इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण
वर्गामध्ये होतील हे लक्षणीय बदल
हे येऊ घातलेलं धोरण पाठांतराला विरोध करतं. विद्यार्थ्यांनी रट्टा मारून लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घेण्यावर भर देतं. यासाठी प्रकरण ४.६ मध्ये धोरणकर्त्यांनी सांगितलं की, विद्यार्थ्याला अनुभवात्मक शिक्षण द्या. ज्याला इंग्लिशमध्ये Experiential learning म्हणतात. खरं तर या आधीच्या प्रत्येक धोरणामध्ये अनुभवातून शिक्षणाचं मार्गदर्शन केलं आहे; पण तरीही शिक्षणपद्धतीमध्ये ते अपेक्षेप्रमाणे उतरलं नाही.
या धोरणामध्ये अनुभवाधारित शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. या आधीच्या काही लेखामध्ये मी नमूद केलं आहे की हे पहिलं धोरण आहे जे मेंदूमानसशास्त्राच्या अंगाने विचार करतं. बालकाचा मेंदू पहिल्या बारा वर्षांत उत्तम पद्धतीने घडतो. मेंदूच्या पेशींची घट्ट बांधणी पहिल्या बारा वर्षांत सर्वाधिक होते. मेंदूमधल्या मज्जापेशी एकमेकांना जेवढ्या घट्ट जोडल्या जातील आणि त्यातून सिनॅप्स निर्मिती होईल; तेवढ़ा बालकाचा मेंदू तल्लख होईल. ही पेशींची जुळणी तेव्हा होते जेव्हा बालकाच्या मेंदूला चालना मिळते. स्टिम्युलेशनने मेंदूच्या पेशींची जुळणी होते. मेंदूला चालना तेव्हा मिळते जेव्हा बालक पाच इंद्रियांचे अनुभव घेतो. हे अनुभव जेवढे विविध तेवढा बालकाच्या बुद्धिमत्तेचा विकास होईल. बालकाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी अनुभवातून शिक्षण गरजेचं आहे.
आता अनुभवात्मक शिक्षण म्हणजे काय? तर पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देणं; त्यासाठी अध्यापनाची विविध तंत्रं वापरणं. जसं की कथाकथन, विविध उपक्रमांचं नियोजन करणं, शैक्षणिक साहित्य वापरणं, जिथे शक्य आहे तिथे फिल्ड व्हिजिटला नेणं. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अनुभवात्मक शिक्षणाचा अवलंब सर्व स्तरांवर करावा. बऱ्याच शाळांत या पद्धतीचा फक्त खालच्या स्तरावर जसं की इयत्ता पहिली, दुसरीपर्यंतच उपयोग केला जातो. विविध शैक्षणिक उपक्रम किंवा शैक्षणिक साहित्याचा वापर केला जातो; पण यापुढे सर्व स्तरांवर म्हणजे बालवाडीपासून ते उच्च माध्यमिकपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण द्यावं असं सुचवलं आहे. अनुभवातून शिक्षण द्यायला शिक्षकांना पुरेसा वेळ हवा. यासाठी धोरणाने अभ्यासक्रमातील अतिरिक्त माहिती जाणीवपूर्वक कमी करायला सांगितली. जेव्हा अभ्यासक्रमाचा मजकूर कमी होईल तेव्हा विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करायला; तसंच विविध अनुभव द्यायला शिक्षकांना वेळ मिळेल.
प्रकरण ४.६ मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, ज्यात प्रत्येक विषयामध्ये मानक अध्यापन म्हणून प्रात्यक्षिक शिक्षण, कला आणि खेळ यांचा समावेश असलेलं शिक्षण, कथाकथनावर आधारित अध्यापन, इत्यादींसह वेगवेगळ्या विषयांमधील संबंध शोधण्याचाही समावेश असेल. जेव्हा शिक्षक एखादा धडा शिकवत असेल तेव्हा त्या धड्यामधला आशय इतर विषयामध्ये कुठे आला आहे याचा संबंध त्याने वर्गात प्रस्थापित करणं. समजा, गव्हाचं उत्पादन हे सर्वांत जास्त कुठल्या राज्यात होतं हे शिक्षक जर भूगोल विषय शिकवताना सांगत असेल तर गहू आणि गणित, गहू आणि इतिहास, गहू आणि शास्त्र यांचा संबंध जोडून शिकवणं. यासाठी शिक्षकांना त्यांच्या विषयासोबत इतर विषयांची जुजबी माहिती असणं अपेक्षित आहे.
अनुभवात्मक शिक्षणासाठी कलेचा वापर करायला सुचवलं आहे. अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्याचा एक भाग म्हणून, केवळ वर्गात आनंदी वातावरण निर्मितीसाठीच नव्हे तर प्रत्येक स्तरावर अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियेत भारतीय कला आणि संस्कृती एकत्रित करून मुलांवर भारतीय संस्कार बिंबवण्यासाठी कला अंतर्भूत केलेलं शिक्षण वर्गातील व्यवहारांमध्ये समाविष्ट करायचं आहे. वर्गामध्ये विविध विषयांच्या संकल्पना शिकवण्यासाठी आधार म्हणून कलेचा वापर करायचा आहे.
थोडक्यात काय, अनुभवातून शिक्षण देण्यासाठी वर्गात विविध उपक्रम घ्यायचे. ज्यांना जोडून विविध कलांचे फॉर्म्स वापरून शिकवता येईल. शिकण्याचा वेगळा आनंद विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी शिक्षकांनी कुठला धडा कसा शिकवायचा याचं पूर्वनियोजन करणं अपेक्षित आहे. समजा, पाऊस कसा मोजायचा हे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाचे शिक्षक शिकवणार असतील तर विद्यार्थ्यांना पाऊस मोजायचं यंत्र बनवण्यापासून गणिताशी त्याची सांगड घालून आलेख बनवणं, ऍव्हरेज काढणं हा गणिती भाग शिकवणं. पावसावरची कविता सांगून भाषेशी हा भूगोलाचा धडा कनेक्ट करणं. विद्यार्थी प्रत्यक्ष यंत्र बनवून पावसात ठेवून चोवीस तासांनी किती मिलिमीटर पाऊस पडला हे प्रत्यक्ष पाहतील.
या सर्व प्रक्रियेला अनुभवातून शिक्षण म्हणतात. आधीच्या धोरणामध्ये सुद्धा या पद्धतीची मांडणी आहे; पण या धोरणात याला अधिक महत्त्व दिलं आहे. तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर espaliersachin@gmail.com वर संपर्क साधावा.