उद्याच्या महाराष्ट्र क्रिकेटचे आशास्थान!
नाशिकमधील उदयोन्मुख खेळाडूंबद्दल प्रथमच इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. फोन आणि मेसेजद्वारे प्रतिक्रीया कळतात. शिवाय त्या त्या खेळाडूला आणि त्याच्या कुटुंबियांनाही अनेक ठिकाणाहून शुभेच्छांचा वर्षाव होतो. ही बाब खुप सुखद आहे. भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे असे म्हणतात. त्यात तथ्यही आहे. भारतीय संघात जे खेळाडू जातात ते पूर्वी राज्याच्या संघांमध्ये रणजी सामने खेळतात. त्यापूर्वी हे खेळाडू जिल्हा पातळीवर चमकदार कामगिरी करतात. नाशिकमधील अशाच दोन कर्तृत्ववान क्रिकेटपटूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत….
क्रिकेटला लोकप्रियतेचे बेसुमार वलय असल्याने पैसा आणि प्रसिद्धीला तोटा नाही. म्हणूनच ९० टक्के तरुणांना क्रिकेटपटू व्हायचे असते. अशा तीव्र स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट खेळ करून टिकून राहणेच जिथे मुश्किल आहे, तिथे आपला ठसा उमटवणं महाकठीण. पण १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाकडून सूरत येथे कूचबिहार स्पर्धेत सध्या खेळत असलेला भरवशाचा यष्टीरक्षक आणि तडाखेबंद फलंदाज शर्विन किसवे आणि दुसरा त्याच्याच नाशिक क्रिकेट अकादमीतून खेळणारा अष्टपैलू खेळाडू साहिल पारख हे सन्माननीय अपवाद आहेत! या दोन्ही खेळाडूंची वयं फक्त साडेसोळा (शर्विन) आणि साडेचौदा (साहिल). पण त्यांची साधारण ४-५ वर्षातील कामगिरी आणि आकडेवारी छाती दडपून टाकणारी आहे.
डावखोरा शर्विन आघाडीचा फलंदाज आहे. त्याने वेगवेगळ्या वयोगटात १६८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५० च्या सरासरीने सात हजारावर धावा केल्या आहेत. त्यात तब्बल १६ शतके, एक द्विशतक आणि ३९ अर्धशतके आहेत. यष्टिरक्षक म्हणूनही त्याची कामगिरी तितकीच नजरेत भरण्यासारखी आहे. एकूण ८३ झेल आणि तब्बल ६५ यष्टिचीत. मुख्य म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात यष्टिचीत करण्यासाठी खास कौशल्य आणि कसब लागते. ते शर्विनने इतक्या लहान वयात कसे मिळविले असेल हे त्याचा प्रशिक्षक माजी रणजीपटू अमित पाटील आणि तोच जाणे. पण महाराष्ट्राच्या डोळस निवड समितीने त्याला महाराष्ट्र संघात योग्य वेळी निवडून त्याच्या गुणांना दाद दिली आहे. आजच्या जमान्यात केवळ यष्टिरक्षक असून चालणार नाही, तर फलंदाज म्हणूनही तितकेच चांगले खेळावे लागते. तरच भवितव्य आहे, हे शर्विनने ओळखले असावे. म्हणूनच त्याची फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून कामगिरी धडाकेबाज आहे.
डावखोरा साहिल पारख हा केवळ साडेचौदा वयाचा आहे. पण त्यानेही ५०च्या सरासरीने १५७ सामन्यात १६ शतके आणि ३२ अर्धशतके ठोकली आहेत. भरवशाचा आणि हमखास ब्रेक थ्रू मिळवून देणारा लेग स्पिन गोलंदाज म्हणूनही तितकाच नावलौकीक कमविला आहे. त्याने विविध सामन्यात २५३ बळी फक्त ३:४३ च्या economy rate ने घेतले आहेत हे विशेष. थोडक्यात शर्विन जसे फक्त फलंदाज किंवा फक्त यष्टिरक्षक म्हणूनही संघात निवडला जाऊ शकतो, तसेच प्रशिक्षक श्रीरंग कापसेचा शिष्य साहिलही फक्त फलंदाज किंवा फिरकी गोलंदाज म्हणूनही संघात आरामात निवडला जाऊ शकतो.
इतक्या लहान वयात चमकलेले किंवा चमकणारे अनेक खेळाडू क्रिकेटमध्ये आहेत. पुढेही येतील. आता या दोघांनाही याच गतीने पुढे मार्गक्रमण करण्यासाठी आणि नाशिकचे नाव उज्ज्वल करण्यासाठी form, फिटनेस आणि नशीब यांची साथ लागणार आहे. ती साथ त्यांना सदैव मिळो, हीच सदिच्छा.