इंडिया दर्पण विशेष
– कवी आणि कविता –
मानवी नात्यांची गुंफण करणारा
संवेदनशील मनाचा कवी : रवींद्र मालुंजकर
कवी रवींद्र मालुंजकर हे अत्यंत तरल आणि भाव कविता लिहिणारे कवी. विशेष म्हणजे अनेक कवींच्या कविता त्यांच्या तोंडपाठ आहेत. मोठमोठ्या कवी संमेलनांचे ते सूत्रसंचालन करतात. मातृह्रदयाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहेत. ते गेय आणि छंदोबध्द कविता लिहितात. त्यांच्या कवितेला निसर्गाचा लळा आहे.
निसर्गाच्या प्रतिमा आणि प्रतीकांचा ते कवितेत छान वापर करतात. माय, बाप आणि मुलींवर लिहिलेल्या त्यांच्या कविता वाचक आणि रसिक मनावर गारुड करतात. त्यांची कविता त्यांच्या अनुभवाचं विश्व घेऊन येते. मानवी मनातील भाव भावनांचं स्पंदन घेऊन येते. सामाजिक जीवनातील विविध स्तरांना स्पर्श करताना दिसते. स्त्री मनातील कारुण्य त्यांच्या कवितेत पाझरताना दिसते. बालमनातील निरागसता त्यांच्या कवितेत डोकावते. त्यांच्या कवितेत आई,बाप,लेक,मित्र अशी जवळची माणसं मधून डोकावत असतात. मानवी जीवन आणि आयुष्य यावर ते आपल्या कवितेतून अनेकदा भाष्य करताना दिसतात.त्यांच्या कवितेला कोणत्याच रूपबंधाचे वावडे नाही,तरी अष्टाक्षरी व अभंग छंदात त्यांच्या खूप काही कविता सामावलेल्या दिसतात.
एकमात्र खरं की त्यांची कविता स्वत:ची खास लय घेऊन येते.त्यामुळे ती वाचताना किंवा ऐकताना रसिक वाचकाला संमोहित करून टाकते.हे त्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.कवी रवींद्र मालुंजकर यांची कविता मानवी नात्यातील बंध-अनुबंध शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसते.मानवी प्रेम ,विश्वास या मुल्यांवर त्यांची कविता विशेष भर देतांना दिसते. यावरच समाजव्यवस्थेतील कुटुंबसंस्था उभारलेली आहे.त्या कुटुंबसंस्थेतील घटकाभोवती त्यांची कविता वावरताना दिसते. निसर्ग, मानवी मन, मानवी जीवन, मानवी प्रवृत्ती अशा विविध अंगांनी त्यांच्या कविता येतांना दिसतात.
एका विषयात त्यांनी स्वत:ला कधीच बंदिस्त करून घेतलेले दिसत नाही. म्हणून त्यांच्या कवितेत विविधता जाणवते. अवतीभवती वावरणारी माणसं, व्यवहारातील प्रतीकं आणि प्रतिमा यांचा सुंदर वापर त्यांनी आपल्या कवितांमध्ये करून घेतलेला दिसतो. त्यामुळे अनुभवाचा आंनद त्यांची कविता रसिकांना, वाचकांना देतांना दिसते.माणसांची सुखदुःख त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतात. त्याचबरोबर स्वतःच्या मनातलं हितगूज त्या कवितांमधून व्यक्त करताना दिसतात. कविता त्यांना त्यांची सखी वाटते. मैत्रीण वाटते. त्यामुळे त्यांची कविता ही संवादी आणि प्रवाही होताना दिसते.
निसर्गाच्या सानिध्यात ते ज्यास्त काळ वावरतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या कवितेत निसर्गातील सगळेच विभ्रम शब्दबद्ध होताना दिसतात. विशेष म्हणजे स्वत:चा आत्मशोध ते सदैव त्यांच्या कवितेतून घेताना दिसतात. त्यांच्या कवितांमध्ये मनातील अतिशय तरल भावना टिपण्याचा ते कशोसीने प्रयत्न करताना जाणवतात. तसेच त्यांच्या कवितेत विविध नाती डोकावताना दिसतात. विविध नात्यातील स्नेह, ओलावा, आत्मपरभाव, वृत्ती-प्रवृत्ती यांचा परामर्श कवितेमधून घेताना ते दिसतात.
मधूर काव्यमय शब्दांची गुंफण करणारे संवेदनशील मनाचे कवी म्हणजे रवींद्र मालुंजकर.कवी रवींद्र मालुंजकर नाशिक जिल्ह्यातील पळसे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते विद्यार्थीव पालक प्रिय शिक्षक असून एक खुमासदार सूत्रसंचालक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत रसिकप्रिय झालेल्या ‘कवितेची पाऊलवाट’ या काव्यमैफलीचे ते प्रमुख सूत्रसंचालक आहेत. ‘लग्नाची गाणी ते आजची कविता’, ‘आई माझा गुरू’, ‘युवकांनो तुमच्यासाठी,’ ‘कविता जगवा कविता जागवा’ यांसह विविध विषयांवर त्यांनी राज्यभरातील विद्यालये, महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिलेली आहेत.रोड येथील महाराष्ट्र साहित्य परिषडेचे ते कार्यवाह आहेत.
नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ या संस्थेचे स्थापनेपासून सचिव आहेत. त्यांची ‘आयुष्याचे गाणे’ हा काव्यसंग्रह, ‘मन उधाण वाऱ्याचे’ हा ललित लेखसंग्रह आणि ‘सूत्रसंचालनासाठी’ अशी साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांना ‘ साने गुरुजी प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा राज्य पुरस्कार’, ‘चंद्रपूर येथील राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार’, ‘जळगाव येथील उत्तर महाराष्ट्रीय सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार’, मुक्ताईनगर येथील ‘ शिवचरण उज्जैनकर फौंडेशनचा राज्य पुरस्कार’, ‘अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचा राज्य पुरस्कार’, भगुरचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार’,स्व.शांतीलाल संघवी (सर) प्रतिष्ठानचा मानाचा ‘नाशिकरोड भूषण पुरस्कार’. असे विविध पुरस्कार आणि सन्मान त्यांना लाभले आहेत.
आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच राज्यस्तरीय वक्तृत्व, काव्य, निबंध आदी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. 23 फेब्रुवारी 2019 रोजी संपन्न झालेल्या इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. डोंबिवली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते निंमत्रीत कवी होते. तसेच एप्रिल २०१७ मध्ये औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात ‘निमंत्रित कवी’ म्हणूनही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. चला तर मग आज आपण अशा कवीच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकू या.