प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती पदक विजेता
‘विशेष’ खेळाडू: स्वयम पाटील
पंतप्रधान राष्ट्रीय बालपुरस्काराने नाशिकच्या स्वयम पाटील याचा गौरव झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर स्वयमचे नाव चमकते आहे. आजवरचा त्याचा प्रवास अतिशय खडतर आणि अशक्य वाटावा असाच आहे. आज आपण तोच जाणून घेणार आहोत….

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
ज्या मुलाला जन्मतः down syndrome ने पछाडले आहे, जो हृदयाच्या गंभीर रोगातून नुकताच सावरला आहे, ज्याचे नाक, कान आणि घसा याचे तीन शस्त्रक्रीया झाल्या आहेत, ज्याला थायरॉइड सारख्या गंभीर आजारानेही सोडलेले नाही आणि ज्याचा IQ हाही त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूप कमी आहे, असा केवळ वय वर्षे १४ असलेला मुलगा सध्या काय करीत असेल? आपल्या सगळ्यांच्या अंदाजानुसार घरी अंथरुणाला खिळून असेल आणि त्याचे आई-वडिल नशिबाला दोष देत त्याची शुश्रूषा करीत असतील. असे जर आपल्याला वाटत असेल तर आपला अंदाज साफ चूक आहे…
स्वयम पाटील असे या अवलियाचे नाव आहे. तो वरील सर्व व्याधींनी जर्जर असूनही त्याचे आई-वडिल , स्विमिंगचे प्रशिक्षक हरी सोनकांबळे, जाजू हायस्कूलचे शिक्षक अमित निचीत, डॉक्टर राजेंद्र खरात या सर्वांचे खास प्रयत्न आणि स्वतः स्वयमची मेहनत यामुळे २०२२ चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता ठरला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळालेला आहे.
त्याचा पराक्रमच तसा आहे. सोनकांबळे सर स्विमिंग पूलवर रोज सहा तास त्याच्याकडून सराव करून घेतात. स्वयमही न कंटाळता शरीर सुदृढ होण्यासाठी उत्साहाने त्यांना सहकार्य करतो, हे विशेष. स्विमिंगमुळे तो शरीर आणि मनाने इतका कणखर झाला आहे की, त्याने एलिफंटा लेणी ते गेटवे हे १४ किलोमीटर अंतर ४ तास आणि १९ मिनिटात पूर्ण करुन विक्रम केला आहे. तसेच Sunk Rock ते गेटवे हे पाच किमी अंतर अवघ्या एका तासात पूर्ण करून (२०१७ मध्ये वय १०) विक्रम केला आहे. याची दखल इंडिया इन वर्ल्ड रेकॉर्डस आणि Limca book of records यांनी घेतली आहे. अवघ्या ११ वर्षांचा असताना तो थायलंड येथे आई-वडिलांशिवाय स्विमींग स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रशिक्षक सोनकांबळे यांच्याबरोबर राहिला. आणि Youngest Swimmer of the Tournament चे बक्षिस घेऊन आलाही.
https://twitter.com/narendramodi/status/1485617218352476167?s=20
सध्या स्वयम २०२४ च्या Para Olympicसाठी जोरदारपणे तयारी करत आहे. तो स्विमिंगच्या चारही प्रकारात (म्हणजे फ्री स्टाईल, बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक आणि बॅक स्ट्रोक) सर्व सामान्य मुलांबरोबर सराव करतो. त्यांच्या स्पर्धेत भागही घेतो आणि पदकेही जिंकतो. त्याने आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ४० सुवर्ण, ७ रौप्य आणि २८ ब्रांझ पदके मिळवली आहेत. ही पदके त्याने मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि इतर अनेक ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन मिळविली आहेत.
२०२४ च्या Para Olympic मध्ये त्याला फक्त भाग घ्यायचा नाही तर पदक जिंकायचे आहे. पण त्यासाठी लागणारे खर्चिक advanced Training आणि इतर खर्च यांचा मेळ बसविणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. कारण त्याच्या वडिलांची कोरोना काळात गेलेली नोकरी. आणि आई मतिमंद मुलांसाठी स्वयंसेवी संस्था चालवते आहे. या पार्श्वभूमीवर स्वयमला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण त्याची जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनत शिवाय त्याला मदत करणाऱ्याचे प्रयत्न त्याला निराश करणार नाहीत!