प्रिय वाचकहो, नुकत्याच झालेल्या २२ मे च्या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आणि येत्या ५ जूनला असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा!!! आज आपण महाराष्ट्राचा बायो हॉटस्पॉट असलेल्या नाशिक विषयी जाणून घेणार आहोत…
आपण गेले ३ ते ४ महिने नाशिकच्या जैवविविधते बद्दल या लेख मालिकेद्वारे माहिती घेत आहोत. आपणास हे लेख कसे वाटले? जर चांगले वाटले असतील, तर ते सर्व श्रेय नाशिक जिल्ह्याच्या जैवविविधतेला आहे. मी थोडे फार ते मांडण्यानचे काम केले आहे.
खरे तर संपूर्ण भारत वर्षालाच सृष्टीचे मोठे पाठबळ लाभले आहे. जगातील सर्वात जुना सह्याद्री पर्वत तसेच सर्वात तरुण पर्वत हिमालय, हे दोन्ही भारतातच आहेत. सिंधू नदी पश्चिमेकडे तर पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा नदी, उत्तरेला हिमालय, हिंदुकुश पर्वत रांगा आणि दक्षिणेला अथांग हिंद महासागर या भारताच्या नैसर्गिक सीमा आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्यांनी सुजलाम सुफलाम केलेला प्रदेश हे वैशिष्ट्य आहे. तसेच साडेसात हजार किमी लाभलेला समुद्र किनारा, मान्सूनचा पडणारा पाऊस, हिमालयातील उत्तुंग हिमशिखरे, राजस्थानातील थरचे वाळवंट, दलदलीचा कच्छ प्रदेश तसेच बंगालचा त्रिभूज प्रदेश ही भारत वर्षाची काही नैसर्गिक ठळक वैशिष्ट्ये आहेत.
महाराष्ट्राला साथ संगत आहे ती जागतिक हॉटस्पॉट असलेल्या सह्याद्रीची, अरबी समुद्राची किनारपट्टीची, तसेच दख्खनच्या पठाराची. त्यातील नाशिक जिल्हा हा मुळातच निसर्गाचे वरदान लाभलेला महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. पश्चिमेस असलेला सह्याद्री, उत्तरेस सातमाळा रांगेपासून सुरू होणारे अर्ध वाळवंट तर दक्षिण पूर्व प्रदेशात गोदावरी नदीचे खोरे आणि दख्खनचे पठार, ह्या निसर्ग वैविध्यामुळे हा जिल्हा निसर्गतःच जैवविविधतेसाठी अनुकूल आहे. सह्याद्रीला लागून असलेल्या तालुक्यात भरपूर पाऊस, उत्तरेला विषम, कोरडे हवामान तर पूर्व-दक्षिणेला समशीतोष्ण हवामानामुळे समृद्ध जैविक विविधता लाभली आहे.
नाशिक जिल्ह्यातील जैविक हॉटस्पॉटस
१. सह्याद्री: थळ घाटापासून (कसारा घाट) ते सावल घाट (पेठ घाट) पर्यंत पसरलेली सह्याद्रीची मेन रांग, भरपूर पाऊस, डोंगराळ जमीन, साग, अर्जुन, सादडा, बांबू, हिरडा, बेहडा, मोह यासारखे वृक्ष-वैविध्य, गरुड, पिंगळा, गिधाड, पर्वत कस्तुर यासारखे पक्षी-वैविध्य, ब्लू मॉर्मन (राणी पाकोळी) फुलपाखरु यांचा आढळ येथे आहे.
२. त्र्यंबक रांग : सह्याद्रीच्या मेन रांगेतून निघून पश्चिम-पूर्व जाणारी रांग. गोदावरी नदी, वैतरणा नदीचे उगमस्थान असलेले ब्रह्मगिरी पर्वत, सेरोपेजिया सारख्या वनस्पतींचे आढळस्थान असलेले अंजनेरी पर्वत. भारतीय गिधाडांची सर्वात मोठी कॉलनी अंजनेरी परिसरात आहे (२५० घरटी). वनौषधी, जडीबुटी यासाठी हा प्रदेश महत्वाचा आहे.
३. *गंगापूर धरण समूह : गंगापूर, कश्यपी, आळंदी, गौतमी-गोदावरी या नद्यांचा समूहाला गंगापूर धरण समूह म्हटले जाते. पाणथळ जागा, फ्लेमिंगो, पाणकावळे, बदके, करकोचे, शराटी, काठावरील विविध पक्षी वैविध्य यासाठी प्रसिद्ध. बिबट्यांचे क्षेत्र.
४. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य : महाराष्ट्रातील प्रथम रामसर मानांकन प्राप्त झालेले पक्षी अभयारण्य. २५० प्रकारचे पक्षी वैविध्य. ५० प्रकारच्या फुलपाखरांची रेलचेल
५. काळवीट संरक्षित क्षेत्र : येवला तालुक्यातील राजापूर आणि ममदापूर येथे माळरान परिसंस्थेसाठी प्रसिद्ध. पिवळा पांगारा, लाल पांगारा, काळवीट, हरीण यासाठी प्रसिद्ध.
६. सातमाळा रांग : अहिवंत गड,सप्तशृंगीगड पासून चांदवडपर्यंत पसरलेली सह्याद्रीची मोठी उपरांग. भरपूर पाऊस आणि कडक उन्हाळा यामुळे जैवविविधता.
७. बागलाण तालुका : हिवाळ्यात खूप थंडी, उन्हाळ्यात खूप गरम असे वातावरण. अर्ध वाळवंटाची सुरवात, डाळिंब फलोत्पादनात अग्रेसर. कांदा, टोमॅटोचे उत्पादन.
८. दिंडोरी, निफाड तालुके : ओझरखेड, वाघड, करंजवण, पालखेड धरण समूह. कादवा नदीचे खोरे, द्राक्ष आणि कांदा उत्पादनात निर्यातक्षम गुणवत्ता. उसाची लागवड, बिबट्याचे क्षेत्र. रणताळे येथे पक्षी वैविध्य, बदके, कॉमन क्रेन, डेमोझोल क्रेन यांची आवडती जागा.
९. बोरगड वन संरक्षित राखीव : बोरगड भागात नैसर्गिक, स्थानिक वृक्ष लागवड करून एक जागरूक जैवविविधता जंगल तयार झाले आहे. मोर, बुलबुल, खाटीक, ब्लॅक बर्ड, ककु, गरुड, गिधाड आणि कितीतरी पक्ष्यांसाठी अधिवास तयार झाला. तसेच, रानमांजर, खवले मांजर, घोरपड, सर्प (नाग, धामण, बांबू वायपर, घोणस) यासाठी अधिवासाची जागा तयार झाली.
जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी
१. सह्याद्रीच्या आदिवासी भागातील तसेच धरण पाणलोटक्षेत्रातील अमाप जंगलतोडीसाठी उपाययोजना कराव्या लागतील
२. ओझरच्या माळरानावर २० वर्षांपूर्वी माळढोक होते. एक फोटोफ्रेम मध्ये सहा माळढोक असल्याचा पुरावा आहे. तो भाग परत माळढोक पक्ष्यांचे पुनर्वसन करून संरक्षित राखीव करावा.
३. त्र्यंबकेश्वर-अंजनेरी भागात फुलपाखरू उद्यान करावे. कारण पठारी प्रदेशापेक्षा जास्त दमट हवामान आहे.
४. गिधाडांचे पुनर्वसन, संवर्धन त्र्यंबक-हरसूल भागात होऊ शकते.
५. कॉमन क्रेन सारखे पक्षी वाघड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी येतात. खिच्चन, राजस्थानच्या धर्तीवर येथे क्रेन पक्ष्यांसाठी अधिवास तयार करावा.
६. गंगापूर, आळंदी धरण परिसरात, फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी अधिवास तयार करण्यात यावा.
७. त्र्यंबक रांग आणि सातमाळा रांग परिसरातील वनस्पतींचे आधारभूत माहिती संकलन (डेटा कलेक्शन) करण्यात यावे.
८. मानव आणि बिबट्या संघर्षावर संशोधन करून मार्ग सूचवावा.
१०. नाशिक, निफाड सारख्या शहरातील सांडपाण्याचे तसेच औद्योगिक सांडपाण्याचे योग्य प्रमाणात प्रवाही उपचार (Effluent treatment) करून अंमल आणावा.
मित्रांनो, शहरी भागातील अनेक सोशल आणि अभ्यासू ग्रुप जैवविविधतेच्या माहिती आणि संवर्धनासाठी जागरूक झाले आहेत. पण ग्रामीण भागात अजून जागरूकता आली नाही. त्यासाठी काही रंजक प्रयोग करावे लागतील, तरच ह्या जैवविविधतेच्या संवर्धन आणि संरक्षण कार्यात भरीव कामगिरी होईल, असे वाटते. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्याचा अभ्यास करून परत निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हीच ह्या जैवविविधतादिन आणि पर्यावरणदिन निमित्त अपेक्षा करूया.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!