इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण
360 डिग्री प्रोग्रेस कार्ड म्हणजे काय?
असे होईल विद्यार्थ्यांचे मूल्यमापन
नवीन शैक्षणिक धोरण मध्ये शिक्षक व्यवस्थेबद्दल बरेच चांगले बदल आले आहे. त्यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक. अजूनही प्रगतीपुस्तक म्हटले की बर्याच जणांच्या छातीची धडधड वाढते. मग स्वतःला जाणीव करून द्यावी लागते की आपण दहावी-बारावी, ग्रॅजुएट होऊन पंधरा वीस वर्ष झाले आणि त्या स्वप्नातून आपण जागे होतो. तरीही प्रगतीपुस्तक या शब्दाने धडधड वाढते.. ती वाढते…
आता आपले मूल जेव्हा शाळेतून प्रोग्रेस कार्ड आणतात तेव्हा त्याचा पॅटर्न बदललेला दिसतो. तो पॅटर्न असतो सातत्यपूर्ण सर्वेकष मूल्यमापन, म्हणजेच कंटीन्यूअस अँड कम्प्रेहेंसिव इव्हॅल्युएशन (CCE).
आपल्या काळात फक्त विषयात पास का नापास एवढेच प्रगतीपुस्तकावर असायचे. 35 पेक्षा कमी मार्क म्हणजे नापास. एकदा का विद्यार्थ्याला नापास शिक्का लागला की त्याचे वर्षे वाया जायचे असे नाही तर तो ती आयुष्यात काही चांगले करू शकेल अशी अशाच ही व्यवस्था मारून टाकायचे. अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. ढ चा शिक्का त्याच्या माथी लागायचा. “घोका आणि ओका” अशी आपली परीक्षा पद्धत होती. जो पाठांतरा मध्ये चांगला त्याला चांगले मार्क. म्हणजे स्मृती आधारित शिक्षण पद्धती होती.
सध्या विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्याची जी पद्धत चालू आहे तिला म्हणतात सातत्यपूर्ण सर्वेकष मूल्यमापन. ज्याला सी.सी.ई म्हणतात. आता यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मार्क बघितले जात नाही तर त्याचे शाळेमधील वर्तणूक सुद्धा बघितली जाते. मुख्य म्हणजे फक्त वार्षिक परीक्षेवर त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता सातत्याने वर्षभर त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन करायचे असते. यामध्ये फॉर्मटिव्ह असेसमेंट आणि समेटीव्ह असेसमेंट म्हणतात. आता समेटीव्ह मध्ये जे काही अभ्यासक्रम शिकवला जातो तो त्याला / तिला किती येतो याची लिहून परीक्षा घ्यायची असते तर फॉर्मटिव्ह मध्ये शिक्षक त्या विद्यार्थ्याला वाचता येते का? तो शाळेतील चर्चेमध्ये भाग घेतो का? त्याची कल्पनाशक्ती कशी आहे? प्रात्यक्षिक कसे करतो? गृहपाठ करतो का? ड्रामा आर्टमध्ये भाग घेतो का? असे पाहतात. या फॉर्मटिव्ह मध्ये शिक्षक-विद्यार्थी यांच्या संवादावर त्याला ग्रेड दिली जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
प्रश्न हा आहे की सीसीई ही परीक्षा पद्धत पास झाली का नापास? कारण या पद्धतीला मार्क्सवादी पालकांनी खूप विरोध केला. मार्क्सवादी पालक म्हणजे ज्यांना फक्त मुलांचे मार्कच दिसतात. त्यांच्या मध्ये कुठले कला गुण दडलेले आहेत त्यांना दिसतच नाही किंवा दिसत असले तरी त्यांना बघण्याची इच्छा नसते. शिक्षकाकडून सुद्धा सीसीई ला काही प्रमाणात विरोध राहिला आहे. काही शिक्षकांना अजूनही समजलेले नाही CCE मध्ये काय सांगितले आहे. सातत्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे म्हणजे काय तर त्यासाठी वेगवेगळ्या मूल्यमापनाच्या पद्धती वापरायच्या..
