बगळ्यांची दाट वस्ती – निर्मला कॉन्व्हेंट रोडवरील हेरॉनरी
नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या निर्मला कॉन्व्हेंट शाळेत चिमुरड्यांचा गलबलाट असतो. पण, याच परिसरात बगळ्यांची शाळाही भरते असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, आज आपण याच भागाची सफर करुन हे सर्व जाणून घेणार आहोत.
पावसाळा आला की आपल्याकडील स्थानिक पक्ष्यांची प्रजनन काळातील लगबग चालू होते. कावळा, चिमणी, दयाळ, चिरक, वटवट्या, शिंपी, मुनिया, साळुंकी, नाचरा आणि इतर यासारख्या आपल्या अंगणात किंवा परसबागेत दिसणाऱ्या पक्ष्यांची एकच धांदल उडालेली दिसते. ह्या काळात पक्षी जास्ती सक्रीय, vibrant, noisy झालेले दिसतात. पक्ष्यांची घरटे बांधणे, नराने मादीला आकर्षित करण्यासाठी केलेली प्रियराधना ( कोर्टशिप), अंडी उबवणे, पिल्लांचा जन्म, पिल्लांचे संरक्षण, पिल्लांचे स्वतंत्र होणे या सर्व क्रिया पावसाळ्याची सुरुवात ते पुढील २ ते ३ महिने चालू असतात. हा काळ पक्षी निरीक्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो.
आपण बऱ्याच प्रकारच्या डेटाचे कलेक्शन करून ठेवू शकतो. ह्या मध्ये पक्ष्यांच्या विविध हालचाली, खाद्य बदल, परस्पर समन्वयता (कोऑर्डीनेशन), बचाव, संरक्षण, शिकार आणि कित्येक गोष्टींची आपण परीक्षणे करू शकतो. काही पक्ष्यांमध्ये ह्याच काळात शाररीक बदल झालेले दिसतात. मुख्यत्वे करून नर जातीमध्ये. बगळ्यांना मानेवर तुरा येतो, पिसांचे रंग बदलतात, कोकिळला आवाज फुटतो, सूर्य पक्ष्याला खांद्यावर पिवळी पिसे येतात वगैरे वगैरे.
आपण ह्या लेखात बगळ्यांची घरटी आणि त्यांच्या प्रजनन काळातील सवयींची माहिती करून घेणार आहोत. आधी आपण बगळा या पक्ष्यांविषयी जाणून घेऊया. बक कुळातील पक्ष्यांना ‘बगळा’ हा सर्वसाधारण मराठी शब्द आहे. इंग्रजी मध्ये Egret, Heron, Bittern असे म्हणले जाते. तर हिंदी मध्ये ‘बगला’ असे संबोधले जाते.
पक्ष्यांच्या ह्या फॅमिलीला आरडीडाई (Ardeidae) असे नाव आहे आणि ह्या कुळात जगभरात जवळजवळ ७२ वेगवेगळ्या प्रजातींची नोंद होते. त्यातील प्रामुख्याने आपल्याकडे ८ ते १० प्रजाती विस्तृतपणे आढळतात. मोठा बगळा, मध्यम बगळा, लहान, बगळा, वंचक बगळा, रात बगळा, गाय बगळा, पिवळा आणि काळा रंगाची बिटर्नस, वेस्टर्न रिफ इग्रेट ह्या काही प्रजाती आपल्या भागत दिसतात. बगळा ह्या पक्ष्यांचे प्रमुख अन्न जलकीटक, जलप्राणी हे आहे. त्यात प्रामुख्याने सर्व प्रकारचे मासे, बेडूक, सर्प, खेकडे, मृदुकाय प्राणी, जलकीटक यांचा समावेश होतो. त्याचबरोबर, सरडे, सापसुरळी, कीटक, सर्प हे जमिनीवरील प्राणी पण बगळ्यांचे अन्न आहे.
