इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नर्मदे हर
पायी परिक्रमेचा प्रारंभ
नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण सध्या इंडिया दर्पणच्या माध्यमातून सखोल माहिती घेत आहोत. यात पायी नर्मदा परिक्रमा कशी करावी? कुठून सुरु करावी? केव्हा करावी? का करावी? पायी परिक्रमेचा कालावधी, नियम, यात्रेत सोबत घ्यावयाच्या आवश्यक वस्तू या व अन्य विविध बाबींविषयी आपण पहिल्या भागात सविस्तरपणे जाणून घेतले. आता आपण या भागात प्रत्यक्ष पायी परिक्रमेच्या प्रवासाची माहिती घेऊया.
खरंतर पायी परीक्रमा पुर्ण करण्यास शंभर पेक्षा जास्त दिवस लागतात. हजारो छोटी-मोठी गावे -शहरे, जिल्हे, राज्य लागतात. जलप्रवासही होतो. त्यामुळे ही माहिती प्रचंड मोठी होऊ शकते. अगदी एका दिवसाचा एक भाग असा लेखही होऊ शकतो. म्हणून आपण याची थोडक्यात माहिती घेऊ. नर्मदे हर….
यापूर्वीच्या भागात नमूद केल्याप्रमाणे पायी परिक्रमेची सुरुवात ही कुठल्याही काठावरुन व कुठल्याही घाटावरुन सुरु करता येते. परंतु आपल्या भागातील म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील परिक्रमावासिय बर्याचदा ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरु करतात. तसेच शेवटी तेथेच संकल्पपूर्ती करतात. किंबहुना बरेच परिक्रमावासिय कुठेही वास्तव्य करत असले तरी परिक्रमेची सुरुवात करताना ओंकारेश्वराचीच निवड करतात. कारण ओंकारेश्वर हे एक प्रसिद्ध ज्योर्तिलिंग तर आहेच शिवाय नर्मदा मातेला शिवशंकराची मुलगी मानली जाते. त्यामुळे परिक्रमा सुरु करणायासाठी अनेक भाविक ओंकारेश्वराची निवड करतात. याला स्थानिक लोक ओंकारेश्वरसे परिक्रमा ऊठाई असे म्हणतात. या पायी परीक्रमेत परीक्रमावासिय जेथे मिळेल तेथे भोजन/सदावर्त घेतात. असे म्हणतात की परीक्रमावासिय अगदी जंगलात जरी राहिला तरी नर्मदा मैय्या त्याला उपाशी झोपू देत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने भोजनाची व्यवस्था होतेच. या एका श्रद्धेवर परिक्रमावासिय भोजनाबाबत कधीही चिंता करत नाहीत. मुक्कामाच्या बाबतीतही तेच. शक्यतो वाटेवरील मंदिर, आश्रम, शाळा, पडवी, ओटा असे जिथे कुठे सोय होईल तेथे राहतात. शक्यतो दोन जोडी कपडे, एक कडीचा डबा व वास्तव्यासाठी एक बेडरोल घेतात. सर्व प्रवास पायी असल्याने सामान अत्यंत कमी घेतले जाते.
पुढच्या भागात आपण सविस्तरपणे पायी परिक्रमेविषयी जाणून घेऊ…