५+३+३+४ मध्ये नक्की काय?
आपल्यापैकी बरेचजणं १०+२ शैक्षणिक रचनेतून बोर्डाची परीक्षा देऊन बाहेर पडलो. ‘पडलो’ हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण शिक्षणाच्या एका टिपिकल सिस्टीममध्ये आपण अडकलो होतो. अडकून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपण बाहेर पडलो असंच म्हणतो. १०+२ यातून बाहेर येऊन आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाची नवीन मांडणी ही ५+३+३+४ अशी असेल.
वयाची ३ ते ८ ही पाच वर्षं-यामध्ये पूर्व प्राथमिक/बालवाडी आणि इयत्ता पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी येतील. याला नाव दिलं आहे ‘पायाभूत स्तर’. मग वयाची ८ ते ११ ही ३ वर्षं- यांमध्ये इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी येतील.. याला नाव दिलं ‘प्रिपरेटरी स्तर’. मग वयाची ११ ते १४ ही तीन वर्षं-यांत इयत्ता सहावी, सातवी, आठवीचे विद्यार्थी येतील. याला नाव दिलं ‘पूर्व-माध्यमिक स्तर’. वयाची १४ ते १८ वर्षं-यांमध्ये इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी येतील. याला नाव दिलं ‘माध्यमिक स्तर’. थोडक्यात वय वर्षं ३ ते १८ वयोगटाला समाविष्ट करणारी ५+३+३+४ अशी नवीन अध्यापनाची आणि अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे.
आता या पायाभूत सत्रामध्ये पाच वर्षांचं लवचिक, बहुस्तरीय खेळ/उपक्रमांवर आधारित शिक्षण असेल. म्हणजे नर्सरी, ज्युनिअर के.जी. आणि इयत्ता पहिली आणि दुसरी या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक खेळ आणि उपक्रमांवर आधारित शिक्षण दिलं जाईल. तिथे कुठेही लिहिण्याचा ताण अपेक्षित नाही. आनंददायी शिक्षण होण्यासाठी खेळातून शिकवणं अपेक्षित आहे.
इयत्ता पहिली आणि दुसरी हे आधी फॉर्मल एज्युकेशन देत आलो पण आता ते पूर्व प्राथमिक ला जोडल्यामुळे इथे सुद्धा इंनफॉर्मल एज्युकेशन अपेक्षित आहे. जी बालवाडीची शिकवण्याची पद्धत आहे ती पद्धत इयत्ता पहिली आणि दुसरी ला शिक्षकांनी वापरायची आहे. इयत्ता दुसरी पर्यंत विद्यार्थ्यांना लिखाण, वाचन, बेरीज वजाबाकी चांगली येणे अपेक्षित आहे.
पूर्वाध्ययन स्तरामध्ये म्हणजे इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीमध्ये शोध आणि उप्रकमावर आधारित अध्ययन होईल. रमेश पानसे यांचं एक पुस्तक आहे ‘शोध घेते ते शिक्षण’. ज्यात ही संकल्पना विस्तृतपणे समजावली आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये खूप अवघड मजकुराऐवजी सोप्या मजकुराचा वापर करायला सांगितलं आहे. यामागचा उद्देश विद्यार्थ्यांशी जास्त वेळ संवाद साधता यावा हा आहे. वर्गात त्यांना बोलायची जास्त संधी मिळावी हा आहे. धोरणामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या वयात संवादात्मक पद्धतीने वर्गात शिकवायचं आहे. म्हणजे शिक्षक वर्गावर येतील आणि त्यांचं शिकवून झालं की पुढच्या वर्गावर जातील असं अपेक्षित नाही. शिक्षकांनी या वयातील सत्रामध्ये म्हणजे इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये लेखन, वाचन, बोलणं, शारीरिक शिक्षण, कला, भाषा, विज्ञान आणि गणित यांसारख्या विषयांचा भक्कम पाया तयार करायचा आहे. आज इयत्ता पाचवीमधल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तरावरचा अभ्यास जमत नाही ही शोकांतिका आहे. याचं भारतातलं प्रमाण ५०- ५५ % च्या पुढे आहे.
म्हणून हा बदल फार महत्त्वाचा आहे. पूर्व-माध्यमिक स्तरामध्ये, पूर्वाध्ययन स्तराच्या अध्ययन आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवर पुढे विकसित केलेलं तीन वर्षांचं शिक्षण बेतलेलं असेल. जे विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र आणि मानसशास्त्रासाठी विद्यार्थ्यांना सज्ज करेल.
इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असेल. यांमध्ये त्यांना निवडीसाठी काही पर्याय असतील. यांत सुतारकाम, इलेक्ट्रिकचं काम, बागकाम, कुंभारकाम यांसारख्या कलांचे प्रत्यक्ष अनुभव मिळतील. NCERT ने यासाठी अभ्यासक्रम बनवला आहे. इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान कधीतरी सर्व विद्यार्थी एका दप्तरविरहित दहा दिवसांच्या उपक्रमामध्ये सहभागी होतील. जिथे ते स्थानिक व्यावसायिक तज्ज्ञ, कलाकार यांचं मार्गदर्शन घेतील. त्यांच्यासोबत काम करतील. तसंच उन्हाळ्याच्या सुटीत सुद्धा या तज्ज्ञांकडे विद्यार्थी इंटर्नशीप करू शकतील. काही विषयांबाबत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रम शिकू शकतील. तसंच, कला, प्रश्नमंजुषा, क्रीडा आणि व्यावसायिक हस्तकला यांचा समावेश असलेले विविध उपक्रम असतील. सांस्कृतिक, ऐतिहासिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटींचा समावेश असेल. मुख्य म्हणजे इयत्ता आठवीपासून कोडिंगसारखे विषय सुचवले आहेत. भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मार्शल लर्निंग आणि डेटा सायन्स यांची व्याप्ती मोठी असेल म्हणून हे विषय पूर्व-माध्यमिक स्तरावर सुरू करायला धोरणामध्ये सुचवलं आहे.
माध्यमिक स्तर म्हणजे इयत्ता नववी ते बारावीमध्ये चार वर्षांचा बहुशास्त्रीय अभ्यास समाविष्ट असेल. आत्तापर्यंत दहावीनंतर केवळ आर्टस् किंवा कॉमर्स किंवा फक्त सायन्स शाखा निवडावी लागायची तसं न करता सर्व शाखेतले विषय एकत्र करून त्यामधून विद्यार्थी विषय निवडू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, विषय निवडण्यासाठी जास्त लवचिकता आणि निवडीला वाव असेल. माध्यमिक शाखेत शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला, व्यावसायिक कौशल्यांचा देखील समावेश असेल. यामागचा उद्देश असा आहे की विद्यार्थी त्यांचा जीवनाचा मार्ग स्वतः निवडू शकतील. माध्यमिक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिक्युलम आणि एक्स्ट्रॉ करिक्युलम किंवा को-करिक्युलम असं यापुढे राहणार नाही. हे सर्व एकाच अभ्यासक्रमात असेल. कला, विज्ञान, मानसशात्र यांमध्ये कसलंही विभाजन नसेल.
थोडक्यात काय, या चारही स्तरांवर अभ्यासक्रम बदलणार आहे. या अभ्यासक्रमाचा पाया हा एकविसाव्या शतकातलं कौशल्य हा असणार असून विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल विकसित करणं हा आहे. एकविसाव्या शतकातलं कौशल्य विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रत्येक स्तरावरील अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी वर्गात विद्यार्थ्यांसोबत चर्चा, प्रश्नोत्तरं होणं अपेक्षित आहे. त्यासाठी पुस्तकातला अनावश्यक मजकूर कमी होणार आहे. नवीन अभ्यासक्रम हा गरजेच्या आणि अनिवार्य मजकुराच्या संकल्पना, कल्पनाशक्ती, समस्या सोडवणं यांवर लक्ष केंद्रित करेल. शिकवणं आणि शिकणं अधिक परस्परसंवादी पद्धतीने केलं जाईल. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. विविध उपक्रम, अनुभवाधारित ऍक्टिव्हिटीज मजेशीर पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकांना, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिलं जाईल.
थोडक्यात, नवीन अध्यापनाची आणि अध्ययनाची मांडणी ५+३+३+४ असेल जी क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबरेशन आणि कम्युनिकेशन स्किलच्या आधारे असेल. यासाठी RTE कायद्याची व्याप्ती वाठवून ती ६ ते १४ वयापासून आता ती ३ ते १८ वयाच्या सर्व विद्यार्थ्यांना लागू होईल. शिक्षणाच्या मोफत आणि सक्तीच्या कायद्यामध्ये बदल होऊन त्याची व्याप्ती अधिक वाढेल. यातून काही खाजगी संस्थांमधल्या समस्या वाढतील. त्या कशा त्याबाबत पुढील लेखामध्ये पाहू. तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर espaliersachin@gmail.com वर संपर्क साधावा.