इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण
या नव्या विषयाचा होणार अभ्यासक्रमात समावेश
संपूर्ण शैक्षणिक धोरण हे भविष्यातील भारत डोळ्यांसमोर ठेवून बनवलं आहे. म्हणून याला भारतीयीकरणं केलेलं शैक्षणिक धोरण म्हटलं पाहिजे; पण या धोरणामध्ये एका ठिकाणी असा उल्लेख आहे त्यामुळे कदाचित राजकीय वाद निर्माण होऊ शकतात. प्रकरण 4.27 मध्ये विद्यार्थ्यांना भारतविषयक ज्ञान दिलं पाहिजे असं सांगून त्यासाठी अभ्यासक्रम तयार करायला सांगितलं आहे. भारतविषयक ज्ञान असलंच पाहिजे यात कोणाच्याही मनात शंका नाही.
देशभक्ती निर्माण होण्यासाठी हे आवश्यक आहे. पण देशभक्तीची व्याख्या सध्याच्या राजकीय वातावरणात बदलली आहे. ज्या पद्धतीने मध्ययुगीन भारतातील इतिहास बदलला जातोय, चुकीचा इतिहास तरुण पिढीसमोर ठेवला जातोय, ज्यामुळे धर्मधर्मात, जातीजातीत द्वेष निर्माण होतोय. भीती ही आहे असा तोडून मोडून ठेवलेला इतिहास तरुण पिढीसमोर नको यायला. नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू फार चांगला आहे.
प्राचीन भारताची माहिती विद्यार्थ्यांना असली पाहिजे. आधुनिक भारत उभारण्यात प्राचीन भारताचं योगदान काय होतं हे त्यांना समजलं पाहिजे; पण भीती ही आहे की राजकारणी मंडळींनी जर याकडे जातीच्या चष्म्यातून पाहिलं तर शिकवणं दूर, वाद फक्त निर्माण होतील. असं होणार नाही अशी आशा करूया. तरच धोरणाचा उद्देश सफल होईल.
धोरणामध्ये आदिवासींची माहिती, स्थानिक गोष्टींची माहिती द्यायला सांगितली आहे. पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीसह भारतीय ज्ञानप्रणालीचं शिक्षण द्यायला सांगितलं आहे. आदिवासींच्या वांशिक- वैद्यकीय प्रथा (ट्रायबल एथनो मेडिसीन), वनव्यास्थापन, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती इ.साठी विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञानप्रणालीवरील एक गुंतवून ठेवणारा अभ्यासक्रम देखील ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून दिला जाईल. म्हणजे इयत्ता आठवीपासून ‘भारताचं प्राचीन ज्ञान’ असा 100 मार्कांचा विषय असेल. पण तो ऑप्शनल असेल.
शाळेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या विविध टप्प्यांवर प्राचीन आणि आधुनिक भारतातील विज्ञानाच्या किंवा अन्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तींविषयी व्हिडिओ, माहितीपट दाखवले जातील. आता या व्यक्ती कोण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. साहजिकच, ज्या पक्षाचं सरकार असेल त्या विचारसरणीच्याच व्यक्ती त्यात असण्याची शक्यता आहे. याआधी असं बऱ्याच वेळा झालं आहे. त्यावर संसदेत वादही निर्माण झाले.
या धोरणानुसार विद्यार्थ्यांना सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत विविध राज्यांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शाळा या पद्धतीच्या सहली आयोजित करू शकतात. याने विद्यार्थ्यांमध्ये ‘एकात्मक भारत’ हा विचार पोहोचवायला मदत होईल. त्यांना विविध राज्यांची संस्कृती समजेल.
एकंदरीतच ‘भारतविषयक ज्ञान’ ही संकल्पना उत्तम आहे. प्रकरण 4.27 मध्ये असं म्हटलं आहे की, ‘भारतविषयक ज्ञान’ या विषयात प्राचीन भारताची माहिती आणि आधुनिक भारताच्या उभारणीत प्राचीन भारताचं योगदान, त्याचं यश आणि त्याच्या समोरील आव्हान याबरोबरच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण इ. संबंधित भारताच्या भविष्यातील अपेक्षांची योग्य जाण समाविष्ट असेल. या घटकांचा शाळेच्या संपूर्ण अभ्यासक्रमात प्रसंगोचित ठिकाणी, अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने समावेश केला जाईल. या विषयावर 100 मार्काचा पेपर सुद्धा होऊ शकतो फक्त लेखी परीक्षा ही अनिवार्य नसून ते पर्यायी असेल.