इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री
डाऊन टू अर्थ : अनिल अग्रवाल
आजकाल समाजात पर्यावरण विषयाबद्दल बर्यापैकी जनजागृती होत आहे. पर्यावरण हा विषय शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आलेला आहे. परंतु, तीस-चाळीस वर्षांपूर्वी जरी पर्यावरण ही संकल्पना सर्वदूर पोहोचलेली नव्हती किंवा पर्यावरण विनाश याबद्दलच्या वाद-विवादाचा मागमूस देखील नव्हता तरी त्यावेळीदेखील देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळासारख्या समस्या मात्र होत्या,तेव्हाही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण हिंडावे लागत होते, अन्नधान्याचे दुर्भिक्ष होते. अशा वेळी इंग्रजी नियतकालिकांमधून पर्यावरणावरील लेखन वाचायला मिळू लागलं ते अनिल अग्रवाल यांच्यामुळे. ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ या उक्तीप्रमाणे त्यावेळच्या राजकीय पक्षांना पर्यावरण या विषयावरून धारेवर धरणारे ते एकमेव.
भारतामध्ये 1990 च्या दशकापर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी अनेक चळवळी होत होत्या. परंतु पर्यावरणाला वाहिलेलं असे एकही नियतकालिक निघत नव्हतं. पर्यावरण हा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात वारंवार येऊ लागला होता परंतु ही माहिती सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचत नव्हती.मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रात सुद्धा पर्यावरण प्रश्नांना अतिशय तोकडी जागा दिलेली असायची. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी अग्रवाल यांनी 1992 मध्ये ‘डाऊन टू अर्थ’ या पहिल्या विज्ञान आणि पर्यावरणाला वाहिलेल्या पाक्षिकाची सुरुवात केली. दुष्काळाच्या करून कहाण्यांसोबत दुष्काळ का आणि कसा येतो? मातीची धूप झाल्याने वाळवंट कसं होतं? त्याचे काय परिणाम भोगावे लागत आहेत? यावर प्रकाशझोत टाकण्याचा त्यांचा कटाक्ष होता.भोपाळमधील वायुगळतीने केलेला संहार या घटनेचा आजतागायत डाऊन टू अर्थ पाठपुरावा करत आहे. शालेय विद्यार्थ्यांकरिता पर्यावरणाला वाहिलेलं गोबर टाइम्स हे द्वैमासिक डाऊन टू अर्थ तर्फे मोफत दिला जातं.
“गाव असो की देश किंवा जग,सर्व पातळ्यांवरील सामुहिक जीवनात पर्यावरणाची लूट करून धनाढ्य अधिक धनवान होत जातात.पर्यावरणाचे दारिद्र्य गरिबांची हलाखी वाढवतं.” हे अनिल अग्रवाल यांच्या लेखनातून स्पष्ट होत जातं. पर्यावरणाच्या प्रश्नांना राजकारणात प्राधान्य मिळाले पाहिजे याबाबत ते नेहमी आग्रही असत. राजकीय पक्षांना पर्यावरणाच्या समस्यांबाबत किती गांभीर्य आहे याचा ते सतत आढावा घेत. ज्यांच्या जाहीरनाम्यात पाण्याचा प्रसार दिसत नाही अशा पक्षांना ते बिनदिक्कत फटकारत असत.त्यांच्या ‘डाऊन टू अर्थ”या पाक्षिकाच्या माध्यमातून अग्रवाल यांनी अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचं पर्यावरणाच्यादृष्टीने मूल्यमापन केलं.
निष्कर्ष असा निघाला की, ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाचा मुद्दा हाती घेतला त्यांना लोकांनी पुन्हा पुन्हा सत्ता दिली. ते नेहमी म्हणत,” सर्व क्षेत्रातील सत्प्रवृत्तींनी एकत्र येऊन सर्व राजकीय पक्षांवर धाक ठेवला पाहिजे आणि त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. सखोल माहितीचं सॉफ्टवेअर लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना पर्यावरणाच्या दृष्टीने राजकीय कृती करण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे.” त्यांच्या लेखनात त्यांनी पर्यावरण आणि विकासाशी संबंधित प्रत्येक मुद्यावर आपली मतं मांडली.
