इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवे शैक्षणिक धोरण
कोडिंग ही काय भानगड आहे? ते सक्तीचे आहे का?
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश एकविसाव्या शतकातील कौशल्यं विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणं हा आहे. हे करताना शिक्षण भारतीय तत्त्वांना धरून असेल याची काळजी धोरणकर्त्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्य रुजवणं आणि रोजगार प्राप्तीसाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा उद्देश आहे.
भविष्यात कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या, व्यवसाय उपलब्ध असतील त्यावर किंबहुना त्याला लागणाऱ्या कौशल्यांवर शालेय आणि उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरत असतो.
येत्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांत जास्त वापर होणार आहे. मशीन लर्निंग, डेटा सायन्स अशी नवीन क्षेत्रं मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत. या सर्वांची भाषा ही कम्प्युटरची भाषा असते. अर्थात तिला क्रिएटिव्हिटीची जोड असणं आवश्यक आहे. म्हणूनच हे धोरण या क्षेत्राला लागणारं मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून हे विषय शालेय अभ्यासक्रमात आणत आहे. ‘कोडिंग’ विषय यातलाच. या सर्वांचा पाया कोडिंग आहे. कोडिंग विषयाचा पाया गणितीय विचार आहे. यासाठी पायाभूत स्तरावरच मुलांचं गणित उत्तम होईल याकडे लक्ष पुरवायला सांगितलं आहे. प्रकरण 4.25 मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, भारताचं भवितव्य, तसंच अनेक उभरती क्षेत्र आणि व्यवसायांमध्ये भारतीय नेतृत्वाच्या दृष्टीने गणित आणि गणितीय विचार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या आगामी क्षेत्रांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स इ. चा समावेश आहे. म्हणूनच शाळेच्या संपूर्ण कालावधीत गणित आणि संगणकीय विचार यांवर जोर दिला जाईल.
याची सुरुवात पायाभूत स्तरावर म्हणजेच इयत्ता पहिली, दुसरीपासून कोडी आणि खेळ यांचा नियमित वापर करून आणि विविध नाविन्यपूर्ण पद्धती वापरून केली जाईल. जेणेकरून गणितीय विचार अधिक मजेदार आणि गुंतवून ठेवणारा होईल. कोडिंगशी संबंधित उपक्रमांची सुरुवात पूर्व माध्यमिक स्तरावर केली जाईल. याचाच अर्थ शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपासून कोडिंग शिकवलं जाईल.
आता प्रश्न पडला असेल की हे कोडिंग नेमकं काय आहे? कोडिंग ही संगणकीय भाषा आहे. कम्प्युटरला हवं तसं प्रोग्रामिंग करणं याला कोडिंग म्हटलं जातं. कोडचा एक संच एक स्क्रिप्ट तयार करतो आणि एक प्रोग्रॅम बनवतो.
जेव्हा संगणक वापरणारा कोणी एखादं सॉफ्टवेअर ओपन करतो तेव्हा त्या युजरला सॉफ्टवेअरचा इंटरफेस दिसतो पण कोडिंग हे त्या सॉफ्टवेअरच्या मागे केलेलं असतं, जे वापर करणाऱ्या व्यक्तीला दिसत नाही.
कोडिंग शिकून तुम्हाला अनेक प्रकारचे ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर बनवता येतात. जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता, तेव्हा आजकाल प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःच्या मोबाईल एज्युकेशनची गरज पडते. जर शाळा- कॉलेजमध्ये ते शिकवलं गेलं तर पुढे त्या विद्यार्थ्यांना व्यवसायात त्याचा उपयोग होईल. अँप किंवा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी या कोडिंगचा वापर केला जातो. कोडिंगला प्रोग्रामिंग सुद्धा म्हणतात. या कोडिंगने विविध गेम्सही बनवता येतात.
कोडिंग वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. प्रत्येक जण त्याच्या गरजेनुसार कोडिंग शिकू शकतो. जसं की कम्प्युटर सॉफ्टवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, वेबसाईट, कॉमर्स वेबसाईट, गेमिंग वेबसाईट सगळ्यांचं कोडिंग असतं. पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज ही सर्वात सोपी कोडिंग लँग्वेज आहे. इयत्ता सहावीपासून कदाचित विद्यार्थ्यांना पायथनच शिकवली जाईल. ही प्रोग्रामिंग लँग्वेज C, C++, किंवा Java यांच्यापेक्षा सोपी आहे.
या पायथन लँग्वेजचा वापर कम्प्युटर सॉफ्टवेअर, वेबसाईट, मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये सर्वांत जास्त होतो. IT शिकण्यासाठी पायथन कोडिंग आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता दिसणार आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचा पाया म्हणजे कोडिंग भाषा इयत्ता सहावीपासून शिकवायला सुचवलं आहे; पण इथे पालकांनी एक मुद्दा समजून घ्यायला हवा की लगेच आपल्या मुलांना उद्यापासून कोडिंग क्लास लावू नका. ती जरी कोडिंग या वयात शिकली नाहीत तरी कॉलेज लेव्हलवर शिकू शकतील, तिथेही शिकली नाहीत तर मोठेपणी व्यावसायिक लेव्हलवर शिकतील. तेव्हाही शिकली नाही तरी काही बिघडत नाही, दुसरे कोणीतरी त्यांच्यासाठी सॉफ्टवेअर बनवून देतील.
सध्या मार्केटमध्ये कोडिंगचा जो सुळसुळाट सुरू आहे तो चुकीचा आहे. कोडिंगची भरमसाठ फी भरून मुलांना शिकवू नका. हे सर्व प्लॅटफॉर्म फ्री असतात. त्यामुळे कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नका. योग्य वेळेस शाळा कोडिंग शिकवतील. तोपर्यंत पालकांनी धीर धरावा.
तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर espaliersachin@gmail.com वर संपर्क साधावा.