‘अत्यंत तरल आणि भावस्पर्शी कविता
लिहिणारी कवयित्री’ : डॉ. ज्योती कदम
सामाजिक भन असणारी, चिंतनशील कविता लिहिणारी कवयित्री म्हणून डॉ. ज्योती कदम यांची साहित्यक्षेत्रात ओळख आहे. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या काव्य प्रतिभेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…
कविता ही प्रत्येक कविमनाच्या अंतरंगीची वेदना असते. तर कधी ह्रदयीचा हुंकार अथवा मनातील अव्यक्त भावना असते.अभिव्यक्ती शिवाय कवीच्या मनाला चैन पडत नसते. कविता निर्मिती नेहमी एकांतात घडणारी क्रिया आहे. कविता लिहितांना कवी नेहमी परकाया प्रावेश करत असतो. तो त्याचा कवी म्हणून जन्म असतो. खरं म्हणजे कवितेपुरता कवी जन्म घेतो. एरवी ती सामान्य माणूस असतो.कवीची कविता सामान्यांना जगण्याचे भान देते, दिशा देते, तसेच नव्या जाणीवा देते.तशाच जगण्याच्या नव्या प्रेरणा सुध्दा देते.
थोडक्यात सामाजिक दायित्व निभावण्याचा कविता अर्थात साहित्य प्रयत्न करते. असे साहित्य समाजाभिमुख बनले जाते. ते समाजाचे होते. अशाच सामाजिक भन असणारी, चिंतनशील कविता लिहिणारी कवयित्री म्हणून डॉ.ज्योती कदम यांची साहित्यक्षेत्रात ओळख आहे. आपल्या अवतीभवती घडणा-या घटनांच्या नोदी त्यांची कविता घेताना दिसते. स्त्री जीवनातील भयावकता त्यांची कविता टिपत जाते. त्या आपल्या कवितातून सर्वसामान्य माणसाच्या मनाची आंदोलनं अत्यंत तरल शब्दात टिपताना दिसतात.
कविता हे कलावंताच्या अभिव्यक्तीचं प्रभावी साधन आहे. समाजातील दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत पडताना दिसतात. समाजातील अनेक घटनांनी व्यथित होऊन त्यांच्यातला विद्रोह कवितेतून बाहेर पडताना दिसतो.कवयित्री डॉ. ज्योती कदम या स्वप्नरंजनात अडकून पडणाऱ्या कवयित्री नाहीत. तर त्या व्यवस्थेवर शब्दातून अंगार ओकणाऱ्या कवयित्री आहेत. त्या म्हणजे कवितेतून सडेतोड विचार मांडणारी कवयित्री आहेत.
विशेष म्हणजे सामाजिक आशयाची कवीता अतिशय गांभीर्याने लिहिणारी कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक आणि धार्मिक वागण्या-बोलण्यातला विरोधाभास त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून व्यक्त केला आहे. छद्मी देशभक्ती, जात्यान्धता आणि सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी होणारा खेळ, लोकांना केले जाणारे इमोशनल ब्ल्यॅकमेलिंग आणि त्यामुळे अशांत झालेला देश हे आजच्या समाजाचे खरे प्रश्न आहेत. समाजाला गोंधळात टाकून त्याला काही खरे समजू नये म्हणून जातीजातीत पेरले जाणारे विष; त्यातून निर्माण होणारे दंगेधोपे कवयित्रीने आपल्या कवितेतून अतिशय सजगतेने टिपले आहे.
व्यवहारातील प्रतिमा,प्रतीकांचा वापर त्या आपल्या कवितेत अतिशय चपखलपणे करतात. त्यामुळे वाचकाला जखडून ठेवण्याची ताकद त्यांच्या कवितेत आपोआप येत जाते. खरेतर ‘कवितेने जगण्याचं नवं भान द्यावं’ ही अपेक्षा व्यक्त करतांना एखादा मोठा पांढरा कागद म्हणजे कविता आणि त्यावरील छोटासा काळा ठिपका म्हणजे आयुष्य अशाप्रकारे जीवनामध्ये कवितेला अगदीच मोलाचे स्थान देतांना कवयित्री या कवितेची कधी लेक बनते तर कधी माय सुद्धा बनताना दिसतात. त्यामुळे ‘सारंच कुठे आलबेल आहे’ या संग्रहातील बहुसंख्य कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेतात.
