वंचितांच्या व्यथांना कवितेचं अवकाश
बहाल करणारा कवी : भरत दौंडकर
आपल्या जगण्यातलं अवतीभोवतीचं सकलसमांतर वास्तव मोठ्या प्रमाणात अलीकडच्या मराठी कवितेत डोकावताना दिसते. अशाच पठडीतला,आतल्या हुंकाराला कवितेतून व्यक्त करणारा कवी म्हणजे भरत दौंडकर.
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी कविता वेगाने बदलत गेली. पुढे वृत्तालंकाराच्या जोखडातून कविता मुक्त झाली. आणि कवितेचे विश्व व्यापक होत गेले. कवितेने सर्व विश्व व्यापून टाकले. कुणी एकेकाळी राजदरबारात वावरणारी,मिरवणारी कविता रानावनातल्या जनसामान्यांच्या ओठांमधून उमटू लागली. कष्टकरी,शेतमजूर,कामगार,दलित,पददलित,भटक्या-विमुक्तांचे विविध प्रश्न ऐरणीवर घेऊन कविता येऊ लागली.
मनोरंजनापेक्षा आधुनिक कवितेने सामाजिक प्रश्नांना हात घातला. याचे सारे श्रेय दिले जाते कविवर्य बा. सी. मर्ढेकरांना. कल्पना रम्यतेपेक्षा वास्तवाला अभिव्यक्त करणारं साहित्य लिहिलं जावं. अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केल्याचे कळते. त्यांनी कवितेच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक बदलामुळे कविता सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे मर्ढेकरांची कविता सर्व सामान्य वाचकांना आपली वाटली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने कविता मुक्तछंदात वावरतांना दिसू लागली. तेव्हापासून अलीकडची कविता अधिक समाजाभिमुख होतांना दिसते.
खरे म्हणजे सामाजिक जाणिवांची कविता समाजजीवनाला गती देते. सामाजिक जाणिवांच्या विविध प्रश्नाला हात घालते. फुले-आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन साठोत्तरी काळात साहित्य, समाज, संस्कृती, नकार, विद्रोह, आत्मभान, बांधिलकी या घटकांना कवेत घेऊन जागृत संवेदनशील मनोवृतीतून दलित कविता लिहिली गेली. दलित,वंचित समाज्याच्या व्यथा,वेदना कवितेतून साहित्यप्रवाहात सामील झाल्याने मराठी साहित्याचे दालन ख-या अर्थाने समृध्द झाले. कारण जगण्यातली कविता ही अनेकांना आपली वाटते. ती अनेकांना प्रेरणा देत असते.
कारण त्यात आपलं प्रतिबिंब असतं. ते साहित्य वाचकाला आपलं वाटतं. त्यामुळेच वास्तववादी कविता वाचक,श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतं. कारण त्यात सामान्य माणसाचं जगणं असतं. त्याच्या आयुष्याचं प्रतिबिंब त्यात डोकावत असतं. असं साहित्य आपल्याला आपलं वाटतं. कारण त्यात आपल्या जीवनाच्या विविधांगाला स्पर्श केलेला असतो. म्हणून अलीकडे अनेक ग्रामीण,दलित कवितेत वास्तव जगणं खऱ्या अर्थाने लिहिलं जावू लागलं. आपल्या जगण्यातलं अवतीभोवतीचं सकलसमांतर वास्तव मोठ्या प्रमाणात अलीकडच्या मराठी कवितेत डोकावताना दिसते. अशाच पठडीतला,आतल्या हुंकाराला कवितेतून व्यक्त करणारा कवी म्हणजे भरत दौंडकर.
कवी भरत दौंडकर यांचे बालपण ग्रामीण भागात गेलेले आहेत. विशेष म्हणजे ते आजही नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागात वास्तव्य करून आहेत. त्यामुळे त्यांच्या आसपास घडणाऱ्या सामाजिक घटनांचा कळत नकळत त्यांच्या अभिव्यक्तीवर म्हणजेच कवितेवर परिणाम होतो. ग्रामीण जीवनातील अनेक घडामोडी त्यांच्या कवितेचा विषय बनताना दिसतो. त्यांच्या प्रकाशित झालेल्या ‘गोफणीतून सुटलेला दगड’ काव्यसंग्रहाचे शीर्षकच सर्वकाही सूचित करून जाते. ग्रामीण सामाजिक जाणिवांचे दर्शन त्यांच्या काव्यसंग्रहात पानोपानी दिसते.
