तडाखेबंद फलंदाज ईश्वरी सावकार!
ईश्वरी सावकार नावाची एक तडाखेबंद फलंदाजी करणारी आणि उपयुक्त अशी लेग स्पिन गोलंदाजी करणारी उद्याची संभाव्य भारतीय क्रिकेटपटू निर्माण होण्याच्या वाटेवर आहे. आज आपण तिचीच कारकीर्द जाणून घेणार आहोत…
खरं तर मुलांइतक्या मुली क्रिकेटकडे सहसा आकर्षित होत नाही, पण आजोबा आणि वडील क्रिकेट खेळाडू असल्याने तिला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू आणि धडे मिळाले. ती अक्षरशः त्यांचा खेळ पाहता पाहता तिलाही स्वतः क्रिकेटपटू होण्याची स्वप्ने पडू लागली. ती स्वप्ने तिने फक्त पाहिलीच नाही, तर सत्यात उतरविली. कारण उत्तेजन देणारे आणि साहाय्य करणारे होते. आई, वडील, आजोबा तसेच प्रशिक्षक भावना गवळी आणि मंगेश शिरसाट. त्याला उत्तम साथ मिळाली ती तिच्या मेहनतीची, तिच्या जिद्दीची आणि तिच्या गुणवत्तेची!
नाशिकला महिला क्रिकेटचे प्रशिक्षण अविनाश आघारकर, मकरंद ओक, भावना गवळी, शिवाजी जाधव मंगेश शिरसाट, संदीप सेनभक्त आदी देत आले आहेत. ते प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत. आज त्याची फळे माया सोनावणे, प्रियांका घोडके, ईश्वरी सावकार आदींच्या रुपाने मिळत आहेत.
तिची विशेष गुणवता पाहून ती महाराष्ट्राच्या सोळा वर्षाखालील संघात निवडली गेली २०१८ साली. अर्थातच तिने फलंदाजी आणि गोलंदाजीत विशेष चमक दाखविली. पण कोरोनाने दोन सीझन वाया गेले. यावर्षी तिला संधी मिळाली आणि तिने त्याचा पुरेपूर फायदा उठविला. महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील कडून खेळताना तिने जबरदस्त छाप पाडली.
आंध्र प्रदेश विरुद्ध तिने जोरदार बॅटिंग करीत ८६ धावा तडकविल्या. आणि महाराष्ट्राला विजय मिळवून दिला. तर चंदीगड विरुद्ध पावसाने अनिर्णित सामन्यात पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीची चुणूक दाखवली. तिने नाबाद ७३ धावा काढल्या. महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघ निवड समितीने तिला तात्काळ वरिष्ठ संघात स्थान दिले. पण महाराष्ट्राकडून खेळण्याआधीच तिला भारतीय निवड समितीनेही पाचारण केले.
या दोन खेळी तिला कारकिर्दीच्या एका नव्या टप्प्यावर घेऊन गेल्या. आणि तिची दखल भारतीय १९ वर्षांखालील निवड समितीने घेत तिला थेट चॅलेंजर स्पर्धेसाठी निवडले. यातील उत्तम कामगिरी तिला थेट भारतीय संघात घेऊन जाणार हे निश्चित. कारण पुढील वर्षी १९ वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा प्रथमच भारत आहेत. त्यामुळेच चॅलेंजर स्पर्धेतील खेळी ईश्वरीच्या दृष्टीने गेमचेंजर ठरणार आहे.
ती अशीच बिनधास्त पण दर्जेदार खेळत राहिली तर तिचे भारताच्या सिनियर संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच महिला आयपीएल तसेच ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश स्वप्न देखील पाहता पाहता साकार होऊ शकेल…. फक्त तिने तिचा फॉर्म, फिटनेस आणि फोकस टिकवून ठेवला पाहिजे!