इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नर्मदे हर
पायी परिक्रमेचा प्रारंभ
नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण सध्या इंडिया दर्पणच्या माध्यमातून सखोल माहिती घेत आहोत. यात पायी नर्मदा परिक्रमा कशी करावी? कुठून सुरु करावी? केव्हा करावी? का करावी? पायी परीक्रमेचा कालावधी, नियम, यात्रेत सोबत घ्यावयाच्या आवश्यक वस्तू या व अशा विवीध बाबींविषयी आपण पहिल्या भागात सविस्तरपणे जाणून घेतले. आता आपण या भागात पायी नर्मदा किती प्रकारची करता येते याबाबत माहिती घेऊया…
सामान्य परिक्रमा
सर्वसाधारणपणे पायी परिक्रमा करणार्या परीक्रमांवासियांपैकी अनेक भाविक हिच सामान्य परिक्रमा करतात. यात आपला दररोजचा चालण्याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे ११० ते १४० दिवसात परिक्रमा केली जाते. ज्या घाटावरुन परिक्रमेस सुरुवात केली तेथून उत्तर तट व दक्षिण तट दोन्ही बाजूंनी पायी पूर्ण करुन ही परिक्रमा केली जाते. या परिक्रमेत फारशी पळापळ नसते. सकाळी लवकर ऊठून स्नान व पुजा करुन दररोज साधारण २० ते ३० किमी अंतर चालण्याचा संकल्प असतो. दररोज सायंकाळी नर्मदा घाटावर नर्मदा आरती व भोजन करुन मुक्काम केला जातो. सूर्यास्तानंतर परिक्रमा थांबविण्यात येते. यास सामान्य परिक्रमा असे म्हणतात.
मनौती की परिक्रमा
मनौतीची परिक्रमा ही अपेक्षित साध्य पूर्ण झाल्यानंतर करतात. म्हणजेच आपली एखादी इच्छा पुर्ण करण्यासाठी नवस केला जातो. अपेक्षेनुसार मनोकामना पुर्ण झाल्यानंतर नवस पुर्ण करण्यासाठी जी परिक्रमा करतात त्यास मनौतीची परिक्रमा असे म्हणतात.
जलहली परिक्रमा
ही परिक्रमा अत्यंत अवघड व खडतर आहे. शक्यतो साधू, संत असेच लोक ही परिक्रमा करतात. कारण या परिक्रमेत अमरकंटक ते अमरकंटक असा डबल पायी चालून परिक्रमा पुर्ण केली जाते. विशीष्ट सिद्धी अथवा साधनेसाठी साधू-यती हे गृहस्थ जीवनाचा त्याग केलेले महान व्यक्ती ही परिक्रमा करतात.
हनुमान परिक्रमा
या परीक्रमेत सर्व मुक्काम हे हनुमान मंदिरातच करावयाचे असतात. त्यासाठी तट ओलांडले तरी चालतात. म्हणून यास हनुमान परिक्रमा असे म्हणतात.
दंडवत परिक्रमा
दंडवत परीक्रमे सरळ न चालता साष्टांग दंडवत घालत परिक्रमा केली जाते. म्हणजे हातात एक नारळ ठेवायचा व जमिनीवर झोपून नारळ पुढे ठेवायचा. परत ऊठून नारळ हातात घेऊन परत जमिनीवर झोपायचे व नारळ ठेवायचा. अशा प्रकारे ही दंडवत परिक्रमा केली जाते. ही परिक्रमा अत्यंत अवघड व खडतर आहे. या परिक्रमेत दररोज फक्त २/३ किमी अंतर कापले जाते.
खंड परिक्रमा
खंड परिक्रमा ही सलग वेळ नसलेले भाविक टप्याटप्याने करतात. म्हणजेच आपल्याकडे असेल तितके दिवस परिक्रमा करायची परत खंड होतो. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेथून परिक्रमा खंडित केली होती, तेथून परत चालण्यास सुरुवात करावयाची. अशी ही खंड परिक्रमा म्हणजे यात्रा व पर्यटन अशी असते.
पंचकोसिय परिक्रमा
ही परिक्रमा सर्वात लहान परिक्रमा असून ज्या भाविकांकडे वेळ कमी आहे पण नर्मदा परिक्रमा करावयाची इच्छा आहे असे भाविक पंचकोसिय परिक्रमा करतात. पंचकोसिय परिक्रमेत पाच कोस, तीन किमी, पाच किमी, पाच घाट, पाच गावे, पाच नद्यांमधील अंतर असे ठरवून परिक्रमा केली जाते. या परिक्रमेचे नियम व अटी फारशा कठीण नाहीत. थोडक्यात आपल्या आर्थिक, शारीरीक क्षमतेनुसार हवी तशी परिक्रमा यात करता येते. चार्तुमास चा कालावधी सोडून केव्हाही ही परिक्रमा करता येते.
अशा प्रकारे सर्वसाधारणपणे आठ प्रकारे पायी नर्मदा परिक्रमा करता येते. ज्याला जसे शक्य असेल तशी परिक्रमा करावी. आपल्या मनात परिक्रमेविषयी इच्छा निर्माण करण्यापासून तर परिक्रमा पुर्ण करेपर्यंत नर्मदा मैय्या आपल्या सोबत असते. आरंभापासून तर परिक्रमेच्या शेवटापर्यंत आपल्याला नर्मदा माता प्रसन्न ठेवते. तिचा खळाळता प्रवाह परिक्रमावासियांना चालण्याची शक्ती व उमेद देतो. त्यामुळे दररोज चालण्याचे भरपूर परिश्रम होऊनही दुसऱ्या दिवशी नर्मदा स्नानाने दिवसाची सुरुवात करुन माणूस पुन्हा प्रफुल्लित होऊन नवीन जोमाने चालण्यास सुरुवात करतो.
क्रमश: