‘निसर्गातील विविध घटितांचा आकृतिबंध कवितेत मांडणारा युवा कवी’ : प्रशांत केंदळे
प्रशांत केंदळे यांच्या कवितेत नेहमी त्यांच्या अवतीभवतीचा निसर्ग डोकावत राहतो. तिथली माती आणि जीवसृष्टीशी जडलेली नाती त्यांची कविता घेऊन येतांना दिसते.
वास्तव हा साहित्याचा खरा पाया असतो. समाजातील सभोवतालच्या विश्वाचे निरीक्षण कवी करत राहतो. त्याआधारे तो कल्पनेचे विश्व निर्माण करतो.जणू प्रतिसृष्टीच निर्माण करतो.म्हणून तो त्या विश्वाचा निर्माता ठरतो. आणि त्याने निर्माण केलेले साहित्य ही कलाकृती ठरत असते. अर्थात ही कलाकृती वास्तव जीवनातूनच आकाराला येत असते.
कवी हा वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या उपयुक्ततेपेक्षा सौंदर्य टिपण्याचा अधिक प्रयत्न करत असतो. जे सौंदर्य त्याच्या मनावर मोहिनी घालते, ते तो सत्यसृष्टीत उरतरून स्वतःचे एक कल्पनाविश्व उभे करतो. कवीमनाचा माणूस या सृष्टीकडे नेहमी वेगळ्या जाणिवेतून पाहत असतो. सामान्य माणूस मात्र व्यवहारी दृष्टीतून पाहतो. हा सामान्य माणूस आणि कवी यांच्यातील फरक म्हणावा लागेल. कवी हा संवेदनशील मनाचा असतो. त्याच्या आवतीभोवतीच्या समस्त घटनांचा परिणाम त्याच्या मनावर होत असतो. निसर्गातील ऋतूगणिक होणारे बदल, निसर्गाचे विविध विभ्रम त्याच्या मनाला नेहमी रुंजी घालत असतात.
प्रशांत केंदळे हे याच परंपरेतील कवी आहेत. त्यांच्या कवितेत नेहमी त्यांच्या अवतीभवतीचा निसर्ग डोकावत राहतो. तिथली माती आणि जीवसृष्टीशी जडलेली नाती त्यांची कविता घेऊन येतांना दिसते. त्यांची अनुभूती ही त्यांच्या कवितेच्या निर्मितीचं प्रेरणास्थान ठरते. त्यांनी अनुभवलेला शेतशिवार, तिथली झाडं,तिथला सारा निसर्ग त्यांच्या कवितेतून कागदावर उतरत येतांना दिसतो. खरं तर अनुभूती हीच कवितेच्या निर्मितीचे मूळ असते. कवीने अनुभवलेले सकल समांतर वास्तव कवितेच्या शब्दचित्रातून अभिव्यक्त होत असते.
कवी प्रशांत केंदळे याला अपवाद नाही. त्यांच्या प्रत्येक कवितेतून एक वेगळी प्रतिमासृष्टी वाचकांच्या मनावर गारुड करत राहते. खरं म्हणजे कवी हा प्रत्येक कवितेसाठी जन्म घेतो.त्याने कवितेला शब्दरूप प्रदान केलं की कवी अस्त पावतो. एरवी तो सर्वसामान्य माणसांसारखाच असतो. कवीच्या जडणघडणीत त्याच्या आवतीभोवतीच्या अनेक घटनांचा परिणाम होत असतो. प्रत्येक कवीची एक स्वतंत्र प्रतिमासृष्टी असते. तो त्या सृष्टीचा स्वामी असतो. कवी कल्पनेच्या सहाय्याने एक नवं विश्व निर्माण करत असतो.
सभोवतालच्या वातावरणाचे संस्कार कवी मनावर होतात. तसेच त्याच्या कवितेवरही होतात.प्रशांत केंदळे या युवा कवीच्या कवितेत गावखेड्यातील निसर्ग ओतप्रोत भरलेला दिसतो. ग्रामीण जीवनातील अनेक प्रतिमा, प्रतिकं डोकावताना दिसतात. खरं म्हणजे ते त्याच्या अनुभूतीच्या जगाचं प्रतिबिंब ठरतं. चांगली कविता जी असते ती वाचताना,ऐकताना आणि अनुभवतांना ती रसिक आणि वाचकांवर दीर्घकाळ परिणाम करते. अशीच कविता प्रशांत केंदळे यांनी ’ गुलमोहराचं कुकू ‘ या काव्यसंग्रहातून दिलेली आहे.
