इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– नवे शैक्षणिक धोरण –
अशी असेल दप्तर विरहित १० दिवस शाळा
नवीन शैक्षणिक धोरणामधील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुचवलेल्या एका मजेशीर अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊया. इयत्ता सहावी ते दहावी या तीन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी दहा दिवस शाळेत विनादप्तर यायचं आहे. म्हणजे या दहा दिवसांत विद्यार्थ्यांनी शाळेत स्कूल बॅग आणायची नाही. मग या काळात ते काय करतील? हे दहा दिवस कुठले असतील?
धोरणाने याबाबत 4.26 प्रकरणामध्ये मार्गदर्शन केलं आहे. इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीमध्ये शैक्षणिक वर्षात मुख्याध्यापक केव्हाही हे दप्तर विरहित दहा दिवस निवडतील. या काळातील उपक्रमासाठी एन.सी.ई.आर.टी. मार्गदर्शन करणार आहे. हा गरज आणि कौशल्यावर आधारित दहा दिवसांचा अभ्यासक्रम असेल. ज्यात विद्यार्थ्यांना सुतारकाम, इलेक्ट्रिकचं काम, धातुकाम, बागकाम, कुंभारकाम यांसारखा व्यावसायिक कलांचा अनुभव देण्यात येईल. ही सर्व कामं त्यांनी प्रत्यक्ष करायची आहेत. या दहा दिवसांत पाठ्यपुस्तकातील कोणतेही धडे शिकवणार नसून विद्यार्थी ही कौशल्य समजून घेतील. धोरणाच्या प्रकरण 4.26 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की, इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान शिकवण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला जाईल. कला, प्रशमंजुषा, क्रीडा आणि व्यावसायिक हस्तकला यांचा समावेश असलेल्या आणि विविध प्रकारे समृद्ध करणाऱ्या उपक्रमासाठी वर्षभर दप्तर विरहित दिवसांना प्रोत्साहन दिलं जाईल.
आधीच्या लेखांमध्ये आपण हे समजून घेतलं की हे पहिले असं शैक्षणिक धोरण आहे जे बालमेंदू जडणघडणीच्या अनुषंगाने विचार करताना दिसतं. विद्यार्थी पाच इंद्रियांनी जेवढे विविध अनुभव घेतील तेवढी मेंदूमधील पेशींची जुळणी अधिक घट्ट होईल. तेवढा विद्यार्थी अधिक हुशार होतो. त्यासाठी हातांनी अधिक कामं करायला हवीत.
प्रत्येक विद्यार्थ्याने राज्य आणि स्थानिक समुदायाने ठरवलेला आणि स्थानिक कौशल्य गरजांवर आधारित एक मजेदार अभ्यासक्रम निवडायचा आहे; ज्यामुळे त्यांना व्यावसायिक कलांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. कामाची पाहणी करता येईल.
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागा, स्मारकं, स्थानिक कलाकार आणि कारागीर तसंच गाव/तालुका/जिल्हा/राज्य इथल्या उच्च शैक्षणिक संस्था यांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शाळाबाहेरील उपक्रमांची नियमितपणे ओळख करून दिली जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दहा दिवसांमध्ये अशी किती व्यावसायिक कौशल्य विद्यार्थी शिकतील? याचा उद्देश व्यावसायिक कौशल्याची ओळख तर आहेच पण श्रमदानसुद्धा आहे.
इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान कधीतरी सर्व विद्यार्थी एका दप्तर विरहित दहा दिवसांच्या उपक्रमामध्ये सहभागी होतील; ज्यात ते स्थानिक व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे सुतार, कुंभार,माळी, कलाकार यांच्या हाताखाली शिकाऊ म्हणून काम करतील. व्यावसायिक विषय शिकण्याकरता अशा प्रकारच्या इंटर्नशिपच्या संधी इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्यांच्या कालावधीमध्ये त्यामुळे मुख्याध्यापकांनी हे दहा दिवस स्वतंत्र काढून स्थानिक व्यावसायिकाला निमंत्रण देऊन विद्यार्थ्यांना त्याच्या बरोबर चर्चासत्र, डेमो आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल असं नियोजन करायचं आहे.
तसंच अधिक माहितीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रम घेता येतील. असे अनुभव देणारे उपक्रम आवश्यकच आहेत. विद्यार्थी जेव्हा हाताने फर्निचर बनवतील, मातीची भांडी बनवतील तेव्हा त्यांची सर्जनशीलता वाढेल. वेगळं काम करण्याचा आनंद मिळेल. सोबतच मेंदूचा विकास होईल. जेव्हा ते विविध व्यावसायिकांशी चर्चा करतील, निरीक्षण करतील तेव्हा त्यांना व्यवसाय करण्याचं बेसिक ज्ञान मिळेल. मग एकदा रुची निर्माण झाली की उन्हाळ्याच्या सुटीत ते त्यांच्याबरोबर इंटर्नशिप करू शकतात. काही व्यावसायिकांना प्रत्यक्ष आमंत्रित करणं वा त्यांना येणं सोयीचं नसेल तर त्यांचं ऑनलाईन सेशन सुद्धा ठेवता येईल.
आम्ही लहानपणी दिवाळी आली की फटाके विकायचो. फटाके विकणारा विक्रेता व्हायचं हे ध्येय काही त्यामागे नसे. पण त्या प्रोजेक्टमुळे बरंच व्यावसायिक कौशल्य शिकायला मिळालं. जे पुढे मोठेपणी व्यवसायात उपयोगी पडलं. असाच उपयोगी पडणारा हा दहा दिवसांचा उपक्रम आहे. सहावी, सातवी, आठवी अशी तिन्ही वर्षं खरं तर विद्यार्थ्यांना हा अनुभव घेता आला तर कौशल्य विकासाला अधिक बळकटी येईल.
तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत काही प्रश्न असतील तर espaliersachin@gmail.com वर संपर्क साधावा.