फार पूर्वी पासूनच भारतभूमी मसाल्यांच्या पदार्थ पिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण तेव्हा गरम मसाला म्हणजे लवंग,मिरे,हळद,दालचिनी,वेलदोडा आणि इतर यांच्या पिकांसाठी प्रसिद्ध होती आणि आहे ही. आपल्या हिंदू संस्कृतीतही कांद्याला दुय्यम स्थान दिले गेले होते. पण जसजसे विविध पदार्थांच्या पाककृती वाढत गेल्या तसतसे कांदा आणि लसूण यांचा वापर वाढतच गेला. भारतीय मांसाहारी पदार्थ तर कांदा आणि लसूण शिवाय बनूच शकत नाहीत.त्यातच अव्वल स्थान असलेल्या नाशिकचा कांदा त्याच्या, झणझणीत पणामुळे कसा प्रसिद्ध आहे त्या संबंधी आपण माहिती घेऊ या.
२०२० च्या आकडेवारीनुसार कांद्याचे (Cultivated onion) जागतिक वार्षिक उत्पादन 9.5 कोटी टन एवढे आहे. आणि हे उत्पादन सातत्याने वाढतच आहे. चीन आणि भारत ह्या दोन देशांमध्ये मिळूनच जगाच्या 50% कांदा उत्पादन होते. 2.60 कोटी टन कांद्याचे वार्षिक उत्पादन करणारा भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर चीन पहिल्या. त्यातील महाराष्ट्राचा वाटा आहे 75 लाख टन,तर नाशिक चा वाटा आहे जवळजवळ 50 लाख टन.
म्हणजे भारतात पिकवल्या जाणाऱ्या कांद्यातील,जवळजवळ 20% कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यातून पिकवला जातो. तर जगाच्या पाठीवरील तब्बल 5% कांदा हा एकट्या नाशिक जिह्यात पिकवला जातो, ही काही छोटी ओळख नव्हे. नाशिकचा लाल कांदा हा त्याच्या झणझणीत चवी (pungency taste) साठी सुप्रसिद्ध आहे.
खास करून देशांतर्गत व्यापार आणि परदेशातील मागणी मुळे नाशिकच्या कांद्याला गेल्या काही वर्षात चांगले दिवस आले आहेत. बांगलादेश,पाकिस्तान हे भारतीय उपखंडातील देश तसेच इराण ,सौदी अरेबिया ह्या आखाती देशांत नाशिकच्या कांद्याला सर्वात जास्त मागणी आहे.
द्राक्षाप्रमाणेच निफाड तालुका कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव येथे तर भारतातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राने तर येथे एक शाखा स्थापन करून कांद्यावर प्रक्रिया करून निर्यातक्षम उपत्पादनासाठी मोठी मदत उपलब्ध केली आहे. तसेच नॅशनल फलोत्पादन संशोधन व विकास फाउंडेशन (NHRDF) यांनी आपली एक शाखा लासलगाव येथे स्थापन करून कांदा आणि लसूण यांच्या विविध प्रजाती शोधून ,शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करून दिली आहेत.
आता कांदा ह्या वनस्पती पिकासंबंधी माहिती घेउया. जंगली कांदे खूप वर्षांपासून पृथ्वीवर असावेत,पण खाण्याच्या कांद्याची लागवड सुद्धा जवळजवळ सात हजार वर्षांपूर्वीची आहे. मध्य आशिया खंडातील आखाती प्रदेशात कांद्याची लागवड केली जात असे.
इराण आणि इजिप्त या देशांची संस्कृती तेव्हा पुढारलेली होती,हेच देश कांद्याचे मूळ स्थान म्हणावे,त्या नंतर तो सर्वत्र पसरला. कांद्याचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा (Allium Cepa) असे आहे.कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे. पहिल्या वर्षी मूळे फुटून पाने येतात व जमिनीत कांदा मोठा होत राहतो,नंतर पुढीलवर्षी त्यातून दांडा बाहेर येऊन त्याला पांढऱ्या छोट्या छोट्या फुलांचा गुच्छ तयार होतो. यातूनच कांद्याचे बी मिळते.
