पावसाळा सुरू झाला की सहाजिकच अनेकांची पावले निसर्गाकडे आणि खासकरुन हिरव्यागार डोंगरांकडे वळतात. मन प्रसन्न होण्यासह नवा उत्साह हे वातावरण देत असते. डोंगरांवर दिसणारी लिली अर्थात गुलाबी कर्णफुले ही जैविक विविधतेतील महत्त्वाचा घटक आणि निसर्गाचं अनोखं देणं सुद्धा. म्हणूनच आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
सह्याद्री मध्ये अशी कित्येक ठिकाणे असतील की जी युनिक आहेत. एकतर सह्याद्रीचे आयुष्य भारतात सर्वात जुने आहे. शिवाय बेसाल्ट दगड, त्यावरील माती, पूर्वेकडची उतरण, घाटमाथे, कोकणातील तीव्र उतार, सदा हरित जंगले, पानगळीची जंगले, खडकाळ प्रदेशातील पाण्याच्या टाक्या, गुहा आणि त्यातच भर म्हणजे विविध प्रकारची ४०० हून जास्त प्रकारची झाडे, त्याहून जास्त वेली, गवते, झुडपे.
उष्णकटिबंधातील असल्याने तिन्ही ऋतूंचे सह्याद्रीच्या पट्ट्यात अनुभवास मिळते. ऋतूंचे आगमन आणि प्रस्थान या काळात सृष्टीचे रूप बदलत असते. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे सौंदर्य बघावयास मिळते. आणि ते बघण्यासाठी, त्या त्या ठिकाणी जाण्याची ईर्षा पाहिजे. सध्या फोटोच्या माध्यमातून आपण या गोष्टी जरी शेअर करत असलो तरी याची देही याची डोळा अनुभव घेणे म्हणजे खरी मेजवानी ठरते आणि आपले मन प्रफुल्लित होते.
आपल्या नाशिकच्या जवळ असेच एक ठिकाण आहे, जेथे डोंगराच्या उतरणीवर हजारोच्या संख्येने पांढरी-गुलाबी पट्टेरी लिलीची मोठ्या आकाराची फुले मे महिन्यात उगवतात आणि पहिला पाऊस सुरू झाला की कोमेजून जातात. या फुलांना मराठीत ‘गुलाबी कर्णफुले’ असे म्हणतात. त्यांचे शास्त्रीय नाव आहे Crinum latifolium तर इंग्रजीतील कॉमन नाव आहे ‘मिल्क अँड वाईन लिली’. या फुलांचा रंग दुधासारखा पांढरा आणि वाईन सारखा गुलाबी असतो. हे ठिकाण बोरगड परिसरात, गवळवाडी गावाच्या जवळील डोंगरात, उत्तरेच्या उतरणी वर आहे.
या पिंक स्ट्राईपड लिलीची फुले फारच आकर्षक असतात. फुलांचा दांडा जमिनीपासून ३ ते ३.५ फूट उंचीवर येतो आणि त्यातून भले मोठे ९ ते ११ इंच व्यासाचे मलमली फुल उमलते. आपणास घरांच्या बागांमध्ये येणाऱ्या लिलीची कल्पना असते. लाल,पांढरी असे अनेक रंग लिलीचे सर्वसाधारण आढळतात. पण हे गुलाबी कर्णफुल थोडे मोठे आणि अधिक आकर्षक असते.
फुलांना अजिबात वास नसतो. या लिली फुलांची फॅमिली आहे Amaryllidaceae आणि जगभरात जवळजवळ १०५ प्रकारच्या विविध लिलीच्या प्रजाती आढळतात. गुलाबी कर्णफुले संपूर्ण आशिया खंडात जास्त आढळतात. त्यांचे मूळ, दक्षिण पुर्व आशिया आहे. तसेच वेस्ट इंडिज मध्येही या फुलांचा आढळ आहे. लिलीची ही जात वर्षातून एकदा आणि क्वचितच दोनदा बहरते. बाहेर येऊन गेल्यावर फुलांचा कांदा जमिनीवर पडतो आणि त्यातून सुकल्यावर बिया निघतात.
ही वनस्पती औषधी वनस्पती म्हणून पण ओळखली जाते. या फुलांच्या कळ्या तुतारी सारख्या दिसतात म्हणून हिला ट्रमपेट लिली असेही संबोधतात. सह्याद्रीच्या कुशीत उगवणाऱ्या ह्या औषधी वनस्पतींला आयुर्वेदात ‘सुदर्शन’ किंवा ‘ सुखदर्शन’ असेही म्हटले जाते. म्हणजेच या फुलांच्या नुसत्या दर्शनानेही समाधान मिळते.
पानांचा रस दुखऱ्या कानात टाकल्यास गुणकारी ठरतो. डोक्यात कोंडा झाल्यास लिंबाच्या रसात मिसळून लावावा. दुखऱ्या गुडघ्यावर किंवा सुजलेल्या भागावर पानांचा रस प्रभावी ठरतो. केसतोडा, मूळव्याध तसेच कातडीच्या रोगांवरही औषध म्हणून लावतात. आणि विषप्रयोग झाल्यास, पोटात पानांचा रस घेतल्याने लगेचच उलटी होऊन आराम पडतो. याशिवाय अजूनही बरेच उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत.
तर मित्रांनो ,पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आपण जर कोविडच्या सर्व काळजी घेऊन बाहेर पडू शकलो तर निसर्गात अशी अनेक आश्चर्ये आणि दृश्ये आपणास दिसू शकतात. आपल्याला आनंद देऊन जातात. फिरते व्हा आणि निरीक्षणे करा, एवढाच कानमंत्र देऊन मी लेख पूर्ण करतो.
पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्व फोटो – सतीश कुलकर्णी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!