ब्रह्मगिरीच्या पुनरुत्थानासाठी
गोदावरी नदीला पुन्हा पुर्वीसारखे खळाळते बघायचे असेल तर आपल्याला तिच्या उगमाजवळ जावे लागेल. ते आहे ब्रह्मगिरी. त्यामुळे तिथले प्रश्न नेमके काय आहेत ते सर्वप्रथम समजून घ्यायला हवेत.
अलाहाबादच्या महाकुंभामध्ये काही वर्षांपूर्वी जाण्याचा योग आला होता. तेथील एक आठवण येथे आवर्जून सांगावीशी वाटते. तेथे जेव्हा नागरिक भेटायचे आणि आम्हाला विचारायचे कुठून आलात? आम्ही म्हणायचो नाशिक वरून. आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली माणसं चक्क पाया पडायचे आणि म्हणायचे “गंगेच्या मोठ्या बहिणीचे गोदावरीचे दर्शन झालं”. इतका मोठा मान मिळणे अनपेक्षित आणि धक्कादायकच होते. आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. हे झालं ते फक्त आणि फक्त गोदावरीमुळेच.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी अतिशय महत्त्वाचं स्थान त्र्यंबकेश्वर. तेथील ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीला गंगेची मोठी बहीण असंही समजलं जात. पृथ्वीतलावर ती अवतरलेली पहिली नदी अशी देखील मान्यता आहे. तिला आपण दक्षिणगंगाही म्हणतो. ब्रह्मगिरीवर उगम पावणारी गोदावरी ही बाल्य स्वरूपात आहे. पुढे जाऊन ती सहा राज्यांची जीवनदायिनी होते. तब्बल 1475 किलोमीटर लांब आणि 3 लाख चौरस किमी भूभाग तिच्यावर अवलंबून आहे. अशा गोदावरीच्या उगमस्थानाजवळ आपण असल्यामुळे आपली जबाबदारी सर्वात जास्त आहे ही भावना देखील त्या अलाहाबादच्या आठवणीमुळे सारखी होत राहते.
पूर्वीच्या काळी ब्रह्मगिरी पर्वतावर अतिशय घनदाट जंगल होते. त्यावेळी त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध वाहणारी गोदावरी नदी आता केवळ फोटोमध्ये किंवा एखाद्या जुन्या हिंदी पिक्चरमध्ये बघायला मिळते. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीचे प्रश्न काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो गोदावरीच्या प्रवाहाचा. पूर्वीच्या काळी गोदावरी ही बारमही, अविरतपणे वाहणारी होती. आता मात्र ती केवळ पावसाळ्यातच वाहते. तेही चक्क रस्त्यावरून. या ठिकाणी दक्षिण कोरियातील सेवुल येथील एका नदीच्या प्रवाहाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. Cheonggyecheon या नदीचा. ८.४ किलोमीटर नदीचा प्रवाह सिओल शहराच्या मधोमध वाहत असे. १९५० मध्ये कोरियाच्या युद्धानंतर अनेक नागरिक स्थलांतरित होऊन या प्रवाहाच्या किनाऱ्यावर राहायला आले. तात्पुरत्या स्वरूपाची तिथे घरे बांधली गेली. नागरिक तिथे रहायला लागले. यामुळे निर्माण होणारा सर्व घनकचरा, मलजल हे सर्व नदीत जायला लागले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने १९५८ झाली नदीच्या प्रवाहला चक्क काँक्रीटने झाकून टाकले. १९७६ साली त्यावर ५.६ किलोमीटर लांबीचा दहा पदरी रस्ता आणि त्या रस्त्यावर चार पदरी फ्लायओव्हर साकारण्यात आला. त्यानंतर शहराला व परिसराला असंख्य दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. नदीचा जणू जीवच घेतला आणि त्यातून असंख्य प्रश्न निर्माण झाले.
अखेर सरकारला जाग आली. सरकारने निर्णय घेतला की नदीला पुर्नजिवीत करण्याचा. लाखो वाहनांची रोज वर्दळ असणारा रस्ता, त्यावर असलेल्या फ्लायओव्हर तोडून टाकण्यात आले. आज तेथे अंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालेली आहे. बच्चे कंपनीचे तर ते सर्वात आवडते पर्यटन स्थळ झाले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शहराचे तापमान सरासरीपेक्षा दोन डिग्री सेल्सिअसनी कमी झाले आहे. पण हे काही अचानक झालेले नाही. हे उदाहरण देण्याची आवश्यकता एवढी वाटली कारण त्यांनी जे काम केलं ते ५.६ किलोमीटरचं होतं. हेच आपल्याला गोदावरीसाठी करायचं असेल तर ते त्र्यंबकेश्वर शहरातील तीन-चारशे मीटरचे आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरी पुन्हा खळाळती करायची असेल तर यात नेमक्या अडचणी काय हे जाणून घ्यायला हवे. सर्वात महत्त्वाची अडचण आहे ती बारमाही प्रवाहाचे. त्यासाठी ब्रह्मगिरी पर्वतावर पूर्वीप्रमाणे घनदाट जंगल असणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून असे लक्षात आले की, सर्व समाजाला एकत्र करणे गरजेचे आहे. आता ही प्रक्रिया सुरू होते आहे. ब्रह्मगिरी परिसरामध्ये १०८ कुंड/तीर्थ आहेत. या सर्वांचे पुर्नजिवीत केले आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अध्यात्मिक, पौराणिक कथा जर परत एकदा जगासमोर आणल्या तर सारे काही शक्य आहे. त्याचजोरावर भारतामध्ये सर्वात सुंदर असे तीर्थाटन क्षेत्र म्हणून ते नावारुपाला येऊ शकते.
नाशिकची मूळ ओळख ही तीर्थक्षेत्र अशी आहे. कुंभमेळा हे देखील आपली एक ओळख आहे. आता तर कुंभमेळा हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज (Intangeable heritage) जाहीर करण्यात आला आहे. यानुषंगाने खरंतर ब्रह्मगिरीचा परिसर हेरिटेज आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नुकतेच नाशिकला येऊन गेले. “ब्रह्मगिरी की हरीयाली और गोदावरी की पवित्रता”चा निश्चय झाला आहे. याला वेळ जरूर लागेल, पण आपण सर्व मिळून ते नक्कीच पूर्ण करूया.
“ब्रह्मगिरी की हरीयाली और गोदावरी की पवित्रता” मुळे सर्वात महत्वाचे म्हणजे थोड्याशा पावसाने जो त्र्यंबकेश्वर येथे पूर येतो, तो कमी होईल. धरणांमधून माती काढणे आणि धरण क्षमता वाढवणे योग्यच आहे. परंतु डोंगरांवरून माती वाहून येऊच नये, त्यासाठी “माती आडवा, पाणी जिरवा” याची सुरुवातही करावी लागेल.