एवढेच नाहीतर वाचक स्वतःला त्या कवितेत शोधू लागतो.हे त्यांच्या कवितेचं मोठेपण आहे. ग्रामीण, नागरी, पुरोगामी, स्री – मुक्तीवादी अशा कोणत्याही शृंखलेत अडकून न पडता कदमांच्या कविता या केवळ निखळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्या सारख्या वाचकांना वाटत राहतात.
कवयित्री डॉ.ज्योती कदम यांनी इतिहास या विषयात एम.ए., एम.फिल आणि पीएच.डी. केलेली आहे. त्याचप्रमाणे याच विषयात त्या सेट आणि नेट उत्तीर्ण आहेत. त्यांचा ‘ मोरपिस आणि गारगोट्या ‘काव्यसंग्रह (२०११) चित्रकाव्य काव्यसंग्रह (२०१३) ‘सारंच कुठे आलबेल आहे !’ काव्यसंग्रह(२०१९) एकविसाव्या शतकारंभीच्या मराठी कविता आणि कवी,(२०१९) ‘अ न्यू डायमेंशन ’ या ग्रंथाचे सहलेखन (२०११), ‘महिला सहाय्य कक्ष माहिती पुस्तिका’ शासकिय पुस्तिका(२०१३) मध्ये प्रकाशित झालेले आहेत.
कवयित्री ज्योती कदम यांना आजपर्यंत ‘कुसुमताई चव्हाण महिला भुषण विशेष सन्मान पुरस्कार’ , पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘आम्ही जिजाऊंच्या वारसदार’ हा राष्ट्रीय पुरस्कार , दै. लोकमतचा ‘सखी सन्मान पुरस्कार’, ‘पंढरी युवा गौरव साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार’, शिवांजली युवा साहित्यिक ‘राज्यस्तरीय पुरस्कार’ या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखा कार्यकारणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.त्याचप्रमाणे राज्यस्तरीय मराठी कवी लेखक संघटनेच्या सचिवपदी कार्यरत आहेत.
राज्यस्तरीय इतिहास अधिवेशने, इतिहास परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग असतो. विविध ग्रंथ आणि नियतकालिकांमध्ये त्यांचे इतिहास विषयाचे शोधनिबंध प्रसिध्द आहेत. त्यांचे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांमध्ये कथा,कविता,लेख,समिक्षणे प्रसिध्द होत असतात. ‘लेक वाचवा लेक जगवा’ या विषयावर शाळा महाविद्यालयात व्याख्याने,चित्रप्रदर्शने त्यांची भरवली जातात. अनेकदा चित्ररथाची निर्मिती व रथसंचलनाचे नेतृत्व,महिला मेळावे,पोस्टर्स निर्मिती महिला पोलिसमित्र या अभियानासाठी अनेक ठिकाणी व्याख्याने त्या देत असतात.
वर्तमानपत्रातून लेखन, सदस्या नोंदणीसाठी सक्रिय सहभाग त्यांचा असतो. ‘सुगमभारती’ इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या बालकवितेचा समावेश करण्यात आलेला आहेत.त्यांनी महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांवरून काव्यवाचन केले आहे. तसेच व्याख्याने दिली आहेत. नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकावरील समीक्षणे आदी लेखन अनेक दैनिकांमधून प्रकाशीत होत असतात.
महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कवी आणि कविता’ या सदराचे त्या दीड वर्षापासून संयोजन करीत असून त्यात समाविष्ट नामवंत व निवडक कविंच्या कवितांचा त्यांनी संपादीत केलेला काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित केले जाते. अशा अष्टपैलू कवयित्रीच्या कवितांचा आपण आज आस्वाद घेऊया.