सूर्यमंदिर (मोढेरा)
नमस्कार,
आपल्या या हटके पर्यटनस्थळांच्या लेख मालिकेत आपण आजपर्यंत भारतातील ५० पर्यटन स्थळांची माहिती घेतली. हे सर्व लेख पुनश्च नजरेखालून घातले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की, आपला देश किती विविधतेने नटलेला आहे. जगभरात असा एखादाच देश असेल जिथे तुम्ही वर्षभरात केव्हाही भेट द्या, तुंम्हाला पर्यटनाचे अनेक पर्याय समोर उपलब्ध असतील. आजही आपण अशाच एका हटके पर्यटन स्थळास भेट देणार आहोत. ते म्हणजे मोढेराचे सूर्यमंदिर…
आपल्या शेजारील राज्य गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यात मोढेरा या छोट्याशा गावात हे सूर्यमंदिर आहे. सन १०२६ मध्ये चालुक्य राजा भीमदेव पहिला याने पुष्षावती नदीच्याकाठी हे मंदिर बांधले आहे. सन १०२४ च्या सुमारास चालुक्य राजा भीमदेवने गझनीच्या महेमुदने केलेले आक्रमण यशस्वीरीत्या परतवून लावले. या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोढेरा येथे हे सूर्यमंदिर बांधले. राजा भीमदेव हा सूर्यवंशीय होता व तो सूर्याला आपले कुलदैवत मानत असल्याने त्याने या सूर्यमंदिराची स्थापना केली. तसेच सूर्याचा पहिला किरण मंदिराच्या गर्भगृहात पडेल असे या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. शिल्पकलेचा अजोड नमुना असलेले हे मंदिर इराणी शैलीत बांधलेले आहे.
स्कंद पुराणानुसार मोढेरा गाव आणि या सर्व परिसराला रामायण काळात धर्मारण्य असे संबोधले जायचे. रामाने रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्म हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी धर्मारण्यात यज्ञ केला आणि येथे मोढेरक गावाची स्थापना केली. कालांतराने याचे नाव पुढे मोढेरा असे झाले.
या सूर्यमंदिराची रचना अत्यंत वैशिष्टपूर्ण आहे. तसेच यावेळच्या प्रचलित पद्धतीनुसार या मंदिराच्या बांधकामात चुना वापरलेला नाही. त्यामुळे हे मंदिर तीन विभागात उभारले आहे. यात पहिला भाग हा गर्भगृहाचा आहे यास रामकुंड अथवा सुर्यकुंड असेही म्हणतात. दुसर्या भागात सभामंडप आहे तर तिसरा भाग हा गुढमंडपाचा आहे.
गर्भगृहाची उंची साधारण ५१ फूट उंच आहे. प्रथम भागात एक पायर्यांचे रचनात्मक पाण्याचे कुंड आहे. त्यामुळे याची रचना पायर्यांच्या विहीरीप्रमाणे असून या पायर्यांवर विविध देवतांची १०८ छोटी मंदिरे आहेत. यानंतरचा भाग सभामंडपाचा आहे. हा सभामंडप ५२ स्तंभावर उभा असून प्रत्येक स्तंभावर देवदेवता व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरण्यात आलेले आहेत. हा सभामंडप अष्टकोनी असला तरी याचा वरील भाग मात्र गोल आहे. या सभामंडपाचे कोरीव काम अप्रतिम सुंदर आहे. प्रत्येक दोन स्तंभामधे तोरण बनवले आहे. सभामंडपास चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. शेवटच्या गुढमंडपाच्या भिंतीवर सूर्याच्या बारा प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. तसेच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती व अष्ट दिक्पाल यांच्या मूर्ती पहावयास मिळतात. या मंडपास तीन खिडक्या असून यातून सूर्यमूर्तीवर सूर्यकिरणे पडतील अशी रचना कलेली आढळते.
शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या या मोढेराच्या सूर्यमंदिरास अल्लाऊद्दीन खिलजीच्या सैन्याने प्रचंड हानी पोहचवली. अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या देव-देवतांच्या मूर्ती तोडल्या. त्यामुळे या मंदिरातील मूर्तींची पुजा-अर्चा होत नाही. मात्र भारतीय पुरातत्व विभागाने हे मंदिर व परिसर संरक्षित केला असून गुजरात पर्यटन महामंडळ येथे काही चांगल्या सुधारणा करत आहे. आपल्याला लहानपणापासून कोणार्कचे सूर्यमंदिर माहित असते, पण आपण मोढेराचे सूर्यमंदिरही अवश्य बघितले पाहिजे.
कसे पोहचाल
मोढेरा येथे विमानाने जाण्यासाठी जवळचे विमानतळ अहमदाबाद येथे आहे. अहमदाबाद ते मोढेरा हे अंतर १०१ किलोमीटर आहे. मोढेरा येथून फक्त २६ किमी अंतरावर मेहसाणा हे मोठे शहर आहे. महेसाणा येथपर्यंत रेल्वेने पोहचता येते. महेसाणा हे जक्शंन स्टेशन असल्याने देशभरातील विविध शहरांशी जोडलेले आहे.
केव्हा जावे
मोढेरा येथे वर्षभर केव्हाही जाता येते. तरी हवामानाच्या दृष्टीने सप्टेंबर ते मार्चपर्यंतचा कालावधी चांगला असतो.
कुठे रहाल
महेसाणा येथे अनेक लहान-मोठी हाॅटेल्स उपलब्ध आहेत.