ऍलियम प्रकारात अनेक प्रजाती आहेत. उदा. कांदा, लसूण, शॅलॉट, स्कॅलिऑन्स (हिरवा छोटा कांदा), लीक, चाईव्हस (कांदापात) ई. फ्रेंच ओनिऑन सूप हे युरोपात तर कांदापात चे प्रकार चायनीज खाद्य पदार्थात वापरासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिकचा कांदा मात्र वर्षातून दोन वेळेस घेतात. उन्हाळी कांदा हा टिकण्यास चांगला व रब्बी कांदा ,हा टिकण्यास कमी असतो. कांदा हे नाशिवंत पीक आहे,कांदा पीकानंतर त्याची योग्य साठवणूक करून ठेवणे आवश्यक असते. नाहीतर कांदा सडतो. कांद्याच्या राशी साठवून ठेवतात त्याला कांदाचाळ म्हणतात. कांदा साठवणुकीला, सावलीत पण सर्व बाजूनी खेळती हवा लागते.
कांद्याला एक रोग होतो, कांदामाशीची(Onion fly) कीड लागते. ही माशी जमिनीच्या वरील पानांवर अंडी घालते,त्यातून बाहेर पडणारी अळी ही पाने खाते आणि कांदा सडायला सुरवात होते. नैसर्गिकरित्या ,कांदामाशीचे,कांदा हे होस्ट प्लांट आहे.
कांद्याच्या वासानी ही माशी त्यावर आकृष्ट होते. पण हा रोग कमी तापमानाच्या ठिकाणी जास्त फोफावतो. उत्तर भारत,चीन,युरोप मध्ये ही मोठी समस्या आहे. सुदैवाने नाशिकच्या कोरड्या व गरम हवामानामुळे येथे कीड कमी लागते.कांदयावर अजून एक रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्यासारखी दिसतात.
पूसा रेड, नासिक रेड, बेलारी रेड ,बसवंत 780 आणि एन-2-4। एन-53, अर्लीग्रेनो आणि पूसा रत्नार या कांद्याच्या विविध प्रजाती आहेत. त्यात नासिक रेड आणि बसवंत 780 ह्या प्रसिद्ध प्रजाती आहे.एन-2-4। एन-53, अर्लीग्रेनो आणि पूसा रत्नार मध्ये साठवण क्षमता कमी असते. कांद्यामध्ये मुख्यत्वे करून पाणी,कार्बोहायड्रेट आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण सर्वाधिक असते.
तसेच,व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B9,B6 आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये मिळतात. कांदा हा कर्करोग,मधुमेह ठिसूळ हाडे या रोगांवरही गुणकारी आहे. कांद्यामध्ये एक घटक असतो Propanethial S oxide (C3H6OS), यामुळे द्रव स्वरूपातील गॅस (ऐरोसोल),कांदा चिरताना बाहेर पडतो आणि त्यामुळे अश्रुधारा वाहायला लागतात.
कांदा शीतऋतुतील पीक आहे परंतु जास्त शीत वातावरण हानिकारक असते आणि जास्त तापमान असल्यास ही हानिकारक असते. कांद्याचे विपुल उत्पादन मिळवण्यासाठी पुरेशा सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. कन्दीय पीक असल्याकारणाने भुसभुशीत आणि जल निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते.
आपण मागील लेखात पाहिले की,सातमाळा रांगेमुळे हवामानात कसा बदल होतो ते,त्यामुळे डाळिंब आणि द्राक्षांच्या भागांतपण कसा फरक पडतो. नेमके कांद्याच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पडलेले दिसतात.
पश्चिम भागातील सात तालुक्यांमध्ये खडकाळ जमीन आणि जास्त पाऊस पडतो,त्यामुळे कांद्याची लागवड होताना दिसत नाही.तर पुर्वेकडील तालुक्यांमध्ये पाण्याचा निचरा होणारी जमीन,थंडीत जास्त थंड तर उन्हाळ्यात जास्त उष्ण अश्या तापमानात कांद्याची लागवड प्रभावी होताना दिसते. नाशिकच्या जैवविविधतेने नटलेल्या वैविध्यपूर्ण हवामानामुळे, जमिनीमुळे कांद्याची लागवड मालेगाव पासून ते सिन्नर पर्यंत काशी पसरली आहे ते आपण बघितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!