष्यात शाश्वत विकासाचा मार्ग निवडला आणि भविष्यात शेतीमध्ये रमण्याचं ठरवलं. ज्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे, अशा या तरुण ,तडफदार धरित्रीच्या लेकी, अपूर्वा आणि आदिती संचेती. अत्यंत धडपड्या अशा ह्या दोन मुली. लहानपणी सतत काहीतरी नवनवीन उपक्रम करत असत, यामुळे सगळ्यांसाठी त्या खूप कौतुकाचा विषय होत्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झालेलं असलं तरी त्यांना ओढ मात्र आपल्या मातीची होती. अपूर्वा आणि आदिती संचेती यांना शेतीबद्दल अतिशय कुतूहल होतं आणि लवकरच त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचा निर्णय जाहीर केला की त्या दोघी फक्त शेती करणार आहेत. लहानपणी झालेल्या वेगळ्या जडणघडणी मुळे, त्यांची आई कल्पना यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच घरातच गांधीजी आणि विनोबांचे संस्कार असल्याने “खेड्याकडे चला” या उक्तीनुसार त्यांच्या घरातच साधी राहणी, स्वावलंबन ,श्रमप्रतिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा या मूल्यांना खूप महत्त्व असे.
आपला विचार आणि आचार एक असला पाहिजे याकडे त्यांच्या आईचा विशेष कटाक्ष होता. मुळ हेतुपासून मुली भरकटालाय लागल्या की आई त्यांना पुन्हा मूळ विचाराकडे आणत असे. दोघी बहिणीमध्ये आदिती मोठी. 2007 मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयात तिने पदवी घेतली आणि संशोधन कार्याकडे वळली. त्यावेळी तीला असं जाणवलं की संशोधनासाठी जर कोणी निधी पुरवला असेल तर आपण त्यांच्यासाठी संशोधन करतो पण ते संशोधन जगण्याशी जोडला गेलं तर त्या संशोधनाचा उपयोग. आणि मग कालांतराने संशोधनाचा विचार मागे पडला. आदिती बीएससी झाल्यानंतर एमएससी करत असताना अन्नमलाईच्या जंगलात ती एका प्रकल्पात सहभागी झाली होती आणि त्यावेळी अर्थपूर्ण, शाश्वत जीवन जगण्याच्या विचाराने उचल घेतली. त्यानंतर मग जर्मनीमध्ये वाईल्ड लाइफ कन्सर्वेशन सोसायटीच्या कोर्सच्या निमित्ताने एका पक्षी अभ्यासकांच्या परिषदेसाठी जाण्याची तिला संधी चालून आली. मोठमोठ्या पक्षीअभ्यासकांच्या सानिध्यात राहायला मिळालं परंतु, तिथे फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात होता. प्रत्यक्ष पक्षीसंवर्धनासाठी कृती करायला मात्र कोणी धजावत नव्हतं. त्याच वेळी क्रिश्चन लेफर्ट नावाच्या एका गृहस्थाकडे त्यांना जाण्याचा योग आला. ही व्यक्ती म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात कमीत कमी साधनांच्या साह्याने कसे राहता येईल ह्याचं उत्तम उदाहरण होती. त्यांचं घर, जगणं सगळंच निसर्गस्नेही होतं. जर्मनीत राहात असून स्वतःचं वाहन नव्हतं.
शुद्ध शाकाहारी जीवनशैली होती. उपजीविकेचे साधन म्हणून हॉटेलच्या कामासाठी दिवसाचे चार तास आणि उरलेल्या वेळात आवडीचं काम म्हणजे ते शेती करत असत. तिथे गेल्यावर त्यांच्या सान्निध्यात तिला जाणवलं की आपल्याला हेच करायचे आहे आणि असंच तर जगायचं होतं. त्यानंतर मात्र शेती करण्याचा निर्णय पक्का झाला. शेतीचा प्रत्यक्ष अनुभव नसल्याने अनेकांना भेटून, त्यांच्याकडून माहिती घेऊन, चर्चा करून तसेच प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांच्या सानिध्यात राहून सगळं शिकून घेणं असा सगळा दिनक्रम चालू झाला. त्याच काळात अदितीने पर्यावरण शास्त्रात एमएससी देखील पूर्ण केलं. अपूर्वानेदेखील सुरवातीला दहावी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने भारतातल्या अनेक वेगळ्या विचारांच्या शाळांना भेटी दिल्या.
एक वर्षाची सुट्टी घेऊन अशा अनेक शाळांमध्ये ती राहून आली. पण या शाळांमध्ये जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टी मात्र कुठेच शिकवल्या जात नाहीत हे तिच्या लक्षात आलं. विद्यार्थ्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असं प्रकर्षाने तिला जाणवू लागलं आणि मग कालांतराने ताईबरोबरच शेती करण्याच्या निर्णयावर तीही ठाम झाली. दोघी बहिणी जिद्दी, धडाडीच्या,कष्टाळू आणि प्रयोगशील. आपण नुसती शेती करून उपजीविका करता येईल का अशी शंका वाटल्याने मग कोणकोणते पूरक उद्योग शेतीसोबत करता येतील याचा दोघींनी अभ्यास केला. शेती करण्याचा निर्णय पक्का झाल्यावर पुण्याजवळच्या सणसवाडी गावात त्यांनी दोन एकर पडीक जमीन विकत घेतली. मातीचा कस वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आणि तिथेच त्यांची जीवन कार्य शाळा सुरू झाली.
