ब्रह्मगिरी, गंगोत्री से कम नही
ब्रह्मगिरीबाबत बोलायचं ठरलं तर डॉ. राजेन्द्र सिंह यांचे वाक्य आठवतं “ब्रह्मगिरी, गंगोत्री से कम नही है”. जितकं महत्त्व गंगोत्रीला आहे, तितकंच महत्त्व ब्रह्मगिरीला आहे. पण, आपण ते आजवर तरी जाणून घेतलेले नाही.
सहा राज्यांची जीवनदायिनी गोदावरी तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारी वैतरणा यांचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. पौराणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा असलेला ब्रह्मगिरी पर्वत आपल्या नाशिक जिल्ह्यात असल्यामुळे आपली जबाबदारी तर अजूनच वाढते. ब्रह्मगिरीमुळे गोदावरी आहे, वैतरणा आहे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत, हे विसरून चालणार नाही. मध्यंतरीच्या काळात ब्रह्मगिरीवर जो उत्खननाचा प्रकार घडला तो अतिशय गंभीर होता.
याचसंदर्भात सहा राज्यांचे नागरिक एकत्र येऊन राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली गेली. डॉ. राजेंद्र सिंग यांनी त्याच्यात मार्गदर्शन केलं. माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी पर्यावरणाचे रक्षण व्हावं आणि विकासही साधता यावा यासाठी टास्क फोर्स निर्मिती केली. या टास्कफोर्समध्ये समाजातील सर्व थरातील संबंधित नागरिक म्हणजे पर्यावरण प्रेमी, विकासक या सर्वांना एकत्र करून कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंग हे नाशिकला आले. जिल्हाधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर यांच्याशी विचारमंथन होऊन या विषयाबद्दल पुढील दिशा कशी असावी याचा एक कृती आराखडा तयार झाला. सर्वांनी मिळून एक घोषवाक्य तयार केले “ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता” या विषयावर आता काम करायचे आहे.
संत म्हणजे त्यात्या क्षेत्रातील तज्ज्ञ, शासन आणि समाज या सर्वांना एकत्र करून जर हे काम झाले तर ते कायमस्वरूपी शाश्वत असेल, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी सांगितले. ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ब्रह्मगिरी की हरियाली म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावर केवळ वृक्षारोपण करणं नव्हे तर तिथे नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्माण करणं आहे. याबाबत सध्याचे गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांचे मार्गदर्शन फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या काळी धान्य देखील जंगलातच उगायचं, नंतर जंगलतोड करून शेती करायला सुरुवात झाली.
जोशी यांच्या मते आता आपण लहान लहान मुलांच्या पर्यावरण सहली काढायला हव्या. ती लहान लहान मुले त्यांच्या त्यांच्या घरून त्यांना हवा असलेले मूठभर धान्य घेऊन येतील. त्यांना जेवढे शक्य आहे, तेवढे ते डोंगरांवर चढतील. तसेच, आपल्या जवळील धान्य ते डोंगराच्या विविध भागामध्ये टाकतील. धान्य मिळतं म्हणून पक्ष्यांचा अधिवास तेथे वाढेल. जे धान्य पक्षी खाणार नाहीत त्याचे गवत तयार होईल. पक्षी ठरवतात कुठलं झाड कुठे लावायला पाहिजे. कारण, आपल्या चोचीत दाणे पकडून तेच इतस्तः ते देणे पेरतात. उदाहरणच द्यायचे तर आपल्या गच्चीवर आलेले पिंपळाचं झाड काँक्रीटमध्ये कसं येतं. अगदी ॲसिड टाकून ते काढावे लागते. पक्ष्यांनी केलेल्या वृक्षारोपणाची फार देखभाल करायची गरज नसते. ते निसर्गतः वाढते. म्हणजे पक्ष्यांना किती उत्कृष्ट जाण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.
ब्रह्मगिरीला हिरवेगार करण्यासाठी आपण पक्ष्यांच्या वृक्षारोपणाची पद्धती अवलंबायला हवी. आपल्या घरामध्ये जे आपण फळ खातो त्यांच्या बिया देखील ठराविक सीझनमध्ये सीड बॉल्सच्या रूपात तयार करता येतील. तसेच, हेच सीड बॉल्स सहली काढून ब्रह्मगिरी परिसरात टाकता येतील. यात सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मगिरीचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर व्हायला हवा. जेणेकरून माणसांचा वावर कमी होईल. तसेच, एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला माणसांचा वावर कमी होतो, तेथे जंगल आपोआप तयार होते.
जंगल ही नद्यांची जननी आहे, असे म्हणतात. त्यामुळे माती अडवा, पाणी जिरवा नैसर्गिक पद्धतीने होते. भूजल पातळी वाढते आणि नद्या बारामही व्हायला सुरुवात होते. आपल्या ब्रह्मगिरीच्या उताराचा अभ्यास करून लोकायुक्त अंबादास जोशी यांनी अनेक उपाय सुचविले आहेत. जे अगदी सहज करता येण्याजोगे आणि छोटे-छोटे आहेत. दीड बाय दीड बाय दीडच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे लोकसहभागातून करायचे. जेणेकरून वेगाने वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होईल. आणि हळूहळू मातीचा थर वाढेल. जेव्हा या मातीच्या थराचा संपर्क पावसाच्या पाण्याशी येतो, त्यावेळी जंगल तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते.
ब्रह्मगिरीवर पुर्वीसारखे जंगल तयार झाले तर गोदावरी सुद्धा बारामही वहायला सुरुवात होईल. पवित्र गोदावरी म्हणजे अविरल, निर्मल, स्वतंत्र अशी गोदावरी. जंगलामुळे गोदावरी अविरतपणे वाढण्यास मदत होईल. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे निर्मलता. सध्या त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे निर्मलतेच्या दृष्टिकोनातून प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे. मलजलामुळे होणारे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे मोठे प्रदूषण होते. त्यात प्लास्टिकचा वाटा खूप मोठा आहे.
राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांनी नुकतेच फार महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा आहे. गोदावरी मध्ये मलजल मिसळू नये यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी. तसेच, नदीपात्रामध्ये मध्ये मिसळणारे मलजल वेगळे करून त्यावर योग्य त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून त्या पाण्याचा पुनर्वापर होणं अपेक्षित आहे. कुठल्याही पद्धतीचा घनकचरा गोदावरी मध्ये जायला नको. तेव्हाच गोदावरीच्या निर्मलतेला खर्या अर्थाने सुरुवात होईल. सध्या गोदावरीच्या नदीपात्रातून मलजल वाहते आहे. आपली सर्वांची साथ जर मिळाली तर ब्रह्मगिरी की हरियाली और गोदावरी की पवित्रता सहज शक्य आहे.