इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
नर्मदा परिक्रमेचा इतिहास व नियम
नमस्कार ,
नर्मदा परिक्रमा या एका वेगळ्या धार्मिक लिखित स्वरुपातील यात्रेत आपण सहभागी झालो आहोत. पहिल्या भागात आपण परिक्रमेबाबतची सर्वसाधारण माहिती घेतली. आता आपण या दुसर्या भागापासुन प्रत्यक्ष यात्रेबाबत जाणून घेऊया. आज आपण परिक्रमेचा इतिहास आणि नियम यावर प्रकाश टाकू….
असा आहे इतिहास
सुमारे सात हजार वर्षांपूर्वी सर्वप्रथम मार्कडेंय ॠषींनी नर्मदा परीक्रमा केली आहे. त्यामुळे मार्कंडेय ॠषींना नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक मानले जाते. मार्कंडेय ॠषींना ही परिक्रमा करण्यास ४५ वर्षे लागली. कारण त्यांनी ही परिक्रमा करताना नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूंच्या नद्या, धारा, प्रवाह हे सुद्धा ओलांडली नाही. त्यांनी नर्मदेच्या सुमारे ९९९ उपनद्यांच्या उगमाला वळसा घालून ही परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळेच मार्कंडेय ॠषींना नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यास ४५ वर्ष लागली. म्हणजेच नर्मदा परिक्रमा सुमारे ७००० वर्षांपासून केली जाते, असे उल्लेख सापडतात.
हे आहेत नियम
सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा म्हणजे काय ते समजून घेऊया. सर्वसाधारणपणे ओंकारेश्वर येथे नर्मदा परीक्रमेचा संकल्प करुन परिक्रमेस सुरुवात करतात. मात्र परिक्रमा ओंकारेश्वर येथूनच सुरु केली पाहिजे असे नाही. नर्मदा नदीच्या काठावरील कुठल्याही ठिकाणावरुन परिक्रमेस सुरुवात करता येते. मात्र, परिक्रमा जेथून सुरु केली तेथून नदी सागराला मिळते त्या संगमापर्यंत जायचे. कुठेही नदी न ओलांडता. सागरात बोटीने दुसर्या काठावर जायचे व तेथून नदीच्या उगमापर्यंत म्हणजे अमरकंटक येथ पर्यंत जाऊन परत
नर्मदा नदीच्या काठाने जेथून परिक्रमा सुरु केली होती, तेथपर्यंत जाणे. अशी नदीला पुर्ण फेरी मारणे म्हणजे परिक्रमा होय. ही परिक्रमा करत असतांना काही नियम पाळणे गरजेचे आहे. ते आपण आता समजून घेऊ.
१) परिक्रमे दरम्यान रोज सकाळ, दुपार, सायंकाळ नर्मदेची पुजा, स्नान, संध्यावंदन करावे. तसेच परिक्रमा सुरु असताना सदैव ओम नर्मदे हर या मंत्राचा जप करावा.
२) परिक्रमा करत असतांना नर्मदेचे पात्र चुकूनही ओलांडायचे नाही. परिक्रमा करतांना नदी नेहमी आपल्या उजवीकडेच असावी.
३) परिक्रमा करतांना सदावर्त म्हणजे शिधा घेऊन, अन्न शिजवून अथवा भिक्षा मागून भोजन करावे.
४) परिक्रमेस निघण्यापूर्वी माता-पित्यांची परवानगी घ्यावी.
५) परिक्रमेदरम्यान शक्यतो पांढरी वस्रे परिधान करावी.
६) परिक्रमेदरम्यान येणार्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी द्याव्या व दर्शन घ्यावे.
७) परिक्रमा करतांना सोबत पैसे ठेवू नयेत.
८) आपली चिंता, काळजी, सुख, दु:ख सर्व विसरुन पुर्णतः सर्मपित होऊन श्रद्धेने परिक्रमा करावी. कारण परिक्रमा करतांना आपली परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग येतात. परंतु नर्मदा माता परीक्षाही घेते, अडचणीही दूर करते. म्हणून प्रसन्न मनाने यात्रा करावी.
९) यात्रा खडतर आहे, पण त्याचा बाऊ न करता नर्मदा मातेला शरण जाऊन चांगल्या मनःस्थितीने परिक्रमा करावी.
१०) परिक्रमे दरम्यान नदीचे प्रदूषण टाळावे.
परिक्रमेस लागणारा कालावधी
सर्वसाधारणपणे नर्मदा परिक्रमा दोन प्रकारे केली जाते.
१. पायी परिक्रमा
पायी परिक्रमेस साधारणपणे कमीत कमी ११० ते १२० दिवस लागतात. हा मार्ग पुर्णतः नदीच्या काठाकाठाने जातो. पायी परिक्रमा करणार्या भाविकांनी सोबत एक रग अथवा ब्लॅंकेट, पाण्यासाठी कडीचा डबा, स्वेटर, काठी असे कमीत कमी साहित्य सोबत ठेवावे. पायी यात्रा करणार्या भाविकांनी रात्री प्रवास करु नये. तसेच कुठेही आश्रमात, मंदिरात, शाळेत अथवा पटांगणात झोपण्याची तयारी ठेवावी. तसेच मिळेल ते भोजन ग्रहण करावे.
२. वाहनाने परिक्रमा
आजकाल बरेच भाविक वेळे अभावी वाहनाने परिक्रमा करतात. अनेक यात्रा कंपन्या अशा प्रकारच्या परिक्रमा सहली आयोजित करतात. नर्मदा परिक्रमा वाहनाने केली तरी साधारणपणे १८ ते २४ दिवसात पूर्ण होते. वाहनाने केली जाणारी परिक्रमा तशी कमी कष्टाची असते. तसेच सर्वत्र हाॅटेल्स व धर्मशाळा उपलब्ध झाल्याने प्रवास, निवास व भोजन हा विषय अगदीच सुलभ झाला आहे. त्यामुळेच परिक्रमा करणार्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे.
परिक्रमेतील प्रवास
परिक्रमा वाहनाने करावयाची झाल्यास सुमारे ३६०० किलोमीटर प्रवास होतो. बहुतेक भाविक ओंकारेश्वर येथे संकल्प करुन परिक्रमेस सुरवात करतात. या प्रवासाचा मार्ग मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांमधून जातो. या प्रवासा दरम्यान कठपूर ते मिठीतलाई (नर्मदा नदी व अरबी समुद्र यांचा संगम) हा प्रवास बोटीने करावा लागतो.
अशाप्रकारे पायी व वाहनाने दोन प्रकारे परिक्रमा करता येते. मात्र बर्याच पर्यटकांना वेळेअभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसल्याने ते वाहनाने परिक्रमा करतात. म्हणून आपण पुढील भागात वाहनाने परिक्रमा करतांना कोणती गावे लागतात, रोज किती प्रवास करावा, कुठे राहण्याची सोय होते, भोजन व्यवस्था यावर माहिती घेऊया.
(क्रमश:)