जसे एखादा प्रोजेक्ट बनवायचा, एखादा धड्यावर नाटक बसवायचे, विविध ऍक्टिव्हिटी घ्यायच्या, जीवन कौशल्य विकसित व्हावे म्हणून त्या संदर्भात विशेष उपक्रमाचे नियोजन करायचे.. असे बरेच काही.. मग या सर्वांच्या आधारे त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचे फॉर्मटिव्ह असेसमेंट करायचे. सोबतच पेपर-पेन परीक्षा घ्यायची होती. मेहनती आणि उपक्रमशील शिक्षक होते ते सर्व पद्धत वापरायचे पण बऱ्याच शाळेत फॉर्मटिव्ह असेसमेंट चे फक्त रकाने भरले जायचे. बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व्हायचे तो विद्यार्थी कसा दिसतो हे सुद्धा शिक्षकांना माहीत नसायचे. आता त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही कारण वर्गामध्ये 50 ते 70 विद्यार्थी असले की असे होणारच. त्यामुळे सी.सी. इ च्या पद्धतीला जेवढे स्वीकारायला हवे तेवढे स्वीकारले गेले नाही. कागदपत्री पूर्ण स्वीकार झाला पण खरे मूल्यमापन झाले असे दाव्याने सांगणे धाडसाचे होईल.
याचे कारण म्हणजे अजूनही आपण लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये अडकलोय. मानसिकदृष्ट्या अजूनही “शिक्षण म्हणजे माहितीचा साठा करणे” असेच गृहीत धरतोय. ब्रिटिश सिस्टीम लावण्यात माहिर होते. ब्रिटिशांना जाऊन 75 वर्ष होतील.. स्वतःची ज्ञान रचनावादी शिक्षणपद्धती सुद्धा आणली पण ती व्यवस्था म्हणून अंमलबजावणीत आपण अपयशी होत आहोत. कारण मेकॉलेची घोका आणि ओका पद्धत पकड घेऊन आहे. याला म्हणतात सिस्टीम बसवणे. आपल्याला ही मॅकोलो सिस्टीम तोडावी लागेल. पालकांची शिक्षकांची आणि संपूर्ण समाजाची मानसिकता दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत “शोध घेते ते शिक्षण” ही नवी व्याख्या आपण जनमानसात रुजू शकत नाही.
आजकालच्या शिक्षणात आपण मुलांना नुसतं भूतकाळातल ज्ञानच त्यांच्या हाती सोपवतोय, भविष्यकाळाचा नागरी सुद्धा बनवायचे आहे ते आपण विसरतोय. भविष्यकाळाचा नागरिक कसा असेल? त्यामध्ये कसले कौशल्य लागतील? तर त्याच्याकडे चार महत्त्वाचे कौशल्य आवश्यक आहे. एक) क्रिटिकल थिंकिंग, दोन) क्रीएटीव्हीटी, तीन) कॉलाबोरेशन आणि चार) कमुनिकेशन स्किल. यालाच 4C असे म्हणतात. पालकांनो हे कौशल्य कोणी ऐरे गैरे संस्थेने सांगितले नसून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याने रिपोर्टमध्ये जाहीर केले की पुढील दहा वर्षात हे चार कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या जास्त असणार आहे. या रिपोर्ट मध्ये हे ही म्हणाले की जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यातील 65 टक्के विद्यार्थी असे करियर निवडतील जे आज अस्तित्वातच नाही. पण त्या करियर ला लागणारे कौशल्य हे समजले आहे. ते आहे सर्जनशीलता, एकत्र पद्धतीने काम करणे, समोरच्या च्या भावना समजून उत्तम संवाद कौशल्य करणे, समस्या सोडवण्याचे कौशल्य या पद्धतीचे माईड सेट लागणार आहेत. यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता ला सर्वात जास्त महत्त्व असेल.
आता ही कौशल्याचा आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आणायचे असेल तर तसा अभ्यासक्रम आणि जीवन कौशल्य शाळेत शिकवले गेले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये याचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्या पद्धतीच्या गोष्टी सुचवल्या आहेत. तसा अभ्यासक्रम बनायला लागला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा कशी निर्माण होईल? तो किंवा ती जास्तीत जास्त कसे प्रश्न विचारतील? अशी इकोसिस्टीम निर्माण करण्याचे काम चालू आहे. कृतीतून शिक्षण, अनुभवातून शिक्षण, विद्यार्थी आपण होऊन शिकतील याचे प्रयोग आता सार्वत्रिक करणे गरजेचे आहे. तसे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितले सुद्धा आहे.