अनिल अग्रवाल हे कानपूर येथील रामसेवक आणि कृष्णाबाई अग्रवाल यांचे धाकटे अपत्य. अनिल दोन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.कृष्णाबाई पारंपारिक असल्या तरी त्यांनी लहानपणीच त्यांना बजावून ठेवले होते की तू कसाही असला तरी मला चालेल पण खोटारडेपणा, दांभिकपणा यापासून कायम दूर रहा.कसलाही मुखवटा चढवू नकोस आणि माझ्यापासून काही लपवू नकोस. आईचे हे संस्कार त्यांनी पुढील आयुष्यात कायम पाळले. अनिल कुठल्याही भयापासून मुक्त होते. दांभिकतेचा स्पर्श त्यांना झाला नाही. कठीण, विपरीत परिस्थितीतदेखील त्यांचा आत्मविश्वास तगडा होता. पाच फुट दोन इंच इतकी बेताची उंची असलेले कित्येक जण न्यूनगंडाने पछाडलेले असतात पण अनिल मात्र खेळ असो वा वाद-विवाद सगळीकडे सहभागी व्हायचे. बॅडमिंटन चॅम्पियनशिप त्यांच्याकडे कायम असायची.
कुठल्याही विषयाची नेमकेपणाने मांडणी करणाऱ्या अनिल यांनी वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत ही आघाडी कायम ठेवली. 1970 साली कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. सत्तरच्या दशकात पर्यावरणाचे प्रश्न जगासमोर येऊ लागले होते.सायलेंट स्प्रिंग ह्या पर्यावरण आणि विज्ञानसंबंधित पुस्तकाने त्यांना अक्षरशः पछाडलं. त्या पुस्तकाची अगदी त्यांनी पारायण केली आणि मग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजातील सर्वसामान्यासाठीच करायचा हे उद्दिष्ट अग्रवाल यांनी आय आयटी ची पदवी घेऊन बाहेर पडताना ठरवून टाकलं. अनिल अग्रवाल गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांच्यावर ती गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. आपण आपला देश धड पाहिलेला नाही याची त्यांना खंत वाटायची. ग्रामीण भाग व तिथले स्थानिक तंत्रज्ञान, कौशल्य आणि समस्या आधी समजून घेतल्या पाहिजेत. तरच देशाचा विकास होऊ शकतो. ते हिंदुस्तान टाईम्समध्ये विज्ञान पत्रकार म्हणून रुजू झाले.
1972 ला स्टोकहोम येथील जागतिक पर्यावरण परिषदेला उपस्थित राहण्याची अग्रवाल यांना संधी मिळाली. विज्ञान पत्रकारिता करताना अनिल अनेक वैज्ञानिक संस्थांना भेट देत असत व वैज्ञानिकांशी चर्चा करून बातम्या तयार करत असत.त्यावेळी भारतात पर्यावरणवाद हा केवळ झाडे लावा, फारतर प्राणी वाचवा याभोवती घुटमळत होता. सोशलवर्क करतोय हे दाखवण्यासाठी उच्चभ्रू वर्गाची ती एक फॅशन होती. या संकुचित पर्यावरणवादाला समग्र करण्याचे कार्य अनिल अग्रवाल यांनी केले.माणूस हा त्यांच्या साठी कायम केंद्रस्थानी राहिला. 1982 साली देशातील पर्यावरणाचे हाल दाखवणारा त्यांचा पहिला अहवाल प्रकाशित झाला. पर्यावरणाच्या वाईट अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करून तातडीने सुधारणेचा आग्रह धरला आणि तो अहवाल त्यांनी चिपको आंदोलन करून वृक्षतोड रोखणाऱ्या झुंजार महिलांना त्यांनी अर्पण केला.
