तलवारबाज ऋत्विक शिंदे आणि आदिती सोनवणे
नाशिक शहर परिसर आणि जिल्हा हा अनेक नामवंत खेळाडूंची खाण आहे. तलवारबाजीमध्ये नाशिकचे नाव राष्ट्रीय नकाशावर ठळकपणे आणणारे ऋत्विक शिंदे आणि आदिती सोनवणे हे त्यापैकीच एक. आज त्यांच्याविषयीच आपण जाणून घेऊ…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
तलवारबाजी ऊर्फ फेंसिंग हा फक्त ऑलिंपिकच्यावेळी पहायला मिळणारा खेळ नाशिकमध्ये आला तो १९९० च्या दशकात. तोही तलवारबाजीचे खेळाडू आणि नंतरचे या खेळाचे सर्वेसर्वा अशोक दुधारे यांच्या अथक प्रयत्नाने. गेल्या ३० वर्षात नाशिकमध्ये सुमारे १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि ५०० पेक्षा जास्त राज्य पातळीवर खेळाडू निर्माण झाले. विशेष म्हणजे त्यातील १३ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत.
राजू शिंदे याच्या सारखा खेळाला वाहिलेला प्रशिक्षक गेले अनेक वर्ष नवनवीन खेळाडू नियमितपणे न थकता एखादे मिशन चालविल्या प्रमाणे घडवित आहे. त्याच्या कष्टाचे फळ म्हणजे सध्या राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धात चमकदार कामगिरी करणारे दोन प्रमुख खेळाडू म्हणजे ऋत्विक शिंदे आणि आदिती सोनवणे.
ऋत्विक हा विशीतला उत्साही तरुण. त्याचे वडील राजेंद्र शिंदे हे हॉलिबॉलचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. त्यामुळे घरातूनच ऋत्विकला खेळाचे बाळकडू मिळाले आहे. पण त्याने निवडला तलवारबाजी हा खेळ. तो या खेळात केवळ गुणवत्तेवर महाराष्ट्रातर्फे नियमित राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवित असतो.
ऋत्विकचा खेळ गतिमान आणि आक्रमक आहे. त्याला प्रतिस्पर्धी किती skillful आहे हे झटकन कळते. त्यानुसार तो स्वतःचा खेळ लगेच adjust करतो. Foil या प्रकारात त्याने महाराष्ट्रला तिनदा कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात सांघिक कांस्य तर एकदा वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले आहे ते उगीच नाही. तो अतिशय महत्वाकांक्षी असल्याने किमान आशियाई पदक त्याला मिळविता येईल असा विश्वास प्रशिक्षक राजू शिंदे व्यक्त करत्तात.
शिंदे यांची शिष्या आदिती सोनवणे ही खेळात निपुण आहे. प्रतिस्पर्धी आणि सामन्यातील परिस्थिती याची तिला उत्तम जाण असते. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या डावपेचात ती बदल करण्यात निष्णात आहे. आदितीचा बचाव अतिशय भक्कम आहे, असे अनेकदा दिसून आले आहे. या गुणाचा तिला वरिष्ठ स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळताना खूपच उपयोग होणार आहे. गेली किमान तीन वर्षे ती ranking मध्ये सुपर 8 आपले स्थान टिकवून आहे हे विशेष.
आदिती फक्त १८ वर्ष वयाची असूनही तीन वरिष्ठ स्पर्धा खेळली आहे. तसेच तिने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक सुवर्ण आणि रौप्य पदके आपल्या संघाला मिळवून दिली आहेत.
ऋत्विक आणि आदिती हे दोघेही अतिशय गुणवंत आहेत. त्यांच्या खेळात सातत्य राहिले पाहिजे. तसेच खेळाचा दर्जा सतत त्यांनी उंचविला तर कितीही तीव्र स्पर्धा असली तरीही ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होऊ शकतात. यात तिळमात्र शंका नाही.