चार वर्षे रात्रंदिवस राबत त्यांनी पडीक आणि निकृष्ट जमीन शेतीसाठी तयार केली. घराजवळच्या भाजी विक्रेत्यांकडून ओला कचरा गोळा करून तो पोत्यात भरून शेतावर न्यायचा. तिथे त्या मातीवर पसवयचा. कोणत्याही प्रकारच्या कष्टाची लाज नव्हती. पुण्यापासून जवळ असल्याने पहिले तीन चार वर्ष त्या घरी राहून ये-जा करत होत्या पण, त्यामुळे शेतीकडे लक्ष देता येत नव्हतं. मग त्यांनी शेतातच घर बांधायचं ठरवलं. शेतात मातीचं निसर्गस्नेही घर बांधून राहू लागला राहू लागल्या. मातीच्या घरात राहणं हे खरंतर त्यांचं स्वप्नच होतं. त्यामुळे उलट त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सुरुवातीला गावातल्या नातेवाईकांनी या मुलींच्या शेतीच्या निर्णयावर कुचेष्टा केली. एवढ्या चांगल्या शिकलेल्या मुली शेती का करतात हा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जाई. अपूर्वा आणि आदिती यांना त्यांच्या आई-बाबांची मात्र या निर्णयात पूर्ण साथ मिळाली.
दिवसभर त्या स्वतः शेतात काम करतात. गावातल्या लोकांशी विशेषता महिलांशी चांगला संवाद साधतात. हळूहळू गावातल्या लोकांचा, नातेवाईकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे पूर्णवेळ शेती सुरू केल्याने त्यांनी पहिल्याच वर्षी शेतात गहू, तांदूळ,हरभरा,वाटाणा यासारखी अनेक पिके घेतली तसेच दुधी, दोडका, कारले, मुळा, भेंडी यासारख्या अनेक भाज्या पिकवल्या. एकाच वर्षात एवढी सगळी पिकं आली हे पाहून त्यांना फार फार कौतुक वाटू लागलं. त्यांचा कामाचा हुरूप वाढला.या सर्व कामात त्यांनी एकही मजूर लावलेला नव्हता. फक्त नांगर भाड्याने आणला होता.बाकी सगळी कामं त्या दोघी स्वतः करत असत. स्वकष्टाने केलेल्या कमाईचा आनंदच काही वेगळा असतो.पण, जमाखर्चाचे गणित बसवण्यासाठी नुसत्या शेतीवर अवलंबून राहून उपयोग नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतीला इतर उत्पादनांची जोड दिली.
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू, , बाजरी यांचा दलिया, चटण्या,ठेपले, चिवडे, मोरावळा, करवंदाचं लोणचं,केशतेल,मसाज तेल यासारख्या उत्पादनांमार्फत त्या जोडउद्योग करू लागल्या. कालांतराने त्यांना फळझाडांच्या लागवडीतुनही बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागलं. जमिनीत देशी वृक्ष, अनेक फळझाडे लावल्याने फळझाडांचेसुद्धा बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागलं. शेतासाठी खत आणि स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गोबरगॅस आहे तसेच साधी चूल, सराई कुकर, सूर्यचूल या नैसर्गिक गोष्टी सर्रास वापरल्या जातात.शेतीच्या जोडीला अनेक कुटीरोद्योग त्या करत असतात. सेंद्रिय शेतीला आता बरीच वर्ष पूर्ण झाले आहेत. पर्णकुटी हा त्यांचा पूर्णपणे नैसर्गिक उत्पादने असलेला ब्रँड आहे. ह्या ब्रँड खाली तयार पीठं, ओले कडधान्य, चटण्या,आवळा सरबत, नैसर्गिक रित्या पिकवलेले काजू, तेल, गूळ पापड्या अशी अनेक उत्पादनं तयार होत आहेत. हळूहळू आदिती आणि अपूर्वा एक उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या आहेत.
अपूर्वा म्हणते,” शेती एक जीवन शैली आहे. जी निसर्ग आणि माणसाला जोडते. प्रत्यक्ष शेतीतून मिळणारा अनुभव मनुष्य जीवन समृद्ध करणारा असतो. शेती करणं हे सोपं नाहीये पण, विकत घ्या, वापरा आणि फेका ही विचार पद्धती बदलवण्यासाठी हा अनुभव नक्कीच कामी येतो”. कुतूहलाने त्यांचं काम बघायला येणाऱ्या, शिकू पाहणार्या लोकांसाठी त्या कार्यशाळा घेतात. तिथे त्यांची राहण्याची सोय देखील केलेली आहे. निसर्गस्नेही जीवन शैली जगण्याचं यशस्वी उदाहरण म्हणून अपूर्वा आणि आदिती संचेती यांच्याकडे तरुण पिढीने बघायला हरकत नाही. नेहमीच्या सरधोपट मार्गाने करिअर करणाऱ्या केवळ मान प्रतिष्ठा, पैसा या अशाश्वत गोष्टींच्या मागे लागून प्रसंगी नैराश्याकडे ओढल्या गेलेल्या तरुण पिढीला आदिती आणि अपूर्वा या शाश्वत मूल्य जपणाऱ्या, निसर्गस्नेही , मातीशी इमान राखणाऱ्या तरुणी आदर्श ठराव्यात.“
माती न जपणारा देश जगू शकत नाही” हे जॉर्ज वॉशिंग्टन यांचं वाक्य आज आपल्याला त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती देतं. काळी आई म्हणत मातीचं कौतुक केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही,तिला जीवापाड जपावं लागतं. त्यासाठी उनपावसाची पर्वा न करता राबणारी तरुणाई आज शेतीकडे वळायला हवी. जास्तीत जास्त जोड उद्योगांची उभारणी करून, शेतीत संशोधनाची कास धरून शेतीला आधुनिकतेकडे वळवणारी तरुणाई पुढे आली पाहिजे.तरच पुन्हा एकदा शेतीला पूर्वीप्रमाणे सन्मानाचा पर्याय म्हणून स्वीकारलं जाईल.