नाशिककरांची उत्सुकता वाढवण्याचे काम काही पक्षी बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे काळा शराटी. खरंतर त्याच्या कर्कश्श आवाजामुळे ते लोकांचे चित्त वेधून घेतात. नाशिक मध्ये सकाळी अथवा सांजवेळी फेरफटका मारल्यास हे पक्षी उंच झाडावर किंवा मोबाईल टॉवर बसून आपले चित्त वेधण्याचे काम करतात. त्यांच्या मोठ्या आकार, लांब चोचीमुळे आणि कर्कश्श ओरडण्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जाते. या लेखात मी या चित्तवेधक पक्ष्यांची माहिती देणार आहे. बऱ्याच मित्रमंडळींनी मला या पक्ष्याचे नाव करकोचा असे सांगितले, तर हे अज्ञान दूर करण्यासाठीच हा लेख प्रपंच….
जगभरात जवळपास २८ प्रकारचे शराटी पक्षी (Ibis Bird) ज्ञात आहेत. त्यातील ३ प्रकारचे शराटी पक्षी भारतात दिसतात. काळ्या डोक्याचा, पांढरा शराटी आणि चकाकणाऱ्या पंखांचा छोटा शराटी हे पाणथळ जागेच्या अधिवासात दिसतात. तर काळा शराटी हा पाणथळ जागेजवळील कोरड्या भुसभुशीत जमीन असलेल्या कुरणात अधिवास करताना दिसतो. इजिप्शियन संस्कृती मध्ये शराटी पक्ष्याला खूप मानाचे स्थान आहे. त्यांच्या थोथ नावाच्या देवाचा चेहरा, शराटीच्या तोंडाचा आहे. वेस्ट इंडिज बेटांपैकी त्रिनिदाद आणि टोबॅगो ह्या देशाचा राष्ट्रीय पक्षी लालबुंद रंगाचा ‘स्कारलेट आयबीस’ हा अत्यंत आकर्षक पक्षी तेथील पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. आपण ह्या लेखात, आपल्या नाशिककरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या काळा शराटी पक्ष्यासंबंधी माहिती घेणार आहोत.
काळा शराटीचे संस्कृत मधील नाव आहे, धवलस्कंध. ह्या पक्ष्याच्या खांद्यांवर पांढऱ्या रंगांचा मोठा ठिपका असतो. तो उडताना सुरेख दिसतो. तसेच माथ्यावर लाल भडक रंगाचा त्रिकोण पाहायला मिळतो. ह्या दोन्ही ठळक खुणांमुळे पक्षी जरी काळा असला तरी दिसायला आकर्षक दिसतो. ह्या पक्ष्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची जवळजवळ नऊ इंच लांबीची जमिनीकडे वाकलेली वक्राकार चोच. ह्या चोचीचा उपयोग पक्ष्याला जमिनीतून उकरुन खाद्य मिळवण्याच्या कामी होतो. ह्या चोचीचा संदर्भ घेऊन वैद्यकशास्त्रातील आयबीस सीझर चा शोध लागला. जेणेकरून ऑपरेशन करताना ह्या सीझरचा उपयोग महत्वाचा ठरतो. ह्या पक्ष्याची लांबी ७० सेंटीमीटर असते. आकाराच्या मानाने हा पक्षी पायात बुटका आहे. त्यामुळे तो करकोच्यांपेक्षा वेगळा दिसतो. करकोच्यांची चोच त्यामानाने छोटी असते, पण पाय खूप उंच असतात. त्याच्या वक्राकार चोचीमुळे जमिनीतील गांडुळे, अळ्या, किटक, बेडूक या सारखे खाद्य मिळवायला मदत होते. शिवाय जमिनीवरील सरडे, सापसुरळी, नाकतोडे या सारखे प्राणी पण यांचे खाद्य आहे.
