‘खो खो’च्या अबोल त्रिमूर्तीची बोलकी कामगिरी!
वृषाली भोये, कौशल्या पवार आणि सविता दीवा या तीन खो खो पटूंनी आपल्या महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. अत्यंत कष्टाळू आणि उत्साही असलेल्या या तिन्ही खेळाडू नक्कीच नाशिकचे भूषण ठरणार आहेत. आज त्यांच्याच वाटचालीचा आपण आढावा घेणार आहोत.
क्षणाक्षणाला प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या आणि प्रेक्षकांची मने हमखास जिंकणाऱ्या खो खो सारख्या प्रेक्षणीय खेळाला केवळ ग्लॅमर नाही. आणि या खेळात पैसा नसल्याने शहरी मुला-मुलींनी कधीच त्याकडे पाठ फिरविली आहे. खो खो खेळाडूला रिबॉक, आदिदास किंवा तत्सम ब्रँडचे महागडे कपडे किंवा किमती उपकरणे घालून मिरवता येत नाही हेच या खेळाचे अपयश!
अशा निराशाजनक परिस्थितीत माजी खो खो खेळाडू मंदार देशमुख, उमेश आटवणे, गीतांजली सावळे आणि त्यांचे सहकारी यांनी हा खेळ जिवंत ठेवण्याचाच नव्हे तर पुन्हा प्रेक्षकप्रिय करण्याचा चंग बांधला. शहरी मुली मिळणार नाही ही वस्तुस्थिती स्वीकारुन नाशिकच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील १०-१२ वयाच्या मुलींना प्रशिक्षण देण्याचा निश्चय केला. त्यांच्या माता-पित्याची कशीबशी मने वळवून ३० मुली आणि १६ मुले नाशिकला खो खो प्रबोधिनीत आणल्या आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली!
आज चार वर्षानंतर मंदार देशमुख आणि इतरांनी केलेल्या कष्टाची गोड फळे यायला सुरुवात झाली आहे. प्रबोधिनीतील वृषाली भोये, कौशल्या पवार आणि सविता दीवा या खेळाडूची भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १८ वर्षांखालील संघात निवड झाली आणि त्यांनी दमदार खेळ करून महाराष्ट्राला लागोपाठ दुसऱ्यांदा अजिंक्यपद मिळवून दिले आहे.
इतकेच नव्हे तर अंतिम सामन्यात एकूण स्पर्धेत २४ गडी बाद करणाऱ्या वृषाली भोयेला भारतातील सर्वोत्कृष्ट ‘आक्रमक’ म्हणून पुरस्कार मिळाला तर सविता दीवा हीने आपल्या दमदार संरक्षणाने तर कौशल्या पवारने अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप पाडली. त्यापूर्वी झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधिनीच्या या तिघींनी आपल्या धारदार खेळाने नाशिकला ३० वर्षा नंतर अंतिम फेरीत पोहोचविले. वृषालीने अंतिम सामन्यातील सात गड्यांसह स्पर्धेत एकूण ३२ गडी बाद करुन प्रेक्षणीय खेळ केला. सहाजिकच स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक खेळाडूचा पुरस्कार तिने पटकावला तर कौशल्या पवार अष्टपैलू खेळ करुन आणि सविता दीवा उत्तम संरक्षण करुन प्रेक्षकांची सातत्याने वाहवा मिळवित राहिल्या!
गेल्या काही वर्षांपासून त्या रोज पाच तास सकाळ-संध्याकाळ सराव करीत आहेत. त्या कष्टाचे यश त्यांच्या पदरी पडत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. खेळाव्यतिरिक्त या सर्व मुलींना शिक्षण आणि नृत्य, नाट्य, चित्रकला, कविता करणे, व्यक्ती विकास आदी गोष्टीचीचेही प्रशिक्षण दिले जाते, हे विशेष! मागील वर्षीदेखील याच प्रबोधिनीतील मनीषा पडेर, निशा बैजल आणि सोनाली पवार यांनी राष्ट्रीय मैदान गाजवलेच होते. खरं तर जरी नाव तिघींचेच होत असले तरीही तर सर्वच मुली अतिशय गुणवंत आहेत. त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याने त्या खो खो आणि इतर क्षेत्रात चमकणारच. या तिघी केवळ प्रातिनिधिक आहेत, असे म्हटले तरी चालेल. नाशिकचे नाव खो खोच्या नकाशावर ठळकरित्या आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रबोधिनीलाच्या सर्व संबंधिताना आणि मुख्यत्वे या तीन देवींना मानाचा मुजरा!!