शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री – खलनायकामागचा नायक : सयाजी शिंदे

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 19, 2022 | 9:45 pm
in इतर
0
EbWQ4vKVcAIbdpA

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्ग यात्री –
खलनायकामागचा नायक : सयाजी शिंदे

कोणत्याही क्षेत्रातला कलाकार हा आधी एक संवेदनशील माणूस असावा लागतो. संवेदनशीलता हा कलाकाराचा आत्मा असतो. अशीच संवेदनशीलता जपत ओसाड माळरानावर देवराई फुलवणारा अभिनयाचा बादशहा, चित्रपटसृष्टीतला खलनायक परंतु खऱ्या आयुष्यातला सच्चा नायक म्हणजे सयाजी शिंदे.

Smita Saindankar
स्मिता अनिल सैंदानकर
मो. 9423932203

खरंतर, सयाजी शिंदे हे नाव घेतलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो एक रांगडा, निष्ठुर आणि विक्षिप्त असा खलनायक. पण,सयाजी शिंदे हे भारतीय चित्रपट सृष्टीतले अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांनी केवळ हिंदी किंवा मराठीच नव्हे तर, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम,इंग्रजी, गुजराती,भोजपुरी अशा अनेक भाषिक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट भूमिका केल्या. स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. उत्कृष्ट अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य आहेच परंतु, वरवर अत्यंत कठोर दिसणारं हे व्यक्तिमत्व मनाने मात्र अत्यंत हळवं आहे, संवेदनशील आहे. ते म्हणतात,” या जगात दोनच व्यक्ती अशा आहेत ज्या आपल्याकडून कोणत्याही परतफेडीची अपेक्षा करत नाहीत. एक आई आणि दुसरं झाड. आई आपल्या उदरात नऊ महिने बाळाला वाढवते, त्याला आकार देते मग, जन्म देते तर, झाडं जगायला ऑक्सिजन पुरवतात म्हणून जन्मानंतर आपण जगतो. बरं हे सर्व निस्वार्थ भावनेने करतात. त्यामुळे त्यांचे आपल्यावर ऋण आहे.” ह्या ऋणाची थोडीतरी उतराई व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिची बीजतुला केली आणि बीड मधील पालवनच्या डोंगरावरती दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. अथक संघटीत प्रयत्नांनी त्यांनी गावोगावी सह्याद्रीच्या कुशीत देवराई फुलवल्या.

सयाजी यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी नावाच्या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. मराठी भाषेतून कला शाखेची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नाईट वॉचमनची नोकरी केली. या सेवेदरम्यान त्यांनाअभिनयाची आवड लागली आणि मग तिथून सुरू झाला त्यांचा अभिनयाचा प्रवास. बहीणभावंडांचं मोठं , शेतकरी कुटुंब.गावात विजेचा पत्ता नाही. त्यांच्या जन्मानंतर जवळजवळ वीस वर्षांनी गावात वीज आली. त्यामुळे बालपण अत्यंत नैसर्गिक वातावरणात गेलं. निसर्ग हा बालपणापासूनच आयुष्याचा अत्यंत जवळचा भाग होता. त्यामुळे वीज, टेलीफोन, किंवा इतर कोणतीही आकर्षण नसल्याने गावात संत साहित्य सतत कानावर पडत असे.ओव्या, भजन, कीर्तन याचे संस्कार लहानपणापासून होते. तसेच, वडिलांचा वारसा म्हणून लहानपणापासूनच प्रचंड मेहनत करण्याची वृत्ती होती. त्यातूनच त्यांनी लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये एक कसदार,ताकदीचा कलाकार म्हणून नावलौकिक मिळवला.