काळा शराटीचा प्रजनन काळ मार्च ते ऑक्टोबर ह्या काळात असतो. घरटे उंच झाडावरच्या शेंड्यावर असते. छोट्या मोठ्या काड्यांचे ३० ते ४० सेमी व्यासाचे आणि १० सेमी खोलगट असते. प्रजनन काळात नर आणि मादी ह्यांच्या जोड्या ठरतात. आणि पिल्लांचे संगोपन होईपर्यंत त्या जोड्या टिकून राहतात. परत पुढच्या हंगामात दुसऱ्या जोड्या बनतात.
जोड्या जमल्यावर, नर-मादी एकत्रितपणे घरटे बांधतात. घरटे बांधायला जवळपास एक महिना लागतो. निलगिरीच्या चिवट काड्या पण वापरतात. त्यामुळे घरटे मजबूत बनते. ह्या दरम्यान नर मादीचे मिलन चालू असते. त्या नंतर मादी २ ते ४ अंडी घालते. मादी अंडी उबवते. दिवसभर हे काम चालू असते. नर संध्याकाळी येतो आणि मादीस सोडतो. ३३ दिवसांनी पिल्लू जन्माला येते. दुसरे पिल्लू त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी जन्म घेते. बहुतांश वेळेस २ पिल्लेच जन्म घेतात. त्यानंतर मात्र नर आणि मादीची, अन्न भरवण्याची लगबग चालू होते.
पहिल्या दोन दिवसात दोघांतील एक जण तरी पिल्लांचा सांभाळ करत थांबतो. पहिल्या काही दिवसात कावळे, पिल्लांवर हल्ला करताना मी पाहिले आहे. पण नर, मादी तो हल्ला जोरदार परतवून लावतात. एकदा पिल्लू एक आठवड्याचे झाले की, त्यांची चोच पण वाढलेली असते, मग कावळ्याची भीती राहत नाही. एक महिन्याचे पिल्लू व्हायच्या आधी त्यांच्या पंखांची वाढ चांगली झाली असते. व पंखांमध्ये बळ आणण्यासाठी त्यांची उघड झाप सारखी चालू असते.
एक महिन्यानंतर नर, मादी एका पिल्लाला उडवण्याचा प्रयत्न करतात. पिल्लू छान उडते. नर, मादी पिल्लाला आपल्या चोचीतून (क्रॉप मध्ये साठवलेले) प्रोटीन युक्त अन्न भरवतात. घरट्यातून एक आठवड्यात पिल्लू त्याच्या आई, वडिलांसमवेत उडू लागते. पिल्लांना आवाज साधारणपणे २ महिन्यानंतर येतो. तीन ते चार महिन्याचे पिल्लू स्वतंत्र होते आणि आपले खाद्य मिळवू लागते. एक वर्षाचा पक्षी प्रौढ आणि प्रजननक्षम मानला जातो.
माझे भाग्य की, ही लाईफ सायकल माझ्या डोळ्यांनी अनेकवेळा बघू शकलो व काही प्रमाणात vdo shoot करू शकलो. एखादे घरटे बनल्यावर त्याचा दरवर्षी डागडूजी करून वापर केला जातो. सध्या गेल्या १५ ते २० वर्षात आकाशवाणी परिसर आणि गंगापूर रोड, MIDC, परिसरात काळा शराटी हा नेहमी आढळणारा पक्षी झाला आहे. त्यांची दिवसेंदिवस संख्याही वाढत आहे.
आकाशवाणीचा टॉवर हे पूर्वी शराटी पक्ष्यांसाठी मोठा अड्डा मानले जायचे. मी एके वेळेस तब्बल ६३ काळे शराटी येथे मोजले होते. पण आता मोबाइलला टॉवर्स पण शराटी पक्ष्यांचे अड्डे बनत चालले आहेत. येथे त्यांचे विश्रांती (रुस्टिंग) आणि मिलन होताना मी अनेकदा पाहिले आहे. आवाज मात्र मान आकाशाकडे करून तुतारी वाजवल्या प्रमाणे करताना हा पक्षी आणि त्यांच्या थव्याचे निरीक्षण करणे हे पक्षी मित्रांचे आवडते क्षण आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!