कवी प्रशांत केंदळे यांची कविता वाचकांच्या काळजावर हळूवारपणे मोरपीस फिरवून जाताना दिसते. ‘धुळीने भरला वारा, पिकांचे जावळ, फुलांचे गजरे, गुलाबी पावलं, हिरवा सूर्य, पावसाचे मोती, मतलबी वारे, नात्यांची ओल, दारिद्र्याचा धूर, हिरवी कविता, मातीचं गोकुळ, झाडांचं व्रत अशा विविध प्रतिमांमधून त्याच्या अनुभूतीचा सारा निसर्ग कळत नकळत चित्रित होतो. ‘झाडाझुडपांचाही मजला संसर्ग झाला… मिळाले हे कवितेचे रान माझाच निसर्ग झाला’ कवी आपल्या निसर्गवेडाची कबुली आपल्या कवितेतून देतांना दिसतो. तसेच ‘धूप हळूच जळते तसे जळते ढेकूळ… घेते मोहून ढगाला होते मातीचे ढेकुळ’ ही समर्पक ओळ खूप काही सांगून जाते.
‘मातीचं गोकुळं’ करण्याची क्षमता प्रशांत केंदळे यांच्या शब्दात आहे. कवीवर्य महानोर , निलेश पाटील यांच्या नंतर निसर्गाची लय आपल्या कवितेत घेऊन येणारा कवी म्हणजे प्रशांत केंदळे होय. ‘झाड झाड वाढतांना माती नभाला भिडते,/ काळी उजळण्या माती, पाणी तेलापरी जळे, / खुरांचे माळून गजरे वाटा लागल्या फुलाया,/ भरुदे आभाळा धरणीची ओटी, / जीवनाच्या सुपातून बाया पाखडती दुःखं, ह्या त्याच्या कवितांच्या काही ओळी त्यांच्या विचारांच्या प्रगल्भतेचा परीघ अधोरेखित करून जातात. प्रशांत केंदळे यांची कविता अत्यंत तरल असून,ती निसर्गातील विविध घटितांचा आकृतिबंध मांडताना दिसते.
कवितेबद्दलची आपली भूमिका मांडताना कवी लिहितो ‘पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी … कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी द्यावी’ प्रशांत केंदळे यांची कविता ही त्यांच्यासह वाचकांच्या जीवनाची आंनद संजीवनी ठरते. त्याच्या अनेक कवितेतून माय-बाप, मुली, पाऊस, झाड,ढग,सूर्य,विठ्ठल,तुकाराम आदिंसह विविध ऋतू विविध रूपातून डोकावत राहतात.
कवीची अनुभूती हे त्याच्या कवितेचं खरे भांडवल ठरत असतं.प्रशांत केंदळे यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कवितेत अनेक निसर्ग प्रतिमा आणि रूपकांची उधळण पाहावयास मिळते. अत्यंत नितळ, आणि आरसपाणी कविता हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेला स्वतःची अशी एक लय आहे, नाद आहे. त्यांची कविता रसिकांना तिच्या लयीत गुंतवून टाकणारी आहे. रूपकांच्या रुपात मोहून टाकणारी आहे. मानवी जीवनातील बंधानुबंध निसर्गाच्या लीळांमधून अभिव्यक्त करणारी आहे. स्वत:च्या लयीने संमोहित करण्याची मोहिनी त्यांच्या कवितेत आहे. त्यांच्या कवितेत मानवी वृत्ती-प्रवृत्तीचा मनोव्यापार आहे.प्रशांत केंदळे यांच्या कवितेत काय नाही,नदीचा काठ आहे. धुक्याची वाट आहे.
चढ उतरणीचा घाट आहे.रंगांची लयलूट आहे. मातीचा बुका आहे.गालावरती टीका आहे.अभंगातनं तुका आहे. बापलेकीची कहाणी आहे. गुलमोहराचं कुकू आहे. मातीची ओल आहे. कुणब्याचा सल आहे. पावसाचे अभंग आहे.आंनदाचे उमंग आहे, ऊन आहे,पाऊस आहे, पाखरांच्या पंखामध्ये उडण्याची हौस आहे. दुष्काळाची दैना आहे.श्रावणाचा महिना आहे.विठू आहे,मिठू आहे. देवकीचा कान्हा आहे, माऊलीचा तान्हा आहे. नदी आहे,नाले आहे, झरझरणारे झरे आहे. सय आहे,सखी आहे, निसर्गाचे नामस्मरण नित्य त्यांच्या मुखी आहे.अशा विविध रुपात त्यांची कविता वाचकांना भेटत राहते.
प्रशांत केंदळे हे एम.ए.मराठी, डी.एड, डी.एस.एम,असून साहित्यभूषण, पी.एचडी.साठी प्रविष्ठ आहेत ‘समकालीन सामाजिक जाणिवांचा मराठी कवितेवर झालेला परिणाम साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितांच्या संदर्भात’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे.येथे संशोधन करीत आहेत.’धोंडी’ या मोनिश पवार दिग्दर्शित व सयाजी शिंदे अभिनित चित्रपटात ‘गुलमोहराचं कुंकू’ या कवितेचा गीत म्हणून समावेश झालेला असून ते गीत त्यांनी स्वत: गायिले आहे.आगामी ‘फॅड’ या विजय कुमावत लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपटासाठी गीत लेखन केले आहेत. ‘गुलमोहराचं कुकू’ हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
दै.पुण्यनगरीतून ‘दुष्काळवाणी’ या काव्यसदरातून दुष्काळ या विषयावर अनेक कविता प्रसिद्ध.दै.लोकमतमधून ‘सीएनएक्स’ पुरवणीद्वारे नामवंत चित्रकारांच्या चित्रांवर आधारित चित्रकाव्य हे सदर प्रसिद्ध.दै.महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘कविताक्षरे या नावाने सदर लेखन,’फळा’ व ‘बापलेकीची कहाणी’ या पोस्टर पोएट्रीचे प्रकाशन.नाशिक आकाशवाणी नाशिक ‘युवावाणी व गोदातरंग’ या कार्यक्रमातून काव्यवाचन प्रसारित. रेडिओ मिर्ची, रेडिओ विश्वासवरही काव्यगायन प्रसारित.राज्यभरातील अनेक दिवाळी अंक, नियतकालिके व अनियतकालिकांतून कविता प्रसिद्ध. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहित्यभूषण परीक्षेत राज्यात सर्व प्रथम आल्याबद्दल(२०१५) इंद्रायणी पुरस्कार व ज्येष्ठ समीक्षक कै. चंद्रकांत वर्तक स्मृतीपुरस्कार प्राप्त. कै.पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमी, चिंचवडतर्फे कवी नारायण सुर्वे यांचा वारसदार कवी म्हणून सन्मान.२५ व्या राज्यस्तरीय ‘गदिमा महोत्सव’, भोसरी येथे ‘आम्ही गदिमांचे वारसदार’ हा सन्मान.साहित्यायन, सटाणा, कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धा.लोकमत युवा महोत्सव, मुंबई.बी.वाय.के महाविद्यालय राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धा (सर्वोत्कृष्ट निसर्ग कविता)नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ, नाशिक राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्यलेखन स्पर्धा. यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक लोकगीत स्पर्धा.नाशिक कवी, गजल लेखन स्पर्धा सार्वजनिक वाचनालय, नाशिक कवी गोविंद पुरस्कारासह अनेक’सावाना’ सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळावा उत्कृष्ट काव्य सादरीकरणासाठी कवी कैलास पगारे स्मृती पुरस्कार२०१७’.प्रसाद पवार फाउंडेशन, नाशिक यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या आकाशकंदील निर्मितीत सहभाग व वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस् इंडियाचे प्रमाणपत्र प्राप्त आहेत.’मराठा समाज सय उन्नती मंडळाचा समाजभूषण पुरस्कार.नाशिक एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, २०१७ ‘अनाथांचा नाथ’ या ४३ व्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम आलेल्या एकांकितेत ‘गुरुजी’ ही प्रमुख भूमिका त्यांनी साकार केली होती.चला तर आज त्यांच्या आवाजातील काही कविता ऐकूया.