नाशिक जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक च्या उत्तर भागातील पूर्व पश्चिम जाणारी सातमाळा रांग. याच रांगेचे आणि तेथील मौल्यवान अशा जैविक विविधतेची आज आपण ओळख करुन घेणार आहेत.
सातमाळा या सह्याद्रीच्या उप रांगेने, भौगोलिकदृष्ट्या, हवामानदृष्टया या प्रदेशाचे दोन विभाग केले आहेत. आणि गंम्मत म्हणजे दोन्ही एकाच जिल्ह्यात मोडतात. ह्या कारणामुळे नाशिक जिल्हा, महाराष्ट्रात एकमेवाद्वितीय ठरतो. सातमाळा रांगेच्या वरील बाजूस म्हणजे उत्तरेला अर्धवाळवंटीय (Semi Arid) प्रदेश सुरू होतो तो थेट गुजराथ पर्यंत. राजस्थानात पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे. सातमाळा रांगेच्या खालील बाजूस म्हणजे दक्षिणेला दख्खनचे पठार (Deccan Platue)चालू होते ते पार आंध्र प्रदेशपर्यंत.
भौगोलिकदृष्ट्या सातमाळा रांग नाशिक आणि गुजराथ च्या सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील हातगड पासून सुरवात होते ते चांदवड पर्यंत येऊन ती तुटते. मग तशीच पुढे मनमाड पासून पुन्हा सुरू होऊन अंकाईच्याही पुढे जाते. हीच रांग चाळीसगाव जवळून सुरू होऊन थेट औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्यंत जाते,या भागाला अजिंठा रांग म्हणतात.
‘गुगल अर्थ’ सारखे जर विहंगावलोकन केले तर ही रांग म्हणजे जणू निसर्गाने काढलेली ठिपक्यांची रांगोळी ठरावी. यातील ठिपके म्हणजे छोटे छोटे डोंगर किंवा किल्ले आहेत. हातगड एका बाजूस आहे, पण कळवणच्या अभोण्या पासून अचला, अहिवंत, सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, बंड्या, धोडप, इखारा, लेकुरवाळा, हंड्या,कांचना,कोळधेर,राजधेर,इंद्राई आणि चांदवडचा चन्द्रेश्वर अश्या चक्क पंधरा छोट्यामोठ्या डोंगर रांग बघताना रांगोळीचीच कल्पना सुचते.
ह्यामधील निम्मे डोंगर तर समुद्रसपाटीपासून चार हजार फुटाची उंची गाठतात.सातमाळा रांगेला समांतर दोन उपरांगा सेलबारी आणि डोलबारी रांगा हे पण बागलाण चे वैशिष्ट्य आहे. प्रसिद्ध साल्हेर,मुल्हेर किल्ले,मांगी तुंगी सारखी प्रसिद्ध जैन शिल्पे ह्या भागत आहेत.
इंडिया दर्पण ने २० ऑक्टोबर २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ह्या भागात BNHS, साठ्ये कॉलेज, कॅमरिनो विद्यापीठाच्या संयुक्त टीमने शोधून काढली आहे. या वनस्पतींचे नाव इकॉनॉप्स सह्याद्रिकस (Echinops sahyadricus) असे आहे. ही वनस्पती सह्याद्रीच्या उत्तर भागातच डोंगर उतरणीवर सापडते. पांढरी चेंडूच्या आकाराची संयुक्त फुले असलेले हे झुडूप आहे.
आपला विषय जैवविविधतेचा आहे, त्याचा अभ्यास केल्यास हे दिसून येते की,नाशिकचा जो भाग सातमाळा रांगेच्या वरील बाजूस आहे,तो बागलाण किंवा सटाणा तालुका हा त्याच्या वेगळ्या हवामानामुळे प्रसिद्ध आहे. थंडीत जाम थंडी आणि उन्हाळ्यात अतिशय कोरडे, कडक उन्हाचे तापमान, थोडी रेताळ जमीन, क्षारता युक्त पाणी असे नमुनेदार अर्ध वाळवंटीय वातावरणास सुरवात होते.
बागलाणच्या पश्चिमेस असलेल्या गोलवड पासून उगम पावलेली ‘मोसम’ ही येथील प्रमुख नदी आहे. मोसमवर हरणबारी येथे एक धरण बांधले आहे, त्यामुळे शेतीवाडीला खूप दिलासा मिळाला आहे. गेल्या वीस वर्षांत ताहाराबद, नामपूर पट्ट्यात डाळिंबाच्या बागशेतीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे आणि संपूर्ण जगात उच्च क्वालिटीची डाळिंबे निर्यात करण्यात हा पट्टा अग्रेसर बनत चालला आहे.
खरेतर मूळचे डाळिंब हे इराण आणि अफगाणिस्तानात पिकत असत. पण राहुरी कृषिविद्यापीठाच्या पुढाकाराने डाळिंब उत्पादनावर संशोधन केले गेले, नव्हे तर लखमापूरला डाळिंब संशोधन केंद्र स्थापन केले, आणि सततच्या प्रयत्ना नंतर, बागलाण मधील डाळिंब उत्पादन क्षमता वाढवली गेली आणि हे ठिकाण जगाच्या पाठीवर नावाजले गेले.आता संपूर्ण जगाच्या 81% डाळिंबे भारतात पिकवली जातात. त्यातील 62% महाराष्ट्रात बनवतात तर त्यातील 35% हिस्सा हा बागलाणचा आहे. भगवा,गणेश,आरक्त,मृदुला ह्या काही विशेष जाती लोकप्रिय ठरल्या आहेत.अजून वेगवेगळे संशोधन चालू आहेच.
डाळिंबाला इंग्रजीत पोमेग्रानेट (Pomegranate) असे म्हणतात. तर शास्त्रीय नाव आहे Punica Granatum. डाळिंबाचे झाड काटेरी ,कमी उंचीचे आणि खडकाळ,रेताळ जमिनीत येणारे ,कमी पाणी लागणारे असते. टिपिकल वाळवंटिय प्रकारातील. ह्या झाडाला नर आणि मादी प्रकारची दोन विभिन्न फुले एकाच झाडावर येतात. त्यामुळे परागीभवन वाऱ्यामुळे किंवा मधमाशी सारख्या किटकांमुळे होते.
बऱ्याच वेळेस फुले येऊन त्यांचे परागीभवन होत नाही,अश्या वेळेस हाताने कृत्रिम परागीभवन पण करता येते. डाळिंब हे फळ पित्तशामक तर आहेच. शिवाय पोटदुखी आणि जुलाबावर जालीम उपाय आहे. फळाचा रस मधुर आणि तुरट असतो. C जीवनसत्व असल्याने ह्या फळाला कोरोनाच्या काळात मागणी चांगली वाढली आहे. उत्तम आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या ह्या फळांच्या बागा सटाणा तालुक्यात वाढत चालल्या आहेत.
मित्रांनो सातमाळा रांगेच्या उत्तरेला डाळिंब आणि दक्षिणेला द्राक्ष पिकण्यासाठीचे अनुकूल वातावरण नाशिक जिल्ह्याला मिळाले आहे. पुढील लेखात आपण द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा कसा अग्रेसर ठरत आहे हे बघू या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!