ज्युडोतील भारताचे उद्याचे आशास्थान :
आकांक्षा शिंदे आणि अजिंक्य वैद्य
आज आपण ज्युडो खेळातील दोन नवोदित आणि अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकांक्षा शिंदे आणि अजिंक्य वैद्य यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. हे दोघेही केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचेही नाव पुढे नेतील, अशी खात्री आहे.
ज्युडो हा ऑलिम्पिक खेळ असला तरीही लोकप्रियतेच्या शिडीवर ज्युडो या मूळच्या जपानच्या राष्ट्रीय खेळाचे भारतातील स्थान बरेच खालच्या पायरीवर आहे. त्यामुळेच प्रायोजक मिळायला अडचण येते. वर्तमानपत्रातही ज्युडोपटूंना स्थान सहसा मिळत नाही. इंग्रजी वर्तमान पत्रे तर ज्युडोची दखलही घेत नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही नाशिकमध्ये रत्नाकर आणि भास्कर पटवर्धन, माधव भट, रवींद्र मेटकर आणि इतर सहकारी यांनी स्वतः प्रशिक्षण घेऊन सुमारे ६० वर्षांपूर्वी मित्र विहार येथे ज्युडोचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले. अशा रितीने नाशिकमध्ये कुस्तीच्या जवळपास जाणणारा आणि स्वसंरक्षण करणारा हा चित्तवेधक खेळ सुरु झाला.
आजही मित्र विहार येथे तसेच यशवंत व्यायाम शाळेत आणि जिल्हा क्रीडा कार्यालयात ज्युडोचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. तेथून शेकडो मुले आणि मुली नियमित प्रशिक्षण घेत आहेत. ती मुले आणि मुली, शालेय, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक वर्षांपासून नियमितपणे चमकदार कामगिरी करतात, हे आपण पाहतोच. काही खेळाडू तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवून आले आहेत. त्यापैकी दोघे म्हणजे आकांक्षा शिंदे आणि अक्षय वैद्य.
सध्या ओझर येथील HAL कॉलेजला कॉमर्स मध्ये आकांक्षा शिक्षण घेत आहे. गेली सुमारे दहा वर्षे ती योगेश शिंदे, सुहास मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युडो शिकून इतकी निष्णात झाली आहे की, तिने इंग्लंड मध्ये २०१९ साली आपल्या गटात अव्वल स्थान मिळविले. त्यामुळेच तिने भारताला चक्क सुवर्णपदकही प्राप्त करुन दिले. परिणामी देशाचे नाव रोशन केले. पण तत्पूर्वी तिचा पराक्रम असा आहे की, २०१५ पासून ते आजपर्यंत झालेल्या सर्व शालेय आणि वयोगटाच्या राज्य स्पर्धेत तिने पहिला क्रमांक सोडलेला नाही. म्हणजेच सलग सहा वर्षे ती सुवर्णपदकाची मानकरी आहे! राष्ट्रीय स्पर्धेत जरी तिला असा पराक्रम करता आला नसला तरीही ती शेवटच्या आठ खेळाडूत असतेच. एकदा तिने ब्रॉन्झ पदकही मिळविले आहे. कॊणत्याही खेळाडू प्रमाणेच तिला ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. तिचे जिमनॅस्टिक आणि ज्युडोतील प्रशिक्षक वडील हेच गुरु असल्याने हे स्वप्न साकार होऊ शकते.
अजिंक्य वैद्य हा देखील वरील गुरुंच्याच तालमीत तयार झाला आहे. त्यामुळे तो देखील जयपूर येथे १८-१९ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६६ किलो गटात रौप्य पदक विजेता ठरलेला आहे. अशा रितीने त्यानेही भारताला ज्युडोत आंतरराष्ट्रीय पदक मिळवून दिले आहे. या पदकाने त्याच्या आशा पल्लवित झाल्या नसतील तरच नवल! कारण तो आता एशियाडची तयारी करण्यासाठी पतियाळा येथील साई सेंटरला भारतीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धडे गिरवीत आहे. एशियाड मध्ये भारताला पदक मिळवून देण्याचे अजिंक्यचे स्वप्न साकार झाल्यास ऑलिम्पिकची दारे आपोआप खुली होतील, हे तो जाणतो. म्हणूनच तो तयारीत कोणतीही कसर सोडत नाहीत.
राज्य, विद्यापीठ आणि राष्ट्रीय पातळीवर अजिंक्य गेली काही वर्षे सातत्याने दर्जेदार कामगिरी करीत आहे. या अनुभवाचा त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निश्चित उपयोगी पडणार असे त्याला वाटते आणि ते योग्यच आहे.. अगदी २०२४ जरी नाही तरी २०२८ सालच्या ऑलिम्पिक खेळात भारतीय संघात नाशिकच्या ज्युडोपटूंचे नाव दिसल्यास आश्चर्य वाटू नये. किंबहुना तेव्हाच ज्यांनी नाशिकमध्ये ज्युडो वाढविला, जोपासला आणि प्रगती पथावर नेला त्यांच्या श्रमाचे चीज होईल! आकांक्षा, अजिंक्य आणि उद्याचे नवे खेळाडू यांनी फक्त सातत्य टिकवून ठेवायचे!