भरपूर मानसन्मान, पैसा, प्रसिद्धी मिळवल्यानंतरदेखील आत्मिक समाधानाचा मार्ग हा नव्हे, हे त्यांना प्रकर्षाने जाणवू लागलं. समाजाचं, निसर्गाचं आपण काही देणं लागतो या भावनेने सयाजी शिंदे यांनी मग वृक्षसंवर्धनाचा मार्ग पत्करला. “आईच्या जवळ जेवढं मला सुरक्षित वाटतं तेवढंच, या झाडांच्या सान्निध्यात.” कदाचित सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांचे हे वेगळं रूप बऱ्याच जणांना माहिती नसेल. ते म्हणतात,” उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माणसं झाडांच्या शोधात असतात. एखाद्या ओसाड भागात असो किंवा शहरात असो,माणूस सावलीला पहिले झाड कुठे दिसतं का हे बघतो? चार करोडच्या गाडीतून फिरण्यापेक्षा किंवा आता असलेल्या इतक्या पैशातून काय खरेदी करायचं हा विचार करत बसण्यापेक्षा सकाळी लवकर उठून रानावनात फिरणं, आपण लावलेली झाड वाढताना बघणं, त्यांनाआलेली फळं, फुलं जवळून हाताळणं यासारखा आनंद दुसरा नाही. हा शाश्वत आनंद आहे. हा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एक वेळ माणसांवरचा विश्वास उडेल पण निसर्गावरचा विश्वास कायम राहिला पाहिजे.”

सयाजी त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसालादेखील वडाचे झाड भेट देत असत. हळूहळू कोणत्याही गावाची किंवा एखाद्या ठिकाणाची सीमा न बाळगता जिथे जिथे दुष्काळग्रस्त भाग असेल, त्या त्या ठिकाणी समविचारी लोकांनी एकत्र येऊन अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो झाडं आतापर्यंत वाढवली आहेत.झाडं नाही त्यामुळे पाऊस नाही अशी ठिकाणे शोधून तिथे देवराईसारखे प्रकल्प राबवले गेले. शेततळी बांधली. देवराईची सुरुवात त्यांनी त्यांच्या आईच्या हाताने पहिलं वडाचं झाड लावून केली आणि तिथून देवराईला सुरुवात झाली. कोणत्याही प्रकारच्या कामाचा गवगवा न करता, मोठेपणा न मिरवता कृती पूर्ण कार्यक्रम ते आखत गेले. देवराईत प्रामुख्याने देशी झाडे लावण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या झाडांचा आपल्या जमिनीला, पर्यावरणाला,जैवविविधता वाढायला आणि पर्यायाने आपल्या जगण्याला उपयोग होईल अशी झाडं लावण्याचा त्यांचा कटाक्ष असतो.

आज सह्याद्री देवराई एक निसर्ग पर्यटन केंद्र बनत चालले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी या ठिकाणी निसर्गप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते. काही दिवसांपूर्वी सह्याद्री देवराईला भीषण आग लागली. या आगीत जवळपास दोन एकरावरील 500 झाडं जळून खाक झाली. अतिशय दुर्दैवी घटना होती ही. कोविड काळात ऑक्सीजनचं महत्व किती आहे हे प्रत्येकानेच अनुभवलं आहे. ऑक्सिजन कधी आयुष्यात विकत घ्यावा लागेल अशी पूर्वी कल्पनाही कोणी केली नसेल परंतु, ती देखील वेळ मानवाने स्वतःवर आणली. नजीकच्या काळात तुमच्याकडची वृक्ष बँक जेवढी समृद्ध असेल तेवढे तुम्ही सर्वात जास्त श्रीमंत असाल कारण त्याने तुम्ही जगाल.

“झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ” या टॅगलाईनअंतर्गत सयाजी शिंदे यांनी जगातलं अनोखं पहिलं दोन दिवसीय “सह्याद्री देवराई वृक्ष संमेलन” बीड जिल्ह्यातल्या पालवनच्या डोंगरावरती भरवलं. या वृक्ष संमेलनाचे अध्यक्ष होते आपला राष्ट्रीय वृक्ष,वडाचं झाड. सयाजींच्या मते ,”गावातली मोठी व्यक्ती पावली की तिची अंत्ययात्रा निघते, शोकसभा होते. मग 200 वर्षाचं जुनं झाड, ज्याने आपल्याला 200 वर्ष ऑक्सिजन दिला, फळं दिली आयुष्यभर ज्या महापुरुषाने गावाला आधार दिला, सावली दिली, ते झाड पडल्यानंतर त्याची शोकसभा का होत नाही? या झाडांचे महत्त्व लोकांना कधी पटणार ? झाडांची शोक सभा झाली तर लहान मुलांनाही झाडाचे महत्व समजेल आणि ही प्रथा पडली पाहिजे.” खरंय जोपर्यंत आपण आपल्या वृक्षसंपदेचा आदर करत नाही तोपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांनादेखील त्याचं महत्व समजणार नाही.

वेदांमध्येदेखील पंचमहाभूतांशी मिळूनमिसळून वागायला शिकवले गेले आहे. नव्हे, परमेश्वरस्वरूप मानले गेले आहे. म्हणून सूर्याला सूर्यनारायण,धरित्रीला माता, वाऱ्याला वायुदेव, पाण्याला पर्जन्यदेव आणि आकाशाला विश्वब्रह्मांड म्हणून गौरवले गेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजेच कोणत्याही सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी तत्व आहेत. सूर्याचं तेज आणि ऊर्जा, पाणी, वायु रूपातून प्राणवायू, पृथ्वीरूपातून अन्नधान्य आदी सामग्री या सर्वांवर मानवी जीवन आधारलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण हेदेखील पंचमहाभूतांच्या पूजेसाठीच साजरे केले जातात. पुराणात एक श्लोक दिलेला आहे
अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दशाचिग्चिणीकं कपित्थबिलवामलकीत्रयं च पश्चाम्ररोपी नरकं न पश्येत् ।।
याचा अर्थ असा की, जो मानव एक पिंपळ, एक नींबवृक्ष,एक वड ,दहा चिंचवृक्ष, तीन कवठाची, तीन बेलाची,तीन आवळीची आणि पाच आंब्याची झाडे लावतो तो कधीच नरक पहात नाही. एका वृक्षाचे महत्व दहा पुत्रांएवढे आहे असेदेखील पुराणात म्हटले आहे. एक वृक्ष आपल्या पुढील पाच पिढ्यांना पुरेल इतकं देत असतो.छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील जंगल संपत्ती कमी होऊ नये यासाठी सरदारांना तशा सूचना देणारं आज्ञापत्र तयार केलं होतं.

सयाजी शिंदे यांच्यासारखे नामवंत जेव्हा समाजोपयोगी किंवा निसर्गोपयोगी अभियानामध्ये पुढे येतात, तेव्हा तळागाळातल्या लोकांपासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत हा संदेश पोहोचवणं सोपं जातं. नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे यांच्यासारखे दिग्गज कलाकार जेव्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी पुढे येतात त्यावेळी, त्या समस्येला एक नवीन आयाम मिळतो. लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत त्या समस्येची तीव्रता आणि व्याप्ती पोहोचवणं सहज सोपं होतं.या सेलिब्रिटींच्या शब्दाला तरुण वर्गामध्ये विशेष महत्त्व असतं. त्यामुळे तरुणाईपर्यंत या समस्या पोचववणं, त्यांना संघटित करणं हे या माध्यमातून सहज शक्य होऊ शकेल. प्रत्येक क्षेत्रातल्या सेलिब्रिटीने असा एकेक समाजोपयोगी मुद्दा जरी उचलून धरला तरी समाजामध्ये स्थित्यंतर घडायला वेळ लागणार नाही.

Column Nisarga Yatri Actor Sayaji Shinde by Smita Saindankar
Devrai

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – २० ऑक्टोबर २०२२

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नशा येणारा पदार्थ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - नशा येणारा पदार्थ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011