इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवं शैक्षणिक धोरण
शालेय अभ्यासक्रमात होणार हे मोठे बदल
शालेय पुस्तकांमधली अतिरिक्त माहिती जाणीवपूर्वक कमी करायला हे नवं शैक्षणिक धोरण सांगत आहे. खरं तर शैक्षणिक धोरणावरून नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनतं. एनसीएफवरून NCERT आणि राज्य स्तरावर SCERT पाठ्यक्रम तयार करतात. याच धर्तीवर खाजगी पुस्तक प्रकाशनं अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार करतात. अनेक वेळा इयत्तांनुसार अभ्यासक्रम तयार करताना अतिरिक्त माहिती त्यामध्ये आणली जाते. खाजगी बोर्ड जसं की ICSE, IB, केंब्रिज बोर्ड यांच्या पुस्तकात प्रकाशक अतिरिक्त माहितीचा पुरवठा करतात. यांमुळे पुस्तकाची पानं वाढतात म्हणून पुस्तकाच्या किंमतीसुद्धा वाढतात. सरकारी पुस्तकाची पानं कमी जरी असली तरी त्यात धडे भरपूर असतात.

शिक्षण अभ्यासक आणि संस्थापक, इस्पॅलियर स्कूल.
(ईमेल – [email protected])
हे नवीन धोरण स्पष्टपणे सांगतं की पुस्तकातला मजकूर कमी करून शालेय अभ्यासक्रमात अधिक लवचीकता आणा. सध्या सर्व शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे असतात. पालकांचा देखील वर्षाच्या अखेरीस पुस्तकातले सर्व धडे शिकवले पाहिजेत असा अट्टाहास असतो. त्यामुळे शिक्षक ओव्हर पिरिएड्स घेऊन, जादा तास मागून अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या मागे असतात. बऱ्याच शाळेत दुसऱ्या दिवशी परीक्षा असते आणि टीचर शेवटचा धडा आदल्या दिवशी शिकवतात. उजळवणीला देखील वेळ देत नाहीत.
म्हणून या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये दोन वेळेस स्पष्ट सांगितलं आहे की अभ्यासक्रमातला मजकूर कमी करा. प्रकरण ४.५ मध्ये याचा उद्देश असा सांगितला आहे की जेव्हा अभ्यासक्रमाचा मजकूर कमी होईल तेव्हा विद्यार्थ्यांना वर्गात अधिक वेळ मिळेल; जो त्यांची तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगात आणायचा आहे. वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भरपूर चर्चा करायला वेळ मिळायला हवा. चिकित्सक विचार, प्रश्न विचारणं, कल्पनाशक्ती वाढवणं यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परस्परसंवादी चर्चा व्हायला हव्या. शिक्षकांना विविध उपक्रम घ्यायला पुरेसा वेळ मिळायला हवा. म्हणून अभ्यासक्रमातला मजकूर कमी करून प्रत्येक विषयातले आवश्यक घटक, धडे फक्त ठेवा.
तसंच, प्रकरण ४.३१ मध्ये धोरण हे सुद्धा सांगतं की अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करून त्या अभ्यासक्रमात अधिक लवचिकता आणा. पुस्तकातल्या धड्यांमध्ये लवचीकता आणा. म्हणजे घोकंपट्टीवर आधारित शिकवण्यापेक्षा रचनावादाने ते धडे शिकता शिकवताना शिक्षकांनी विविध साहित्यांचा वापर केला पाहिजे. शिक्षक शिकवताना शिक्षकांनी विविध साहित्यांचा वापर केला पाहिजे. शिक्षक शिकवताना विविध वस्तू-साहित्यांचा (teaching-aids) चा वापर फक्त नोकरी लागताना देणाऱ्या डेमो मुलाखतीत करतात. एकदा नोकरी लागली की हे टीचिंग एड्स कधी वापरले जात नाहीत. हे धोरण शिक्षकांना शिकवण्यासाटी साहित्य वापरण्याबाबत प्रोत्साहन देतं. म्हणून, मजकूर कमी करून रचनात्मक पद्धतीने शिकवायला सुचवत आहे.
मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना कुठलं पुस्तकं वापरायचं याचा अधिकार शाळा आणि शिक्षकांना हे धोरण देत आहे. स्थानिक संदर्भ असलेल्या गोष्टींचा समावेश करायला मान्यता देत आहे. जसं माझी शाळा नाशिकमध्ये आहे. नाशिकमधल्या काळाराम मंदिर इथे झालेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह हा पाठ्यपुस्तकामध्ये नाही. आता स्थानिक शाळा त्यांना योग्य वाटेल तर यावर एक धडा घेऊ शकतात. तसंच CBSE किंवा ICSE बोर्डच्या पाठ्यपुस्तकांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास हा जुजबी आहे कारण त्यांना पूर्ण भारताचा इतिहास कव्हर करायचा आहे. इथे शिक्षकांना निवडीचा अधिकार आहे की राज्य बोर्डमधला शिवाजी महाराजांवरचा संपूर्ण धडा तो/ती CBSE किंवा ICSE बोर्डमधल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.
४.३१ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जिथे शक्य असेल तिथे शिकवण्याकरता कोणती पाठ्यपुस्तकं वापरायची हे निवडण्याचा पर्यायदेखील शाळा आणि शिक्षकांकडे असेल. अपेक्षित राष्ट्रीय आणि स्थानिक साहित्याचा समावेश असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या संचामधून त्यांना पाठ्यपुस्तकं निवडता येतील. यामुळे शिक्षकांना त्यांच्या अध्यापन शैलीनुसार तिथल्या सामाजिक आवश्यकता लक्षात घेत विद्यार्थ्यांना अनुकूल अशा स्वतंत्र रीतीने शिकवता येईल. तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर [email protected] वर संपर्क साधावा.