इंडिया दर्पण विशेष – नवोदित –
नेमबाज अंजली भागवत आणि सौरभ व्यवहारे
आज आपण अशा दोन नवोदित खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी त्यांचे कर्तृत्व उत्तमरित्या सिद्ध केले आहे. आव्हाने अनेक असले तरी न डगमगता नेमबाज अंजली भागवत आणि सौरभ व्यवहारे ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यांना यश नक्कीच मिळेल…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
सुप्रसिद्ध क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांनी आपली पोलिस दलातील कारकीर्द संपल्यानंतर नाशिक येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी नाशिकच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्यच बदलले.
स्वतः उत्तम स्विमर, बिलियर्ड्सपटू तसेच राष्ट्रीय दर्जाचे नेमबाज असलेल्या बाम सरांनी या सर्व आणि इतरही खेळात नाशिक राष्ट्रीय नकाशावर यावे आणि नाशिकचे खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे या ध्येयासाठी स्वतःला वाहून घेतले..
त्याचाच परिणाम म्हणून नेमबाजी या खेळाची क्रीडा प्रबोधिनी बाम सरांच्या प्रयत्नांनी राज्य सरकारने नाशिक येथे सुरु केली. शिवाय एक्सेल टार्गेट नावाचे नेमबाजीचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यांना कै. मोनाली गोऱ्हे आणि श्रद्धा नालमवार या दोन अतिशय dedicated आणि उत्साही सहाय्यक मिळाल्या. त्यामुळे आज नाशिकचा नेमबाजी या खेळात राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये गेल्या दोन दशकात अंदाजे ५० आंतरराष्ट्रीय ५०० राष्ट्रीय आणि अगणित राज्य दर्जाचे नेमबाज तयार झाले आहेत. हे सर्व बाम सर आणि त्यांच्या विश्वासू सहकार्यामुळेच. बाम सर आणि मोनाली गोऱ्हे यांच्या अकाली निधनानंतर श्रद्धा नालमवार नाउमेद न होता नेमबाजी खेळ पुढे नेत आहेत. त्यांचे दोन शिष्य नाशिकचे नाव उज्वल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते म्हणजे सौरभ व्यवहारे आणि अंजली भागवत.
वीस वर्षीय सौरभ व्यवहारे हा गेली जरी फक्त चार वर्षे नेमबाजी या खेळाला जोडला गेला आहे पण त्याची प्रगती कौतुकास्पद आहे. अर्थशास्त्र या विषयात बीए करणाऱ्या सौरभने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तोल या प्रकारात पश्चिम विभागीय स्पर्धेत रौप्य पदक (५५४/६०० ) प्राप्त केले आहे. शिवाय तो गेली चार वर्षे अनेक राज्य पातळीवरील स्पर्धेत १० मी एअर पिस्तोल, २५ मी स्पोर्ट्स पिस्तोल, standard pistol तसेच rapid fire या प्रकारच्या खेळात आपली चमक दाखवीत आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण केल्यावर त्याला नियमांनुसार २५ मी स्पोर्ट्स आणि standard पिस्तोल मध्ये भाग घेता येणार नाही. तो rapid fire मध्ये आपले नैपुण्य दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने नेमबाजी मध्येच करिअर करायचा निश्चय केला आहे. तो यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही, असे म्हणायला हरकत नाही ….
दुसरी नेमबाजीतील खेळाडू ही एका मोठ्या ओलिम्पिक नेमबाजीच्या खेळाडूचेच नाव धारण करुन आलेली आहे. तिचे भागधेय (आणि ध्येयही) ती जन्मत:च घेऊन आली आहे. हे सुप्रसिद्ध नाव म्हणजे अंजली भागवत. अवघ्या १४ वर्षे वयाच्या चिमुरडीलाही नेमबाजीच्या खेळाने पछाडले आहे. श्रद्धा नालमवार यांच्या मार्गदर्शनाने अंजली सध्या १० मी एअर पिस्तोल या प्रकारात कनिष्ठ गटात धुमाकूळ घालत आहे. तिने अजून एकही पदक मिळविले नसले तरीही तिची चमक, प्रगती आणि समज तिला खूप उंचीवर नेऊ शकते. तसा विश्वास प्रशिक्षक श्रध्दा नालमवार यांना आहे. राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्यासाठी तिला बोलावले जाते, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे…
आता प्रश्न एकच आहे तो म्हणजे हा खेळ अतिशय महागडा आहे. प्रायोजक जर मिळाले नाही तर वाटचाल कठीण असते. तसेच ऑलिम्पिक खेळ असल्याने आणि एकूण ४८ ऑलिम्पिक पदके मिळविण्याची शक्यता या खेळात आहे. प्रचंड स्पर्धेला या दोघांना आणि येणाऱ्या इतरांना तोंड द्यावे लागेल. त्याची तयारी करावी लागेल… त्यासाठी लागणारा फिटनेस आणि फोकस टिकवून शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता सातत्याने गुणवत्ता दाखवावी लागेल….ते जमले तर यश तुमचेच!