बॅडमिंटनपटू प्रज्वल सोनवणे
नाशिक ही खेळाडूंची खाण आहे असे वारंवार सिद्ध होते. आज आपण अशा अनोख्या नवोदित खेळाडूची ओळख करुन घेणार आहोत. तो म्हणजे बॅडमिंटनपटू प्रज्वल सोनवणे. त्याची आजवरची वाटचालच त्याच्या भविष्याची ओळख करुन देत आहे….
तो आयुष्यातील पहिली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा योनेक्स (जर्मन ओपन) खेळला तीही जर्मनीमध्ये आणि आश्चर्याची आणि आनंददायक गोष्ट म्हणजे तो चक्क ती स्पर्धा जिंकला तेही युरोपातील १६ देशातील अव्वल खेळाडूवर मात करुन आणि तेही unseeded म्हणजे मानांकन नसताना! त्यानंतर अवघ्या सहा दिवसात डेन्मार्कमधील पुन्हा अशाच टफ स्पर्धेत- व्हिक्टर डेन्मार्क ओपन- त्याने उपविजेतेपद मिळविले. तेही मानांकन नसताना आणि अव्वल खेळाडूंवर मात करून!
त्याचे नाव आहे प्रज्वल सोनवणे! केअरटेकर असलेल्या गरीब आईवडिलांचा हा हीरा शिवसत्य मंडळाचे बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद देव यांच्या चाणाक्ष नजरेस आला आणि त्यांनी त्याला पैलू पाडण्याचे काम सुरू केले. त्याची चमकदार कारकीर्द केवळ राज्यात नव्हे किंवा देशापुरती मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवली. केवळ सोळा वर्षे वयाचा हा खेळाडू आता जागतिक मैदाने गाजवू लागला आहे. ते पाहून मकरंद देव यांना आनंद होणे स्वाभाविकच आहे.
प्रत्येक वयोगटातील राज्य अजिंक्यपद त्याने लिलया हासिल केले तर तेरा वर्षे वयाचे राष्ट्रीय अजिंक्यपद देखील त्याच्या नावावर आहे. गेली दोन वर्षे करोनाने बंदिस्त हॉलमधील बॅडमिंटनसह सर्व खेळ बंद असल्याने त्याला चौदा आणि सतरा वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविता आले नाही. पण तो नाउमेद झाला नाही. त्याच्यातील खास गुणवत्ता बघून प्रकाश पडुकोण अकादमीने त्याला दत्तक घेतले. बंगलोर येथील अकादमीत त्याला माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू विमलकुमार आणि सागर चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या तीन वर्षांच्या कोचिंगमुळे त्याने सरळ युरोपमधील जर्मन आणि डेन्मार्क या स्पर्धेत U17 गटात अंतिम फेरीत धडक मारली.
त्याचे प्रशिक्षक सागर चोपडा म्हणतात की, प्रज्वल हा उत्तम आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची समज वयाच्या मानाने खूपच जास्त आहे. सुदैवाने त्याची गुणवत्ता बघून भारत सरकारने त्याला Olympic Gold Quest मध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे त्याचा आर्थिक आणि प्रशिक्षणाचा भार क्रीडा खात्याने आपल्या शिरावर घेतला आहे. नाशिकमधील शिवसत्यचे प्रशिक्षक मकरंद देव यांच्या मते प्रज्वलचा नेटजवळील खेळ आणि drop shots ही त्याची ताकद आहे. फक्त तो stamina आणि endurance ला कमी पडतो.
चोपडा यांच्या मते तो अजून लहान असल्याने कस आणि ताकदीला कमी पडतो आहे. पण, एक-दोन वर्षात त्याच्या शरीराची वाढ पूर्ण झाली की, तो भारतातील अव्वल खेळाडू होणार यात वाद नाही. प्रज्ञा गद्रे नंतर नाशिकला प्रज्वलच्या रुपाने आणखी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू देण्याचे श्रेय प्रशिक्षक मकरंद देव यांना द्यावेच लागेल. त्यांनी प्रज्ञाला वेळीच पुल्लेला गोपीचंद यांच्याकडे सोपवले तर प्रज्वलला प्रकाश पडुकोण यांच्याकडे असेच अगदी योग्यवेळी सोपविले आहे. त्यामुळे उत्तम रिझल्टस मिळाले आहेत आणि मिळत आहेत.