पाण कावळा……मला अजूनही खूप आश्चर्य वाटते,की ह्या पाण पक्ष्याला कावळा का म्हणतात? फक्त रंग काळा म्हणून हा कावळा का? तसे तर कितीतरी पक्ष्यांचा रंग काळा असतो. पण ते सगळे कावळे असतात का? कावळ्याच्या इतर गुणधर्माशी याचे कोणतेही गुणधर्म जुळत नाहीत.बहुदा भक्ष्य पकडण्याच्या त्याच्या चतुराई मुळे त्याला कावळा असे संबोधले गेले असावे.
हा विषय आपल्या नाशिक जैवविविधतेच्या लेखमालिकेत घेण्याचे कारण म्हणजे ,दररोज सकाळी आणि संध्याकाळी ,गोदावरी नदीच्या वरून काही काळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे नित्यनेमाने गंगापूर धरणाच्या दिशेला जाताना व येताना दिसतात. कधी इंग्रजी V च्या आकारात उडतात तर कधी विस्कळीत रेषेत उडत जाताना दिसतात. सकाळी हे पक्षी धरणाच्या दिशेने तर संध्याकाळी धरणाच्या दिशेहून येताना दिसतात. हजारोच्या संख्येने, वेगवेगळ्या थव्याने ही क्रिया नित्य नेमाने ,सर्व ऋतूत चालू आहे. हे सर्व पक्षी, दुसरे कोणी नसून छोटा आणि मोठा पाणकावळा आहेत. मग प्रश्न उभा राहतो, की ही ये जा कशा करीता?
जलकाक असे हिंदीत नाव असलेल्या ह्या पक्ष्यास कॉर्मोरंट ( Cormorant) असे इंग्रजीत नाव आहे. हा पक्षी फॅलाक्रोकोरॅसीडी (Phalacrocoracidae) ह्या फॅमिली मध्ये मोडतो.ह्या फॅमिलीत 37 पाणपक्ष्यांची नोंद आहे. आपल्या भारतात, छोटा पाण कावळा आणि मोठा पाण कावळा हे सर्वत्र दिसतात.छोट्याचा आकार 50 सेमी. पर्यंत असतो तर मोठा 70 ते 80 सेमी. पर्यंत असतो. मोठ्या पाणकावळ्याची चोच मोठी असते व तोंडाला थोडी वाकलेली असते, शिकारी पक्ष्यांसारखी. ह्या मुळे त्यांना पाण्यात खोलवर जाऊन मोठे मासे पकडायला मदत होते. त्यामानाने छोट्या पाण कावळ्याची चोच छोटी आणि निमुळती असते. हे पक्षी जास्ती खोलवर जाता उथळ पाण्यावर माश्यांची शिकार करतात.
पाण कावळे हे अतिशय सराईत पणे पाण्यात पोहून मासे पकडतात आणि शिकार करतात. पाण कावळ्यांच्या पायाची बोटे जाड त्वचेने जोडलेले असतात,त्यामुळे पाण्यात पोहायला सोपे जाते. किंबहुना पेंग्वीन पक्ष्यांसारखेच, हे पाण पक्षी, पाण्यात खोलवर माश्यांची शिकार करण्यात तरबेज असतात. पेंग्वीन पक्षी उडू शकत नाहीत तर,हे पक्षी लांबवर उडू शकतात. मासा पकडला की मात्र ह्यांना तो पाण्याच्या वर आल्याशिवाय खाता येत नाही.मासा मिळाल्यानंतर तो काठावर किंवा पाणातल्या बेटावर घेऊन यायचा,मग हवेत उडवून ,माश्याच्या तोंडाच्या बाजूने गिळायचा हे मात्र ठरलेले. अश्याच पद्धतीने पाणकावळा आपली शिकार करतात व खातात.
नाशिक शहराच्या दृष्टीने विचार केला तर,हजारो पाण कावळ्यांना पुरेसे खाद्य फक्त गंगापूर धरणच देऊ शकते. त्यामुळे दररोज सकाळी आपल्याला हजारो पाणकावळे गंगापूर धरणाच्या दिशेने झेपावतात. पण ह्या पाण कावळ्यांची घरटी मात्र जुन्या झाडांवर असतात. त्यातल्या त्यात आंब्याचे,चिंचेचे झाड सगळ्यात आवडते. शिवाय एकत्र वस्ती करून राहायची सवय,त्यामुळे एवढ्या पाणकावळ्यांना सामावणारी आमराई, पंचवटीतल्या तपोवनच्या जवळ आहे, तिथे यांची घरटी सामावलेली आहेत. म्हणून दररोज संध्याकाळी, दिवसभराची शिकार झाल्यानंतर ,हे सर्व पाणकावळे आपल्याला गंगापूर धरणापासून पंचवटी कडे उडताना दिसतात.
शिकार झाल्यानंतर ,इतर पक्ष्याप्रमाणेच ह्या पक्ष्यांना विश्रांतीची गरज असते. विश्रांती ( Roosting/रुस्टिंग) घेताना सुद्धा ह्या पक्ष्यांची एक विशिष्ठ सवय असते. काठावर उभे राहून ,दोन्ही बाजुंनी ओले पंख पसरवून ,उन्हात किंवा वाऱ्यात वाळवत बसतात. हे चित्र दिसायला खूप मजेशीर आणि फोटोजेनिक असते. केरळ राज्यात काही मच्छिमार लोक ह्या पाण कावळ्याचा उपयोग मच्छिमारी साठी करतात.
समुद्रावर काही पकडलेल्या पाण कावळ्यांना घेऊन जातात व त्यांच्या पायाला दोरी बांधून पाण्यात सोडतात. पाण कावळे शिकार करून परत बोटीवर येतात,तेव्हा त्यांच्या तोंडातील मासे ,हे लोक पळवतात. हे कृत्य अत्यंत निसर्गविरोधी आहे. पण समुद्रात जाऊन पाहणार कोण? जस जसे तेथील वन विभागाच्या ,ही गोष्ट लक्षात येत गेली,तसतसे त्यावर अंकुश बसत जात आहे. असो, मानवाच्या ह्या निसर्ग ओरबाडण्याच्या वृत्तीला ,जागरूकतेनेच आपण आळा घालू शकतो.
नाशिक मध्ये पूर्वी खूप झाडी होती. गेल्या 20 वर्षात शहराचे विस्तारण्यासाठी हजारोंच्या संख्येने वृक्षतोड झाली. आता ज्या काही बाग,आमराया शिल्लक आहेत त्यांची जपणूक झाली नाही तर, पुढच्या दहा वर्षात ,पाण कावळ्यांसारख्या कित्येक पक्ष्यांचा,वटवाघुळांचा अधिवासात धोक्यात येऊन नाश पावेल याची भीती वाटत आहे. नाशिकच्या अश्या अनेक दुर्लक्षित बायो हॉटस्पॉटस ना ,आपण मुकणार तर नाही ना?
सर्व फोटो – मनोज जोशी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!