‘खो खो’तील वीर अभिमन्यू
मैदानी खेळात नवीन आणि भरपूर दमसास तसेच काटक खेळाडू हवे असतात. अशा खेळाडूंसाठी आजूबाजूच्या गावपातळीवर जा. तिथे हवे असलेले हिरे निश्चित गवसतील, असे हल्ली प्रशिक्षक म्हणतात. ते अगदी खरे आहे. त्याचा प्रत्यय दिलीप खांडवीच्या रुपाने येतो आहे.
नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रतील तसेच राष्ट्रीय खो खोची मैदाने गेली तीन वर्षे आपल्या तुफानी खेळाने सातत्याने गाजवीत असलेला खेळाडू म्हणजे दिलीप खांडवी. नाशिक जवळच्या सुरगाणा येथील कृष्णनगर या अतिदुर्गम पाड्यातील तो खेळाडू आहे. त्याला सुदैवाने मंदार देशमुख, उमेश आटवने यांच्या सारखे खेळाला वाहिलेले प्रशिक्षक त्याला लाभले आहेत. या दोन्ही प्रशिक्षकांमुळेच महाराष्ट्राला उद्याचा अत्यंत गुणवान खो खो खेळाडू मिळाला आहे.
१५ आणि १७ तसेच १९ आणि २१ वर्षांखालील प्रत्येक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत दिलीपने आपल्या गतिमान पाठलाग आणि दमदार संरक्षण याने मैदाने गाजवले आहे. त्यामुळेच सूरत येथील राष्ट्रीय कुमार स्पर्धेत भारतातील सर्वोत्तम उगवत्या खो खो खेळाडूसाठी असलेला ‘वीर अभिमन्यू’ पुरस्कार देऊन दिलीपला गौरवण्यात आले आहे. याचस्पर्धेत तो राज्याचा कर्णधारही होता. अशाच पराक्रमाची पुनरावृत्ती त्याने जम्मू येथे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत केली. तिथेही कर्णधार आणि आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान त्याला प्राप्त झाला. ही गौरवास्पद बाब आहे.
खेलो इंडियातील १७ आणि २१ वर्षांखालील संघात पुन्हा सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार दिलीपने प्राप्त केला आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान असाच हा खेळाडू आहे. त्याचे कर्तृत्व मोठे आहे. वरिष्ठ संघात दाखविण्यासाठी तो सज्ज आहे. दिलीप सध्या अल्टिमेट खो खो लिगसाठी निवडलेल्या भारतातील अव्वल २५ खेळाडूत समाविष्ट आहे. त्यासाठी त्याचे प्रशिक्षण भारतीय शिबिरात सुरू आहे.
खो खो मधील जाणकार हे दिलीपकडे मोठ्या आशेने आणि अपेक्षेने लक्ष ठेवून आहेत. दिलीपने अजून तरी या सर्वांचा अपेक्षाभंग केलेला नाही. तो ते करणारही नाही, अशी खाक्षी प्रशिक्षकांना आहे. प्रशिक्षकांच्या मते तो अति प्रामाणिक, सरळमार्गी, जिद्दी आणि Fast learner आहे. दिलीपच्या रूपाने महाराष्ट्राला वरिष्ठ संघात हमखास विजय मिळवून देऊ शकेल. महाराष्ट्राची खो खोतील अनेक वर्षांची विजयाची परंपरा चालू ठेवू शकेल. असा हा तुफानी खो खो पटू नाशिकने देऊ केला आहे. त्याच्या विलक्षण नैसर्गिक गुणवत्तेचा फायदा राष्ट्रीय खो खो संघटना कशी करते हे आता बारकाईने पाहिले जाईलच. तोपर्यंत क्रिकेट समालोचक इयान बिशपच्या सुप्रसिद्ध शब्दात सांगायचे तर Remember the name ..Dilip Khandavi!!