दुर्दैवाने अनिल अग्रवाल यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी कॅन्सरने गाठलं. परंतु, कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करत असतानादेखील त्यांचे कार्य अखंड चालूच होते. वेळ खूप कमी आहे, कामं मात्र भरपूर बाकी आहेत या जाणिवेने डाऊन टू अर्थ या त्यांच्या पाक्षिकासाठीसाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. घराबाहेर पडल्यानंतर शहरातील वाहनांच्या धुराचा त्यांना भयानक त्रास होत असे. अस्थमा सुरू झाला की रात्र रात्रभर जागरण करावे लागे पण, त्यातूनही थोडं बरं वाटलं की ते पुन्हा प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज होत. सतत सात वर्षे मृत्यूची लपंडाव करत असताना ते म्हणतात,” थांबणं हेच मरण, चालत रहावं, शिकत रहावं,हा जीवनाचा अर्थ मृत्यूच्या सानिध्यात मला प्रकर्षाने जाणवायचा आणि मरणाच्या जाणिवेतून मला पुढच्या कामाला लागणारा उत्साह आणि उर्जा मिळायची.”
मिळेल तेवढा वेळेचा उपयोग करून अनिल अग्रवाल तडफेने काम करत राहिले आणि अखेर 12 जानेवारी 2002 रोजी 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटचा श्वास घेण्याच्या तीस मिनिटे आधी माशेलकर समितीच्या इंधनविषयक अहवालावर त्यांच्या सहकारी सुनीता नारायण यांनी केलेल्या चिकित्सक टीकेवर त्यांनी सुधारणा सुचवल्या होत्या. पुढील पिढी तरी प्रदूषण मुक्त वातावरणात वाढावी यासाठी त्यांची अखंड तळमळ होती. पर्यावरण दुर्लक्षित असल्यामुळे सर्वसामान्यांची कशी परवड होते? दररोज कित्येक बळी जातात? निसर्गाला कोण आणि कसं नाचवतं? पर्यावरणाची लूट का आणि कशी होते? त्याची फळ कोणाला आणि कशी भोगावी लागतात? याचा अग्रवाल यांनी समग्र आणि चिकित्सक इतिहास भारतीय जनतेसमोर आणला. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व सामान्य जनतेला पर्यावरणाच्या लढ्यात सामील करून घेण्याचं ऐतिहासिक कार्य अग्रवाल यांनी केलं.
पर्यावरणविषयक जाणीव समृद्ध करणारे 20 ग्रंथ, डाऊन टू अर्थ हे पाक्षिक आणि सामान्य माणसांचे हित जपण्याकरिता संशोधन करणारी 200 तज्ञांची ‘सेंटर फॉर सायन्स आणि इनवायरनमेंट’ ही संस्था एवढा ठेवा अग्रवाल मागे ठेवून गेले. ते म्हणत,”गांधीजी गेले आणि असंख्य जण पोरके झाले.” पण त्याचं कार्य अखंड चालू रहावं या तळमळीने त्यांच्या पश्चात सुनीता नारायण आणि सहकाऱ्यांनी त्यांचे कार्य तसेच चालू ठेवले आहे. कालांतराने एकापाठोपाठ एक अशा अनेक संस्था लयाला जात राहतात पण सेंटर फॉर सायन्स आणि एनवायरनमेंट ने मात्र त्यांचा रौप्यमहोत्सवदेखील साजरा केला. अग्रवाल यांनी दिलेली तळमळ उरात बाळगून आज ह्या संस्थेला जागतिक पातळीवर देखील दाद मिळाली आहे. अनिल अग्रवाल यांची ज्ञानाची आस अखेरपर्यंत कायम होती. प्रत्येक कामात सर्वोत्तमतेचा त्यांना ध्यास होता. प्रदूषण, दुष्काळ, पूर, पाणी, जमीन या अशा अनेक समस्या नैसर्गिक नाहीत तर त्या मनुष्याच्या बेफिकीर वृत्तीचे द्योतक आहेत. प्रत्येक वेळेला टोकाची पर्यावरण वादी भूमिका घेऊन समस्यांविरुद्ध न लढता विवेकी पर्यावरणवादाची कास धरणे गरजेचे आहे हे अनिल अग्रवाल यांच्या भूमिकेतून अधोरेखित होते.