‘गोफणीतून निसटलेला दगड’ हा कवी भरत दौंडकर यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. त्यात अत्यंत सामाजिक जाणीवेची कविता त्यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्रात असे काही कवी आहेत, ज्यांना मंचावरून जोरदार दाद मिळते. अन् ते त्याच ताकदीची कविताही लिहितात. असेच नव्या पिढीचे कवी म्हणून भरत दौंडकर यांच्याकडे पाहिले जाते. जागतिकीकरणाने सर्वसामान्य माणसाचे काय हाल होत आहे. याचे मार्मिक वर्णन त्यांनी आपल्या कवितांमधून टिपले आहे. आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने आपल्याला पडू लागली;पण या सा-यांमध्ये नात्यांची वीण सैल होत चालली. यावर दौंडकर यांची कविता घणाघात करते.
आपण कितीही समतेच्या गप्पा मारत असलो तरी अजून आपणास घरातच समता प्रस्थापित करता आली नाही. याची खंत त्यांची कविता करताना दिंसते. केवळ उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा मेळ न बसल्यामुळे शेतक-यांच्या आयुष्यात कर्जबाजारीपणा येतो. अशा शेतक-यांच्या आयुष्याचे वास्तव चित्रण त्यांची कविता करताना दिसते. आज शेतकरी प्रचंड हलाखीच्या व नैराश्याच्या गर्तेत गाडला जात आहे. खतं, औषधं, बियाणं, मजुरीचा खर्च आभाळा एवढा होत आहे. अन् शेतमालाचा भाव मात्र मातीमोल ठरवला जातो आहे.
खरं तर उत्पादन खर्च आणि उत्पन्न यात दिवसेंदिवस मोठी तफावत वाढत चालली आहे. शेतकरी स्वत:च्या हक्कांसाठी कधीच एकत्र येत नाही. तो ताकदीने लढत नाही. अशी त्याच्यावर नेहमीच टीका होते. पण त्यांची रोज जगण्याशी लढाई सुरूच आहे. कोणत्याच शासकीय घोषणा या देशातील शेतक-याला जगवू शकत नाही. हे पाहून त्यांच्या कवितेला धार चढताना दिसते.
एक गुंठा जागेला पाईनभर जमिनीचा भाव मिळतो. म्हणून शहराभोवतालच्या जमिनी विकून तिथली खेडी उद्ध्वस्त होत आहे. आलेला पैसा हा मौज मजा करण्यात घालवला जातो. पण पुढच्या पिढीचं काय ? असा सवाल त्यांची कविता करताना दिसते. आजच्या शिक्षण पद्धतीवर टीका करताना ते लिहितात- ‘ गुरुजी तुम्ही शिकवता ती शाळा आमची नाही /जी खाणीच्या खाली भरते ती आमची शाळा /तिथं हाती पेन्सिल नाही / सुताकीचा दांडा पकडतात अन् एका ठोक्यात दगडाला चिर पाडून पहिला धडा गिरवतात. . . /’
स्वतंत्र भारतातल्या भटक्या-विमुक्तांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश कधी पडेल ? आज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली. तरी अजूनही वंचित घटकांना आपण सामाजिक विकासाच्या मूळ प्रावाहात आणू शकलो नाही. याची खंत त्यांची कविता करतांना दिसते. शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात वंचितांच्या उत्थानाचा प्रश्न केव्हा सुटणार आहे ? याची खंत त्यांची कविता जाणीवपूर्वक करताना दिसते. भाकरीच्या श्लोकांचे रुपांतर नोकरीच्या सापळ्यात झाल्याने अशिक्षित असलेला वंचित समाजातील दारिद्र्य अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. नोकऱ्यांत गुणवत्तेपेक्षा तुमड्या भराव्या लागतात.
सरकारी नोकरीतील वशिलेबाजी, सरकारी कामांमधील टक्केवारी या सारख्या गोष्टींवर त्यांची कविता घणाघात करत जाते. सामाजिक विषमतेची पाळेमुळे केव्हा संपली जाणार? असा प्रश्न समाजव्यवस्थेला कविता करताना दिसते. त्यांच्या कवितेत वंचितांचा आक्रोश आहे. सामान्याचा संघर्ष आहे. सामाजिक विषमतेची खंत आहे. वेदनेचा हुंकार आहे. आत्म्याचा ओमकार आहे. जीवनाची लय आहे. गरीबीची सय आहे. विषमतेची बोच आहे. राजकारण्यावर रोष आहे. शिक्षणाचा मंत्र आहे. जगण्याचं तंत्र आहे. फत्थाराला फोडण्याचं सामर्थ्य आहे. नाविन्याचा शोध आहे. वेदनेचा बोध आहे. त्यांची कविता स्वातंत्र्याचा हिशोब मांडताना दिसते. तसीच जातीयतेच्या प्रश्नावर पेटून उठते. त्यांची कविता तळागाळातील माणसांचे प्रश्न मांडते. भूमिहीन होणाऱ्या कास्तकारांच्याभावी पिढ्यांच्या चिंतेने व्याकुळ होते. अशा कलंदर कलावंताचा आज आपण कवी आणि कविता या सदरात परिचय करून घेणार आहोत.
