सूर्यास्तानंतरची वेळ… ह्या वेळेस दररोज हजारोंच्या संख्येने वटवाघूळांची मोठीच्या मोठी पलटण, आकाशात पश्चिमेच्या बाजूने, गोदापार्क पासून तरंगत तरंगत जाताना आपल्याला दिसते. जणू काळी नदीच वाहत आहे आकाशात असा भास होतो. जे लोक ह्या परिसरात राहत असतील किंवा बापू पुलावर सायंकाळी फिरायला आले असतील, त्यांना हे नेहमीचे दिसणारे दृश्य. वटवाघळांविषयी सर्वसामान्यांच्या मनात घृणाच आहे. अशा या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या सस्तन प्राण्यासंबंधात आपण ह्या लेखात माहिती घेणार आहोत.
उडणाऱ्या सस्तन प्राण्यांना वटवाघूळ असे म्हणतात. त्यांचा समावेश किरोप्टेरा किंवा जतुका गणात होतो. किरोप्टेराचा ग्रीक भाषेतील अर्थ ‘हस्त पंख’ असा आहे. वटवाघळांचा प्रसार दोन्ही गोलार्धाच्या समशीतोष्ण व उच्च कटिबंधात आहे. त्यांची लांबी १.९ ते ३७.५० सेंमी. व पंखांचा विस्तार १.५ मी. पर्यंत असतो. जगात साधारणपणे १४०० प्रजातीची वटवाघुळे आढळतात.
सर्वसाधारण शरीररचना उंदीर/चिचुंद्री यांसारख्या लहान सस्तन प्राण्यांसारखीच असते. त्यांचे शरीर मऊ फरने आच्छादिलेले असते, तिचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा काळा असतो. तोंडात दात असतात व दोन सुळे असतात. माद्यांना स्तन असतात. बहुसंख्य वटवाघळे आपली उपजीविका फळांवर किंवा कीटकांवर करतात. मोठ्या आकाराची वटवाघूळांचे तोंड कोल्हा किंवा कुत्रा सारखे असते. वटवाघळांचे ढोबळ मानाने दोन प्रकार असतात, मेगा बॅटस आणि मायक्रो बॅटस.
मेगा बॅट्स शाकाहारी फलहारी असतात तर मायक्रो बॅट्स कीटक भक्षक असतात. दोन्ही प्रकारची वटवाघूळे संध्याकाळी, रात्री विहार करताना दिसतात. भारतात आठ प्रकारची वटवाघळे दिसतात,त्यातील नाशिकच्या गोदापार्क येथील वटवाघूळांचे नाव आहे ‘इंडियन फ्लाईंग फॉक्स’. ह्यांचे तोंड कोल्ह्याच्या तोंडाशी मिळते जुळते असते. ही प्रजाती प्रामुख्याने फळे आणि फुलांचा मध प्राशन करणारी आहे.
पंख ही वटवाघळाची वैशिष्ट्यपूर्ण संरचना होय. पाठीच्या व पोटाच्या कातडीचा विस्तार होऊन पंख तयार झालेले असतात. बाहू व हात यांच्यामधील लांबट हाडांमध्ये त्वचेने दोन थर ताणले गेलेले असतात व शरीराच्या दोन्ही बाजूंनी विस्तार पावून ते नडगी,तळपाय ते शेपूट यांना जोडलेले असतात. वटवाघूळांच्या हातांची बोटे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
अंगठा हा वेगळा एखाद्या हुक सारखा असतो आणि त्याचा वापर फळे किंवा वस्तू पकडण्यासाठी होतो. बाकीची बोटे लांबीनी खूप मोठी असतात आणि दोन बोटांमध्ये पातळ कातडी असते ज्याचा वापर ते हवेतून ग्लायडरसारखे तरंगण्यासाठी आणि हार्मोनिमच्या भात्यासारखी क्रिया करून हवेतून पुढे सरकण्यासाठी होतो.
अंगठा हा वेगळा असतो आणि त्याचा वापर फळे किंवा वस्तू पकडण्यासाठी होतो. म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या पक्षी हा हवेत उडतो तर वटवाघूळ हवेत तरंगत जाते हे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. फलहारी वटवाघूळ डोळ्यांचा आणि वासाचा वापर जास्त करतात तर मायक्रो बॅट्स प्रतिध्वनीचा वापर करून आपले भक्ष्य शोधतात.
वटवाघूळ हा एक समाज प्रिय प्राणी आहे आणि एक ठिकाणी ते हजारोंच्या संख्येने दिसतात. अमेरिकेतील काही छोटे बॅट्स तर लाखोंच्या संख्येने गुहेतून बाहेर पडतात व परततात असे व्हीडिओ उपलब्ध आहेत. मेगा बॅट्स साधारण १५ ते २० वर्षांपर्यंत जगतात. त्यांचा प्रजनन काळ पावसाळ्यात असतो. त्या नंतर थंडीत १ किंवा २ पिल्ले होतात आणि मादी पिल्लांना जवळजवळ ४ ते ५ महिने सांभाळते.
सस्तन प्राणी असल्याने पिल्ले आईचे दूध पितात. बहुपतित्व आणि बहुपत्नीत्व असे वटवाघूळांचे राहणीमान असते. दिवस ही उंच झाडांच्या फांद्यांवर उलटी लटकलेली दिसतात. गोदापार्कच्या निलगिरीच्या एकेका झाडावर १०० ते २०० एकदा सहज भरेल. वटवाघूळाची आवडती फळे म्हणजे उंबर,वड,केळी,आंबे,पेरू आणि आजकाल तर द्राक्षे सुद्धा. सडलेली फळे किंवा जास्त पिकलेली फळे आणि काही कीटक हे त्यांचे रात्रभर खाणे चालते. परत सकाळी गोदापार्कवर विश्रांतीसाठी येतात.
भारतात ह्या प्राण्यांची संख्या मुबलक आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण आपल्या विष्ठेपासून झाडांच्या बीजधारणेसाठी ते फुलांच्या परागीभवनासाठी ह्या उडणाऱ्या प्राण्यांची खूप मदत होते. वटवाघूळ हे, ‘सॉसेज ट्री’ ह्या झाडाच्या फुलांचे परागीभवन करण्यासाठीची एकमेव प्रजाती असावी.
माझे मित्र डॉ. श्रीश क्षीरसागर यांनी त्यांच्या पुस्तकात, ह्या फुलाचे नाव ‘वाघूळ फुल’ ठेवले आहे . ह्या झाडाची नैसर्गिक रचनाच मुळी अशी केली असते की, त्याच्या लोम्बकाळणाऱ्या दांड्यावर बसून वटवाघूळ, त्याच्या घंटे सारख्या असणाऱ्या फुलातील उग्र मध खाऊ शकतात. तर अशा ह्या अंधश्रद्धेला थोड्या प्रमाणात बळी गेलेल्या ह्या जिवाविषयी आपुलकी दाखवून ,निसर्गरक्षणासाठीच्या कार्यासाठी गोदापार्क सारख्या जागांचे विशेष रक्षण करायला पाहिजे आणि मानवा पासून होणारी हानी टाळली पाहिजे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!