इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण
शिक्षकांनो, इकडे लक्ष द्या
शैक्षणिक धोरणावर विशेष लेखमाला सुरू केल्यापासून मला वाचकांचे बरेच प्रश्न मेलवर येत आहेत. असाच एक प्रश्न कराड मधून अमर तोंबळी यांनी विचारला की, ”कोणत्याही शैक्षणिक धोरणाचं यश हे शिक्षकांच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. आपल्या देशातली शिक्षकांची संख्या आणि त्यांच्या गुणवत्तेचा विचार करता हे कितपत शक्य आहे? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकांबद्दल काय सांगितलं आहे?”
यांचा प्रश्न अतिशय योग्य आहेत. भारतातील शिक्षक दर्जा आणि गुणवत्ता यांच्या संदर्भात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण आता चित्र बदलत आहे. जिल्हा परिषदेमधील प्रयोगशील शिक्षकांची संख्या वाढत आहे. बरेच पालक खाजगी पेक्षा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकवायला स्वतःहून पुढाकार घेत आहे. खाजगी संस्थेतील शिक्षकांचा पगार हा त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. तसंच, अकाऊंटॅबिलिटीचं तत्त्व त्यांना लागू होत असल्याने नवीन शैक्षणिक धोरणामधले मुद्दे अधिक प्रभावीपणे खाजगी शैक्षणिक संस्थेतील शिक्षक लवकर आत्मसात करू शकतील जर त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केलं तर. त्यासाठी MSFDA ही संस्था युद्धपातळीवर काम करत आहे.
सरकारी शाळेतल्या शिक्षकांचं प्रशिक्षण अधिक प्रमाणात सुरू आहे. काही प्रमाणात रिजिडिटी आहे. बदल स्वीकारायला ते तयार नाहीत पण जेव्हा शिक्षकांच्या मदतीला टेक्नॉलॉजी येईल, आर्टिफिशिअल इंटलिजन्स येईल तेव्हा मानसिक पातळीवरचा बदल तसंच शिकण्या-शिकवण्यामधला बदल जलद होईल हे नक्की.
मागील वर्षी हे धोरण आलं. त्यात कोविडने बराच वेळ घेतला. पण या धोरणाचा भाग-२ लवकरच डॉ.कस्तुरीरंगन प्रसिद्ध करतील. आता या धोरणा संदर्भात चिंतन, मनन सुरू आहे. आव्हानांविषयी चर्चा चालू आहे. लवकरच याचं कायद्यात रूपांतर होईल. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नियमावली, प्रोसिजर बनेल. यामध्ये शिक्षकांनी कसं शिकवायचं? काय शिकवायचं? याबाबत मार्गदर्शक तत्त्वं येतील. त्यावेळेस शिक्षकांना नक्की काय करायचं ते अधिक स्पष्ट होईल पण तोपर्यंत शिक्षकांनी या धोरणामध्ये जे शैक्षणिक तत्त्वज्ञान तसेच उद्देश सांगितला तो समजून घेणे आवश्यक आहे. कारण पॉलिसी फक्त व्हिजन स्टेटमेंट बनवते, काय करायचे ते सांगते.. त्यामध्ये अंबलबजावणी पार्ट नसतो. पण काय करायचे यावरून सरकार, शिक्षण विभाग, शिक्षणतज्ञ, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, विद्यापीठ ते कसं करायचं याचा ॲक्शन प्लॅन बनवते. ॲक्शन प्लॅन शिक्षकांनाच राबवायचा असतो त्यामुळे शिक्षकांनाही यात सहभागी केले जाते. पण हे धोरण व त्याचा ॲक्शन प्लॅन शिक्षकांनी राबवला नाही तर काय म्हणून सर्वप्रथम शिक्षकांनाच प्रशिक्षण दिले जाते. तीस वर्षाने आलेलं हे शैक्षणिक धोरण येणाऱ्या 20 वर्षा मध्ये भारताचा सुवर्णकाळ आणू शकतो आणि हे सर्व शिक्षकांच्या हातात आहे.
शैक्षणिक धोरणात शिक्षकांच्या बाबत बरेच मुद्दे आहेत. या धोरणामध्ये स्पष्ट म्हटलं आहे, शिक्षकांची शाळाबाह्य कामं आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने कमी होतील. जेणेकरून ते अध्यापनावर अधिक वेळ खर्च करतील. धोरणामध्ये हे सविस्तर सांगितलं आहे की शिक्षकांना त्यांच्या विषयात वर्षातले 50 तास ऑनलाईन प्रक्षिक्षण घेणं अनिवार्य असेल आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे.
यापुढे बी.एड. कोर्स हा चार वर्षांचा असेल. शिक्षकांना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक राहील. धोरणामधल्या प्रकरण पाचमध्ये शिक्षकांची भरती आणि नेमणूक यांबाबत पारदर्शकता आणायला सांगितली आहे. पुन्हा इथे तंत्रज्ञानाचा वापर करून यातला भ्रष्टाचार थांबवता येईल. शिक्षकांची नेमणूक आणि बदली संपूर्ण ऑनलाइन प्रणालीने होईल.