आता मुख्य मुद्दा हा आहे की या एकविसाव्या शतकातील कौशल्याचे मूल्यमापन कसे करायचे? विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य विकसित झाले आहे की नाही हे कसे तपासायचे? यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये 360 डिग्री बहुआयामी रिपोर्ट कार्डचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांचे प्रोग्रेस कार्ड हे 360 डिग्री मल्टिडाईमेनशीयल होईल. या नवीन रिपोर्ट चा पाया हा एकविसाव्या शतकातील कौशल्य आधारित असणार आहे. ज्या सीसीई मूल्यमापनाच्या पद्धती होत्या त्या असणारच आहे पण त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन स्वरूप यात असेल.
प्रोग्रेस कार्ड मध्ये कोग्नेटिव्ह डोमिन मध्ये कुठल्याही विषयाचे आकलन किती झाले या संदर्भात माहिती असेल. तसेच इफेक्टिव डोमिन मध्ये हे मुद्दे असतील जसे त्या विद्यार्थ्याचा स्वतःकडे बघण्याचा.. दुसऱ्या कडे बघण्याचा आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? त्याची भावनिक बुद्धिमत्ता चा किती विकास झाला आहे? सृजनशीलता इनोव्हेटिव्ह आयडियाज संदर्भात, समस्या सोडवण्यासाठी घेणारा पुढाकार, संवेदनशीलता, संवाद कौशल्य या पद्धतीचे बर्याच गोष्टींचे मूल्यमापन यात होतील. तर सायकॉमोटर डोमिन मध्ये त्याचे शारीरिक हालचाली आणि फिजिकल फिटनेस संदर्भातील मुद्दे असतील. हे सर्व मूल्यमापन करण्यासाठी पहिल्यासारखेच प्रोजेक्ट बेस्, ॲक्टिविटी बेस, इंक्वायरी बेस् लर्निंग चे टूल वापरावे लागणार आहे.
पण मुख्य बदल हा आहे की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन फक्त शिक्षकच करणार नाही तर त्याचे वर्गातील मित्रसुद्धा करतील. तो शाळेत कसा वागतो? डबा शेअर करतोय का? त्याच्यामध्ये सहकार्याची भावना आहे की नाही? तो/ती मित्रांशी कसा बोलतो? सगळ्यांना आदर करतो का? याचे उत्तर त्या विद्यार्थ्यांच्या मित्र मैत्रीणींना विचारले जातील. त्या विद्यार्थ्यांचे मित्र मूल्यमापन करून मार्क देतील.
आधीच्या सी सी इ मध्ये त्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वर्तणुकीच्या नोंदी असायच्या. आता घरातील वर्तणुकीच्या नोंदी असणार आहे. त्यासाठी या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड मधिल काही भाग हा पालकांना भरायचा आहे. तर या रिपोर्ट कार्ड मधील काही भाग हा सेल्फ असेसमेंट चा आहे. म्हणजे विद्यार्थ्याने स्वतःला प्रश्न विचारून त्यांनी स्वतःला मार्क द्यायचे आहे. त्याने स्वतःचे मूल्यमापन करायचे आहे ज्यामधून त्याला स्वतःच्या स्ट्रेंथ / ताकद आणि विकनेस समजतील.
आता तुम्हाला वाटेल की सी सी इ मध्ये जसे टीचर्स रकाने भरून मोकळे व्हायचे, टिक मार करायचे, खोलात जाऊन तपासायचे नाही तसेच इथेही होईल. 360 डिग्री रिपोर्ट कार्ड चे वैशिष्ट्य हे आहे की हा पूर्ण रिपोर्ट कार्ड जो बनेल तो मूल्यमापनाचा जो फॉर्म असणार आहे त्याच्या आधारावर. हा पूर्ण फॉर्म एक तर्फी नसून तो इंटरॅक्टिव्ह असणार आहे. संवाद रुपी तो फॉर्म असणार आहे. हा फॉर्म आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून बनविण्यात येणार आहे असं खुद्द नवीन शैक्षणिक धोरणाच्या ड्राफ्ट मध्येच लिहिलेल आहे.
