ट्युलिप गार्डन्स म्हटले की, सर्वप्रथम आठवतात ते अमिताभ बच्चन आणि रेखाचे सिलसिला चित्रपटातील देखा एक ख्वाब हे गाणं. तसेच आपल्याकडील बरेच पर्यटक दरवर्षी खास ट्युलिप गार्डन्स पाहण्यासाठी युरोपात नेदरलॅंड येथे भेट देतात. परंतु असेच ट्युलिप गार्डन आपल्या देशात काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आहे. आता ट्युलिपची फुले फुलण्याचा हंगाम असल्याने आपण आज आपल्या ‘देखो अपना देश’ या प्रवास मालिकेत भेट देऊया, श्रीनगरच्या प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरीयल ट्युलिप गार्डनला….
काश्मीर परिसरातील हवामान व युरोपातील हवामान, निसर्ग यात फार मोठे साम्य आहे. याचा अभ्यास करुन जम्मू काश्मीर सरकारने सन २००७ साली श्रीनगर शहराच्या लगत ९ किमी अंतरावर जबरवान पर्वत श्रृंखलेत सुमारे ३० हेक्टर म्हणजे ७४ एकर जागेत प्रचंड मेहनत घेऊन इंदिरा गांधी मेमोरीयल ट्युलिप गार्डन तयार केले. यासाठी १ कोटी रुपये खर्च आला. या गार्डनचे ७ टप्पे आहेत.
श्रीनगरचे प्रसिद्ध दाल सरोवर समोरच असल्याने या गार्डनची शोभा अधिकच वाढली आहे. सुरुवातीला याठिकाणी नियमित लाल, पिवळी, सफेद, नारिंगी इ. रंगाची फुले होती. पण आज रोजी या गार्डनमध्ये सुमारे ६३ प्रकारची विविध रंगाची व मिक्स रंगाची साधारण १५ लाख फुले फुलतात. सुरुवातीला या गार्डनमध्ये ट्युलिपचे साडेचार लाख कंद नेदरलॅंड येथून आणून लावण्यात आले.
दरवर्षी साधारणपणे १५ नोव्हेंबरच्या दरम्यान येथे ट्युलिपचे कंद लावले जातात. त्यानंतर येथे भरपूर बर्फ पडतो. साधारण २० फेब्रुवारी नंतर बर्फ वितळला की जमीन मोकळी होते. मग तेथील बागेची मशागत करतात व इतर गवत साफ केले जाते. याच दरम्यान जमिनी खालील कंदांमधून अंकुर फूटण्यास सुरवात होते व हळूहळू फुले यायला सुरवात होते.
साधारणपणे दरवर्षी २०/२५ मार्चनंतर ट्युलिप गार्डन्स पर्यटकांसाठी ओपन केले जाते. याचा सिझन १५ दिवस ते ३ आठवडेच असतो. पण या काळात जगभरातून पर्यटक ही सुंदर विविधरंगी फुले पाहण्यासाठी गर्दी करतात. येथे फुलांची लागवड करतांना एकाच रंगाचे लांबच लांब वाफे बनवले आहेत.
विविध आकारात, निरनिराळे रंगाचे कंद लावून आकर्षक डिझाईन्स बनवले आहेत. फ्लावर पार्कसारखे, इंद्रधनुष्यासारखे, विविध रंगानुसार आकार दिलेले आहेत. ही सर्व फुले फुलल्यानंतरचे दृश्य वेड लावणारे असते. या बागेत फुलांचा सिझन फक्त १५/२० दिवसांचा असला तरी त्यासाठी जम्मू-काश्मीर फ्लोरिकल्चर विभागाचे सुमारे १०० माळी वर्षभर मेहनत घेत असतात.
सन २०१९ मध्ये अडीच लाख पर्यटकांनी या गार्डनला भेट दिली. मागील वर्षी कोरोनामुळे पर्यटकांना याचा लाभ घेता आला नाही, मात्र यंदा २५ मार्चपासून सुरु झालेल्या या ट्युलिप गार्डनला दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. हे गार्डन सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले असते. यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये आणि मुलांसाठी २५ रुपये प्रवेश तिकीट आहे.
आपल्याकडे अलिकडेच उत्तराखंड राज्यात पिठोरागड जिल्ह्यात मुन्शीयारी येथेही श्रीनगरपेक्षा मोठे ट्युलिप गार्डन सुरु करण्यात आले आहे. तसेच दिल्लीत राष्ट्रपती भवनात देखील ट्युलिप गार्डन आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्युलिप गार्डन पहावेच.
चला तर मग येताय ना आशिया खंडातील सगळ्यात मोठे ट्युलिप गार्डन बघायला.
कसे पोहचाल
श्रीनगर येथे विमानाने जाता येते. त्यामुळे देशातील कुठल्याही मोठ्या शहरातून पर्यटक २/४ तासात येथे पोहचू शकतात. मात्र येथे रेल्वे मार्ग नाही.
कुठे रहाल
श्रीनगर येथे भरपुर हाॅटेल्स, हाऊस बोटस, रिसाॅर्टस उपलब्ध आहेत.
काय पहाल
पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या काश्मीरमधे श्रीनगर, गूलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम अशी अनेक सुंदर पर्यटन स्थळे येथे आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!