बगळ्यांची घरटी, एकेका झाडावर दाट वस्तीने उभारलेली असतात. अगदी आपल्याकडच्या झोपडपट्टी सारखी. त्यामुळे झाडाखाली सारखा पक्ष्यांचा कोलाहल ऐकू येत असतो. आणि झाडाखाली पांढऱ्या विष्ठेचा सडा पडलेला दिसतो. अशा दाट वस्तीने असलेल्या बगळ्यांच्या नेस्टिंगला ‘हेरॉनरी’ असे संबोधले जाते. ह्या हेरॉनरी, सर्वसाधारणपणे स्थानिक व जुन्या वृक्षांवर, पाणथळ जागेच्या जवळ तसेच मानवी वस्तीला जवळ अशा आढळतात.
बाभूळ, आंबा, चिंच, शिरीष यासारखे मोठे पण जुने वृक्ष हेरॉनरीसाठी वापरले जातात. काही हेरॉनरी, कॉस्मोपोलिटीन असतात. म्हणजेच बगळ्यांबरोबर, पाणकावळे, चमचा, चित्रबलाक, मुग्धबलाक असे ही पक्षी घरटी त्याच झाडावर करतात. हे सगळे पक्षी मांसाहारी असल्याने झाडाखाली कित्येक वेळेस मासे, अर्धवट खाल्लेले मांसाचे तुकडे पडलेले असतात. तसेच मांसाहारी पक्ष्यांची विष्ठा पांढरी असते. हेरॉनरीमुळे त्यांना घरट्यावर कावळा, घार किंवा गरुडासारख्या शिकारी पक्ष्यांकडून हल्ला टाळता येतो. एका घरट्यावर हल्ला झाल्यास, त्याच्या मदतीला सगळे धावून येतात.
निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल रोड वर अशीच एक हेरॉनरी झपाट्याने वाढते आहे. जवळपास ७ ते ८ झाडांवर मिळून ५०० च्या वर घरटी आहेत. शेजारी दिलेल्या फोटोत तर, एक बाभळीच्या झाडावर २०० बगळ्यांची घरटी आहेत. गायबगळा आणि रातबगळा ह्या दोन प्रजाती एका झाडावर घरटी करताना आढळून आल्या आहेत. तर मोठा बगळा, लहान बगळा हे एका झाडावर घरटी करतात. अर्थातच हे एक निरीक्षण आहे. त्यात अभ्यास नाही.
गाय बगळ्याला प्रजनन काळात मानेवर तांबूस तपकिरी रंगाची पिसे येतात व पिल्लांची वाढ झाल्यावर परत हे बगळे पांढरे दिसायला लागतात. दिवसभर नर आणि माद्यांची पाणवठ्यावरून खाद्य आणून आपल्या पिल्लांना भरवायची चढाओढ लागलेली असते. रातबगळा मात्र दिवसा आराम करतो आणि संध्याकाळपासून रात्रभर पाणवठ्यावरून खाद्य आणण्याचे काम करत असतो. रात बगळा, गाय बगळ्यापेक्षा आकाराने मोठा असतो. पांढरे शुभ्र अंग, डोक्यावर काळा भाग तसेच डोळे लालबुंद असतात. त्यांच्या पिल्लांचा रंग मात्र प्रौढ होईपर्यंत काळसर रंगाच्या रेषा असतात. गाय बगळे घरटी बनवण्यात जास्त अग्रेसिव्ह असतात. त्यांची घरटी, भांडणात काही वेळेस खाली पण पडतात.
अशा हेरॉनरी प्रत्येक गावाच्याजवळ, पाणवठ्याच्या जवळ आपणास नक्कीच दिसतात. मे, जून ते पावसाळा संपेपर्यंत आपण ह्यांचे निरीक्षण करू शकतो. आपल्या नाशिकमध्ये सुद्धा अश्या अनेक हेरॉनरीज असतील त्यांची नोंद आपण घेऊ शकतो. भारतात केरळ राज्यात प्रचंड संख्येने हेरॉनरीज आहेत आणि त्याची गणना दरवर्षी केली जाते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!