इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर –
पायी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण सध्या इंडिया दर्पणच्या माध्यमातून सखोल माहिती घेत आहोत. या अगोदर आपण वाहनाने करावयाची परिक्रमा व तीन दिवसांची उत्तरवाहिनी परिक्रमा यांचेविषयी माहिती जाणून घेतली. आजपासून आपण पायी नर्मदा परिक्रमा कशी करावी? का करावी? पायी परिक्रमेचा कालावधी, नियम, प्रकार, सोबत घ्यावयाचे वस्तू, कपडे, चपला-शूज आदी सर्व बाबी जाणून घेणार आहोत….
वास्तविक आपण याआधी माहिती घेतलेली आहे ती वाहनाने करावयाची परिक्रमा व उत्तर वाहिनी परिक्रमा याची. ही एक बदलत्या काळानुसार स्विकारलेली तडजोड यात्रा आहे असे म्हणावे लागेल. कारण नर्मदा पुराणात अथवा शास्रात उल्लेख असलेली पायी नर्मदा परिक्रमा हिच खरी नर्मदा परिक्रमा आहे. याचा अर्थ वाहनाने केलेली परिक्रमा अथवा उत्तरवाहिनी परीक्रमा ही व्यर्थ आहे, असा होत नाही. कारण कसेही करून नर्मदा मातेच्या जवळ सहवासात राहणे वा चालणे तसेच स्नान व पुजा-आरती करणे हीच एक साधना आहे. त्यामुळे परिक्रमा कुठलीही करावी. आणि प्रत्येक हिंदू धर्मियाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, असे उल्लेख पुराणात आहेत. आपल्या धर्मात १८ पुराणे आहेत. अनेक नद्या आहेत पण केवळ नदीचेच “नर्मदा पुराण” आहे. जगात व आपल्या देशात असंख्य लहान-मोठ्या नद्या आहेत. पण हे भाग्य केवळ नर्मदा मैय्यास मिळाले आहे. तसेच आपल्या सर्व नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे वाहतात. मात्र नर्मदा ही अशी एकमेव नदी आहे जी मध्य प्रदेशातील मेकल पर्वतात अमरकंटक येथे उगम पावते व पश्चिम दिशेला गुजरात राज्यात विमलेश्वर ते मिठीतलाई येथे खंबायतच्या आखातात अरब सागरात विलीन होते. या प्रवासात नर्मदा प्रवाहास आपल्या जीवनाप्रमाणे क्रमप्राप्त झाला आहे. जसे की नर्मदा नदीचा उगम होतो तेथे ती लहान बालकाप्रमाणे असते. नंतर ती अल्लड वयात येते, पुढे ती विशाल स्वरुप धाराण करत मोठी होते. आपल्या जवळील सर्वांना ती पावन करते त्यांचे लाड पुरवते (म्हणजे आसपासच्या सर्व प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते) व आयुष्याच्या शेवटी ती आपल्या सर्व जबाबदार्या पार पाडून स्वतः भव्य अशा सागरात स्वतःला सामावून घेते. अशा या भावभक्तीने ओतप्रोत असलेल्या पायी नर्मदा परिक्रमे विषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
परिक्रमेची सुरवात कुठून करावी
नर्मदा परिक्रमा ही वाहनाने करा अथवा पायी करा. परिक्रमेची सुरवात नर्मदा मातेच्या उगमापासून तर नदी सागरास मिळेपर्यंत या दरम्यानच्या उत्तरतट अथवा दक्षिणतट कुठूनही परिक्रमा सुरु करावी. मात्र या प्रवासात नदी कधीही ओलांडू नये तसेच परिक्रमा जेथून सुरु केली तेथेच पुर्ण करावी. म्हणजेच एक प्रदक्षिणा पुर्ण व्हायला हवी.
परीक्रमा का करावी
नर्मदा परिक्रमा करण्याचा प्रत्येकाचा मानस वेगवेगळा असू शकतो. काही भाविक साधनेसाठी परिक्रमा करतात, तर काही उत्तम आरोग्य व पर्यटन म्हणूनही नर्मदा परिक्रमा करतात. तसेच काही परिक्रमावासिय या परिसराचे ऐतिहासिक व भोगोलिक ज्ञान मिळवण्यासाठी परिक्रमा करतात. काही लोक मात्र नवस कबूल केलेला असतो म्हणून मनोकामना फलदायी झाल्यावर परिक्रमा करतात. प्रत्येकाची परिक्रमा करण्यामागची कारणे वेगवेगळी असली तरी या सर्वांकडून नर्मदा मैय्या परिक्रमा करवून घेते. कारण परिक्रमावासियांच्या मनात परिक्रमेबाबतचा विचार हा नर्मदा मातेच्या अंतस्थ ओढीनेच आलेला असतो. अशा प्रकारे केलेली परिक्रमेमुळे मानवी आयुष्यास परिपुर्णतः मिळते.
संकल्पपूजा
नर्मदा परिक्रमेस सुरुवात करण्यापूर्वी जेथून परिक्रमेस सुरुवात करावयाची तेथील घाटावर परिक्रमेचा संकल्प केला जातो. त्याचबरोबर याठिकाणी परिक्रमावासीय अन्नदान, भोजन, कन्या पुजन व कन्या भोजनही करतात. किती कन्यांना भोजन व भेटवस्तु द्याव्या हे प्रत्येकाच्या मनावर असते. परिक्रमावासायांनी यथाशक्ती कन्यापुजन करावे व या कन्यांचा आर्शिवाद घेऊन परिक्रमेस सुरुवात करावी. बरीच मंडळी ९, ११, २१, ५१ कन्यांना भोजन करतात. परिक्रमा जेथून सुरु केली तेथून सोबत थोडे नर्मदा जल घ्यावे. संकल्प करतेवेळी कुणीही नाही भेटले तरी मनोभावे पुजा करुन परिक्रमेस सुरवात करावी.
कालावधी
सर्वसाधारणपणे पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ११० ते १४० दिवस लागतात. मात्र परिक्रमा कमीत कमी किती दिवसात करावी, जास्तीत जास्त किती दिवस चालावे असे काही नियम नाही. म्हणजेच परिक्रमावासिय एका दिवसात किती अंतर चालू शकतो, यावर परिक्रमेचा कालावधी अवलंबून असतो. नर्मदा परिक्रमा करताना साधारण ३६०० किमी चालणे होते. प्रत्येकाची रोज चालण्याची क्षमता वेगवेगळी असल्याने परिक्रमेचा कालावधी कमी-जास्त होतो. साधारणपणे परिक्रमावासिय दररोज २५ ते ३० किमी चालतात. म्हणजेच महिन्याला ९०० किमी चालतात. या हिशोबाने परिक्रमेस ४ महिने किंवा १२० दिवस लागू शकतात. मात्र ७० दिवसातही परिक्रमा करणारे भाविक आहेत. परंतु अशी धावपळ यात्रा करण्यापेक्षा मस्त रमत-गमत परिक्रमा करावी. परिक्रमावासियाने सकाळी सूर्यौदयानंतर चालण्यास सुरुवात करावी. आणि सूर्यास्तानंतर चालू नये, असा नियम आहे. तसेच अमावस्या, पोर्णिमा, एकादशी व ग्रहणाचे दिवशी परिक्रमा करु नये. यादिवशी साधना करावी व पूजा करावी. अशाप्रकारे परिक्रमा सुरु केल्यानंतर सोबत काय घ्यावे, भोजन व्यवस्था, परिक्रमेचे प्रकार आदींबाबत आपण पुढील भागात माहिती घेऊ….