इंडिया दर्पण विशेष – नवोदित
नाशिकमधील पहिली महिला दुचाकी स्पर्धक
दीपिका दुसाने
पारंपरिक खेळांमध्ये करिअर करण्याची इच्छा असणे गैर नाही. पण, अपारंपरिक खेळात रस घेणे आणि त्यात नाव कमावणे हे अत्यंत जिकीरीचे असते. आणि तेच नाशिकमधील एका तरुणीने केले आहे. त्यामुळेच तिची कारकीर्द कौतुकास्पद ठरत आहे. दीपिका दुसाने या तरुणीचीच ही यशकथा आपण आज जाणून घेणार आहोत…
दुचाकी रेसिंगसारख्या पूर्णपणे male-dominated आणि रफ-टफ खेळात एखादी महिला उत्साहाने भाग घेते आणि हे आपले क्षेत्र नाही हे समजले की पुन्हा फंदात पडत नाही, हा आजवरचा इतिहास आणि अनुभव. पण या खेळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या नियमाला आव्हान देण्याचे काम नाशिकमधील एका महिलेने अलीकडेच यशस्वीरित्या करुन दाखवले. तिचे नाव आहे दीपिका दुसाने!
गेल्या सात वर्षांपासून ही धाडसी मुलगी चक्क ३५० अश्व शक्तीची बुलेट चालवते आहे आणि त्यामुळेच जेंव्हा नाशिकमध्ये एमआरएफ टू व्हिलर राष्ट्रीय Rally होत आहे. असे दीपिकाला समजले. तेव्हा तिच्यातील साहसी व्यक्ती जागी झाली. तिने हितचिंतक मित्रांच्या साहाय्याने फक्त महिनाभर सराव करून सरळ स्पर्धेत बेधडकपणे भाग घेतला.
सुदैवाने तिच्याबरोबर पुण्यातील दोन स्पर्धक (दीक्षा श्रीवास्तव आणि वनिसा जोसेफ), सातारा येथील तनिशा शानभाग आणि दीपिकाची आयडॉल पाच वेळा राष्ट्रीय विजेती झालेली बंगलोरची ऐश्वर्या पिसे याही सहभागी होत्या.
या सर्व तरुणींनी घोटी-वैतरणा रस्त्यावरील घानोली या दुर्गम भागातील अतिशय अवघड, माती, दगड, वाळू असलेली, उंच सखल आणि नागमोडी वळणे असलेली ५५ किलोमीटर स्पर्धात्मक मार्गाची रेस पुरुषांच्या बरोबरीने पूर्ण केली. हे सुद्धा कौतुकास्पद! दीपिकाचे खास कौतुक अशासाठी करायला हवे की, स्पर्धेचा शून्य अनुभव. तसेच तिने इतक्या खडतर मार्गावर एकदाही न पडता तिने रेस पूर्ण केली. इतकेच नव्हे तर १३:५ किमीच्या चार फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत timing मध्ये लक्षणीय सुधारणा केली.
बघा तिच्या वेळा:
१ फेरी १५ मि ४१ सेकंद
२ फेरी १५ मि ०८ सेकंद
३ फेरी १४ मि ५० सेकंद
४ फेरी १४ मि ४१ सेकंद
रेसिंगमधील जाणकार सेकंद सेकंदाचा फरक म्हणजे काय हे समजतात. त्यांना दीपिकाचा पराक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.
“आता मी प्रोफेशनल रेसर होणार आहे. त्यासाठी लागणारा फिटनेस, गाडीची तांत्रिक माहिती करून घेणे. शिवाय वेळ आल्यास स्वतःच झटपट दुरुस्ती करणे, भरपूर सराव हे माझे उर्वरित आयुष्यातील ध्येय आहे” असे बिनधास्तपणे या जुळ्या (एक मुलगा, एक मुलगी वय १० वर्ष) मुलांच्या आईने जाहीर केले. जी बेडर वृत्ती बुलेट सारखी अवजड गाडी चालवायला लागते. तीच वृत्ती तिला या वयात (३३) प्रोफेशनल रेसर व्ह्ययचे हा निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडली असावी.
हा खेळ खर्चिक असल्याने sponsorship शिवाय पुढे जाणे अवघड आहे. हे ती जाणून आहे. म्हणूनच तिने
sponsorship साठी आवाहन केले आहे. प्रश्न फक्त एकच आहे. दीपिकाला सातत्याने उत्तम कामगिरी करावी लागेल. सुपर फिट रहावे लागेल. रेसिंगमधील नवननवीन तंत्रे आणि मंत्रे शिकावी लागतील. तथापि दीपिकामधील जिद्द आणि हिम्मत तिला यशाचा हा खडतर मार्ग दाखवल्या शिवाय रहाणार नाही, हे निश्चित.