इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नवं शैक्षणिक धोरण
पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात होणार हा मोठा बदल
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ताबडतोब कुठलं काम करायला सांगितलं असेल तर ते म्हणजे इयत्ता तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आणणं (फाऊंडेशन लिटरसी ऍण्ड न्यूमरसी). प्रश्न हा आहे की धोरण आपल्या सर्वांना हे काम तत्काळ हाती घ्यायला का सांगतं? सध्याचं जग दोन भागांत विभागलं आहे. B.C. अँड A.C. बिफोर कोव्हिड अँड आफ्टर कोव्हिड. बऱ्याच शासकीय, निमशासकीय रिपोर्टनुसार कोव्हिडआधी ४० ते ४५ % इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तरावरचं वाचन येत नाही; गणित सोडवता येत नाही. यालाच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणतात.
कोव्हिडनंतर ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार भारतातल्या किमान ६० ते ७० % पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तरावरचं वाचन-लेखन, संख्यांची मूलभूत क्रिया करण्याची क्षमता प्राप्त झाली नाही. बालवाडीमधून पहिलीमध्ये गेलेले विद्यार्थी आता इयत्ता तिसरीमध्ये आले. कोव्हिडमुळे दोन वर्षं शाळेत गेले नाहीत.
दोन वर्षांपूर्वीचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आता इयत्ता पाचवीमध्ये आले आहेत. या सर्वांचा प्रचंड ‘लर्निंग लॉस’ झाला आहे. याचाच अर्थ कोव्हिडआधी देखील पायाभूत साक्षरता ही समस्या होती पण कोव्हिडनंतर ती अधिकच वाढली आहे. विद्यार्थी शाळेत असूनही निरक्षर आहे. म्हणून हे धोरण अध्ययनासाठी एक तातडीची आणि आवश्यक पूर्वअट घालतं की २०२५ पर्यंत सर्व प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणं ही शिक्षणव्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिक निकड असेल.
तुम्ही पालक किंवा शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यावर बेसिकपासून काम करा. त्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीमधले असे विद्यार्थी शोधा ज्यांना वाचता येत नाही किंवा अंकज्ञान, संख्यांची बेरीज, वजाबाकी, भागाकार जमत नाही; त्यांच्यावर ताबडतोब काम करायला सुरुवात करा. धोरणामध्येच लिहिलं आहे की अशा विद्यार्थ्यांची संख्या पाच कोटींपेक्षा जास्त आहे.
तुम्ही सुजाण नागरिक असाल तर धोरणातल्या २.७ प्रकरणात म्हटलं आहे की सुशिक्षित व्यक्तीने जर एका विद्यार्थ्याला वाचायला शिकवायची जबाबदारी घेतली तर देशातली परिस्थिती झपाट्याने बदलेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यासाठी देशव्यापी मिशन बनलं पाहिजे. धोरण म्हणतं की राज्यसरकारने नागरिकांना समोरासमोर बसून शिकण्याला प्रोत्साहन द्यावं. तसंच, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी इतर नवीन कार्यक्रम सुरू करावे. इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अक्षरं, ध्वनी, शब्द, रंग, आकार आणि संख्या शिकण्याशी संबंधित उपक्रम आणि त्यावर कार्यपुस्तिका बनवावी. ज्यामध्ये पालकांच्या सहकार्याचा सहभाग असलेल्या विविध खेळांवर आधारित ३ महिन्यांचं एक ‘शाळा तयारी मॉड्यूल’ बनवावं. NCERT आणि SCERT यांनी हे मॉड्यूल बनवलं आहे.
भारतात कुपोषित किंवा आजारी मुलांची समस्या आहे. म्हणूनच पौष्टिक जेवण आणि सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या पोषण आणि मानसिक आरोग्यावर काम होणार आहे. संशोधनात असं आढळून आलं की पौष्टिक नाश्त्यानंतरचे सकाळचे काही तास अधिक आकलन क्षमतेची गरज असलेल्या अवघड विषयांच्या
अभ्यासासाठी उत्तम असतात. या वेळेत लक्षात छान राहतं म्हणून दुपारच्या जेवणाव्यतिरिक्त एक साधा पण पौष्टिक नाश्ता देऊन या तासांचा फायदा घ्यायला सांगितलेलं आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा पायाभूत साक्षरता विकास समाधानकारक नाही अशा विद्यार्थ्यांना या वेळेस शिकवलं तर फायद्याचं होईल.
मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर शाळेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या अभ्याक्रमात वाचणं, लिहिणं, बोलणं, मोजणं, गणितीय विचार यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल. यांत प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी रचनात्मक मूल्यांकनाचा समावेश असेल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आवड निर्माण करण्यासाठी दिवसातले विशिष्ट तास आणि वर्षभर नियमित कार्यक्रम शाळेला बसवायचे आहेत. मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर नव्याने भर देण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल.
शिक्षकांनी जूनला शाळा सुरू होतानाच असे विद्यार्थी शोधून सुरुवातीलाच वर्गाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करावी. यासाठी पूर्वप्राथमिक विद्यार्थी-शिक्षक प्रमाण ३० % पेक्षा कमी हवं असं सुचवलं आहे. त्यासाठी शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरायला सांगितल्या आहेत. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थी असलेल्या भागात विद्यार्थी-शिक्षक प्रमाण २५ % पेक्षा कमी राखण्याचं उद्दिष्ट आहे.
थोडक्यात काय, संपूर्ण धोरणामध्ये तातडीने करण्याचं कार्य म्हणजे पाया मजबूत करणं. पहिल्या बारा वर्षांत विद्यार्थ्याच्या मेंदूची सर्वाधिक जडणघडण होते. या वयातच वाचन, लेखन, गणित जमलं तर पुढे कधीही ते शिक्षणात मागे पडत नाहीत. म्हणून सर्वांनी मिळून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर काम करणं आवश्यक आहे.
तुमच्या आजूबाजूला असलेले हे विद्यार्थी शोधा आणि राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सामील व्हा. आपल्याला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात काही प्रश्न असतील तर मला espaliersachin@gmail.com वर मेल करून विचारू शकता.