इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा
घरगुती सांडपाण्याचा प्रश्न असा सुटेल
मागच्या लेखात आपण घरगुती सांडपाण्यामुळे गोदावरी नदीवर होणारे दुष्परिणाम बघितले. त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. देशभरातील सर्वच नद्यांचा हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. या समस्येवर नेमका तोडगा काय आहे, ही समस्या कशी सुटू शकते, हे आज आपण पाहणार आहोत.
आपल्या गोदावरीच्या बाबतीत आगर टाकळी, तपोवनाच्या खालील बाजूला नदीवर आच्छादलेला फेसाचा थर दिसतो. असेच दिल्लीत यमुनेच्या बाबतीत, तेच उत्तर प्रदेशात गंगेच्या बाबतीत दिसते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. पूर्वीच्या काळी केस धुण्यासाठी घराघरात शिकेकाई वापरली जायची. ज्याने नदीला त्रास होत नव्हता. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये टूथपेस्ट, अंगाचा साबण, कपड्यांचा साबण, फिनाईल, टॉयलेट क्लिनर वापरतो. या सर्वांमध्ये केमिकल असते. त्यामुळे हे केमिकल युक्त पाणी घरगुती सांडपाण्यातून थेट नदीत जाते.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे असली तरी ती केवळ मेकॅनिकल ट्रीटमेंट करते. म्हणजेच केमिकलवर ट्रिटमेंट होतच नाही. उदाहरणार्थ रिकाम्या बादलीमध्ये चिमुटभर कपडे धुण्याचा साबण जर राहिला आणि वरून नळाने पाणी सोडलं तर बादलीभर फेस तयार होतो. याला उत्तर म्हणजे परत पुनश्च जुन्या जीवनशैलीकडे जाणे. परंतु ही मानसिकता बदलणे दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ते काही एका महिन्यात किंवा एखाद्या वर्षात होणार नाही. त्यामुळे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करीत असताना केमिकल किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंटची आत्ता तरी ताबडतोब गरज वाटते. नजिकच्या काळात किंवा भविष्यात ते प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी अथवा उद्योगांसाठी वापरले जावे. नदीत सोडले जाऊ नये हे गरजेचे आहे.
मागच्या लेखात आपण बघितलं की सांडपाणी कसे पुराच्या पाईपमध्ये घुसते. तसेच पुरीचे पाणी कसे सांडपाण्याच्या पाईप मध्ये घुसते. त्यामुळे शहराचे शंभर टक्के सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचतच नाही. यावर उपाय म्हणजे संपूर्ण शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे ऑडिट करणे. ज्याप्रमाणे आपण पिण्याच्या पाण्याचे ऑडिट करतो, त्याचप्रमाणे आपल्याला शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. धरणातून पाणी किती उचलतो, आपल्याकडे विहिरी किती आहेत, बोअरवेल किती आहेत, याचा वापर करून सांडपाणी किती तयार होते, त्यापैकी किती प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचते, त्यावर योग्य ती प्रक्रिया होते का की नाही हे ऑडिट मधून स्पष्ट होईल.
पिण्याच्या पाण्याची जेवढी काळजी घेतली जाते, तेवढीच सांडपाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण प्रदूषित पिण्याचे पाणी शरीराला थेट इजा पोचू शकते. तसेच थेट सोडलेले सांडपाणी नदीचे प्रदूषण करते. नदी प्रदूषित होणे हे सुद्धा थेट त्या शहराच्या आरोग्यावर परिणाम करते. पावसाळी गटारींमधून केवळ पावसाचेच पाणी आणि सांडपाण्याच्या पाईप मधून फक्त सांडपाणी जाते का नाही जाते हे प्रशासनाने बघणे ताबडतोब गरजेचे आहे. ज्या ठिकाणी हे पाणी एकमेकात मिसळते आहे ते शोधणे आणि ताबडतोब त्याची दुरुस्ती करणे अगत्याचे आहे.