सर्व शिक्षकांना टीचर्स एलीजिबिलिटी टेस्ट (TET) पास होणं अनिवार्य असेल. या टेस्टची गुणवत्ता अजून कठीण पातळीवर आणणार आहेत. मुख्य म्हणजे TET ही परीक्षा पूर्वप्राथमिक स्तरावरील/मूलभूत स्तरावरील शिक्षकांना सुद्धा अनिवार्य आहे. या परीक्षेमुळे शिक्षक त्यांच्या विषयासंदर्भात नेहमी अपडेटेड राहतील. विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी शाळा शिक्षकांव्यतिरिक्त ‘मास्टर प्रशिक्षक’ नेमू शकतात. इथे मी म्हणेन शिक्षकांनी विविध कला शिकाव्यात. जसं शेती, हस्तकला, स्थानिक कला. तसं झालं तर प्रत्येक क्षेत्रागणिक वेगवेगळे शिक्षक नेमायची गरज पडणार नाही. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षक हे उत्साही आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल करणारे अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांनी वर्गात अधिका अधिक प्रश्न विचारावे म्हणून शिक्षकांनी वर्गात तसे वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे. “भीती मुक्त व स्पर्धा मुक्त शिक्षण वातावरण” निर्माण करायची जबाबदारी या धोरणानुसार शिक्षकांवर आहे.
धोरणाच्या ५.१७ या प्रकरणात म्हटलं आहे की उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना पदोन्नती दिली पाहिजे. तसंच उत्तम कामगिरी करण्याकरता त्यांना पगारवाढही दिली पाहिजे. याकरता शिक्षकांच्या कामाचं मूल्यांकन करण्यासाठी मापदंड/पॅरामीटर्स ठरवणारी यंत्रणा तयार करणार आहेत. आता इथे सरकारी शिक्षकांवर जी टीका होते की शिकवण्याची गुणवत्ता योग्य नाही ती या पॅरामीटर्समुळे सुधारेल. कारण शिक्षकांचा “प्रोत्साहन पगार” हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असेल. पुन्हा इथेही तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. या संदर्भात एक प्रयोग/संशोधन मध्यप्रदेशमधल्या जिल्हा परिषद शाळेमधल्या शंभर शिक्षकांबाबत झाला आहे. त्यांचा पगार हा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी जोडला. तेव्हा सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून आली. अर्थतज्ज्ञ कार्तिक मुरलीधरन यांनी हे संशोधन केलं आहे. थोडक्यात काय स्वतःहून प्रेरित व्हा. जेव्हा शिक्षकांचा पगार विद्यार्थ्यांच्या प्रगतीशी जोडला जाईल तर इच्छा असो वा नसो तुम्हाला प्रेरित होऊन रिझल्ट हा द्यावा लागेल. शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जबाबदारी ही येणार आहे. जे शिक्षक विधायक मानसिकते मध्ये शैक्षणिक धोरणानुसार स्वतःमध्ये बदल घडवतील त्यांची प्रगती अधिक होईल.
प्रकरण ५.२१ मध्ये, जे शिक्षक सेवेत आहेत त्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं याबाबत सर्टिफिकेट कोर्स करणं बंधनकारक असेल. शिक्षक त्यांचा विषय छान शिकवतात पण दिव्यांग विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं; त्यांच्या गरजा कशा ओळखायच्या याबाबत त्यांना माहिती नसते. म्हणून हे विद्यार्थी शिक्षणात मागे पडतात. त्यामुळे याबाबत शिक्षकांना प्रशिक्षित केलं जाईल.
शिक्षकांना फक्त अभ्यासक्रम संपवायचा नसून वर्गात विषयाबाबत चर्चा घडवून आणायची आहे. त्यामुळे अभ्यासक्रम, धडे यांची संख्या कमी करायला सांगितली आहे. NCERT यांनी इयत्ता नुसार अनावश्यक अभ्यासक्रम कमी करायला घेतला आहे. जेणेकरून याचा परिणाम वर्गात विविध उपक्रम, चर्चा करायला अधिक वेळ मिळेल. विद्यार्थी अधिक स्पष्ट विचारतील आणि गट चर्चा होईल.
शिक्षकांनी मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेकडे लक्ष पुरवायचं आहे. मला वाटते भविष्यात दोन प्रकारचे शिक्षक असतील. एक “ह्यूमन टीचर” आणि दुसरे “रोबोट टीचर”. जिथे केवळ माहिती द्यायची आहे तिथे रोबोट टीचर उपयोगाचे ठरतील आणि जिथे विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करायचा असेल तिथे ह्यूमन टीचर्स श्रेष्ठ ठरतील.
त्यामुळे तुम्ही जर शिक्षक असाल तर गणित, भूगोल, शास्त्र शिकवता शिकवता विद्यार्थ्यांच्या मनात शिरून त्यांची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याचे प्रयोग सुरू करा. म्हणजे तुमची फक्त नोकरी शाबूत राहणार नाही तर पगारही वाढेल. तुम्हाला प्रतिष्ठाही मिळेल आणि विद्यार्थ्यांचं जीवन सुधारण्याचं कशातही न मोजणारे आत्मिक समाधान मिळेल.
शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांबाबत अनेक गोष्टी आहेत. एका लेखात लिहणे याला मर्यादा आहेत. म्हणून त्या आपण पुढच्या काही लेखात पाहूया. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही espaliersachin@gmail.com वर मेल करू शकता. प्रश्न विचारा.. चर्चा करा.. धोरणात हेच सांगितले आहे.
सचिन उषा विलास जोशी (शिक्षण अभ्यासक)