हा असा रिपोर्ट कार्ड असेल जो शिक्षक, विद्यार्थी, पालक एकत्रित भरतील पण त्याचं मूल्यमापन करेल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर. त्या विद्यार्थ्याला किती ग्रेड द्यायचे.. तो पास झाला की नापास झाला.. हे मूल्यमापनाचा फॉर्म कसा भरला आहे त्यावरून ठरेल आणि निर्णय सॉफ्टवेअर घेईल. मुख्य म्हणजे विद्यार्थी जसा जसा पुढे जाईल तसतसा हा रिपोर्ट अधिक अचूक बनत जाईल. समजा पहिली इयत्ते पासून त्याचे या 360 डिग्री ने मूल्यमापन चालू झाले आणि आता तो आठवी इयत्ते मध्ये आला तर शाळेच्या सिस्टिम मध्ये आठ वर्षाचा रिपोर्ट कार्ड ची संपूर्ण माहिती असल्याने आठवीला मला पाहता येईल की या विद्यार्थ्यांची कुठली बुद्धिमत्ता जास्त ताकदवान आहे. हार्वर्ड गार्डनच्या बहुविध बुद्धिमत्ता चा विचार केला तर प्रत्येक जण कसल्या ना कसल्या बुद्धिमत्तेचे मध्ये पुढे असतो. बुद्धिमत्ता ही एक नसून ती अनेक असते. फक्त काही विद्यार्थ्यांमध्ये एखादी बुद्धिमत्ता जास्त असते तर दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या कुठल्यातरी बुद्धिमत्तेला त्रिव्यतेने प्राप्त झालेल्या असतात. हावर्ड गार्डनर म्हणतात आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे. जसे भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, सांकेतिक बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, शारीरिक स्नायू विषयक बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता, सृष्ट पदार्थ बुद्धिमत्ता.
आता याचे कॉम्बिनेशन करून तुमचा मुलगा मुलगी कशात करियर करेल तर अधिक यशस्वी होऊ शकेल हे या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड ने सांगता येऊ शकेल. यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांची सर्व माहिती मूल्यमापन शिक्षकांनी, त्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी प्रामाणिक पणे केले तर हा जो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून सॉफ्टवेअर बनवले जात आहे तो योग्य निर्णय घेईल. लक्षात ठेवा निर्णय शिक्षक किंवा पालकांना घ्यायचा नाही की माझा मुलगा कशात हुशार आहे हे शोधण्याचा.. शिक्षकांना पालकांना खरे मूल्यमापन करून तो 360 डिग्री फॉर्म योग्य पद्धतीने भरायचा आहे. आता मूल्यमापन फॉर्म तेव्हाच भरता येईल जर त्या फॉर्म मधील प्रश्न हे वर्गातील विद्यार्थ्यांनी अनुभवलेले असतील मग ते प्रोजेक्ट करून असतील, नाटक बसून असतील, रोल प्ले असतील, विद्यार्थ्यांची जागृती निर्माण करून असतील, अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टीत असतील. याचा अर्थ तुमचा मुलगा तुमची मुलगी पास की नापास शिक्षक करणार नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून हे सॉफ्टवेअर ठरवतील आणि हेच न्यू एज्युकेशन पोलिसी ला अपेक्षित आहे.
आता प्रश्न हा आहे की हे कितपत प्रॅक्टिकल शक्य आहे? असं सॉफ्टवेअर केव्हा बनेल? त्याचे प्रशिक्षण व्यवस्थित होईल का? ग्रामीण भागात वापरता येईल का? सरकारी शाळेमध्ये सर्वच शिक्षक स्वीकारतील का? त्या 360 डिग्री रिपोर्ट कार्ड नुसार वर्ष भर शिकवले असेल का? तसे उपक्रम प्रत्यक्ष झाले असतील का? शिक्षक प्रामाणिक भरतील का सी सी इ सारखे रकाने आणि टिक मार्क भरून पुठे जातील? पालक आंधळे प्रेमा खातर आदर्श उत्तरावर टिक तर करणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होते पण जसजसा त्याचा वापर वाढेल तसं याच्या मर्यादाही निघतील अशी आशा आहे.
थोडक्यात काय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विद्यार्थ्यांची विविध बुद्धिमत्ता तपासली जाईल.
तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर espaliersachin@gmail.com वर संपर्क साधावा.