कवी भरत दौंडकर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव(म्हाळुंगी) येथील रहिवाशी असून महाराष्ट्रातील नामवंत कवी आहेत. त्यांचा ‘गोफणीतून निसटलेला दगड’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचा आगामी ‘नदीच्या मुली’ हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध वाङ्मयीन नियतकालिके,व दिवाळी अंकांतून कथा,कविता,ललित,समीक्षा लेखन केले आहेत. विशेष म्हणजे किशोर या किशोरवयीन मुलांच्या मासिकातून विपुल प्रमाणात त्यांचे बालसाहित्य प्रसिध्द झालेले आहेत.
त्यांच्या ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या एकाच संग्रहास आजपर्यंत अकरा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत. त्यात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ताविद्यापिठाचा ‘विशाखा पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा ‘कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार’, पुणे येथील ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’,ग्रामजगर साहित्य संमेलनाचा ‘बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार’, अकोल्याचा तिफन काव्य पुरस्कार,पुणे येथील अत्यंत मानाचा असा ‘गदिमा काव्य पुरस्कार’,पुणे येथील ग्रंथालय दत्तक चळवळीचा ‘बळीवंश काव्य पुरस्कार’,सासवड येथील अत्रे साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा ‘साहित्य रत्न पुरस्कार’, बार्शी येथील ‘विश्वकर्मा साहित्य पुरस्कार’,मध्यप्रदेशचा‘सोनिंदर साहित्य पुरस्कार’,सोलापूरचा‘कवीवर्य रा. ना. पवार साहित्य पुरस्कार’. यांच्यासह इतर अनेक प्रादेशिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या संग्रहावर दोन विद्यर्थ्यांनी एम. फीलसाठी संशोधन केलेले आहेत.
विशेष म्हणजे भारतीय साहित्य अकादमीच्या वतीने मिझोराम येथे राष्ट्रीय चर्चासत्रात प्रत्येक राज्यातील एक याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातून मराठी भाषेचे साहित्यविषयक प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना २०१८ साली मिळाली ह्प्ती. त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलन,जागतिक मराठी साहित्य संमेलन,अखिल भारतीय बाल कुमार साहित्य संमेलन,व इतर अनेक विभागीय साहित्य संमेलनात सातत्याने त्यांचा सहभाग राहिलेला आहे. तसेच महाराष्ट्रभर विविध साहित्य समेलनांतून निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग असतो.
दूरदर्शनच्या आय बी एन लोकमत,मी मराठी,साम टी व्ही मराठी,ए बी पी माझा,टी व्ही नाईन, इ टी व्ही मराठी,लॉर्ड बुद्धा चॅनेल, झी चोवीस तास,आशा विविध वाहिन्यांवर कवितांचे सादरीकरण केलेले आहेत. त्याचबरोबर विविध आकाशवाणी केंद्रावर कविता वाचनाचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. विविध विद्यालये आणि महाविद्यालयात व्याख्याने व चर्चासत्रात त्यांचा नियमित सहभाग असतो. पाठयपुस्तक मंडळावर मराठी पाठ्यपुस्तकावर समीक्षक म्हणून काम केलेले आहेत.
विशेष म्हणजे ते विविध साहित्यविषयक पुरस्कार समित्यांवर निवड समितीत काम करतात. सिनेकलावंत सयाजी शिंदे निर्मित ‘बैल अ बोलबाला’ या संगीत नाटकात त्यांच्या कवितेचा समावेश झालेला आहे. गुगलवर व यु ट्यूबवर त्यांच्या अनेक कविता व्हायरल झालेल्या आहेत. त्यातल्यात्यात ‘गोफ’ ही सामाजिक आशयाची कविता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेली कविता आहेत. असा चित्रलेखा मासिकाने उल्लेख केला आहेत. ‘नोटबंदी’व‘स्वप्नांचे खून’ या दोन कविता सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात पहिल्या गेल्या आहेत. आजच्या कवी आणि कविता या सदरात आपण त्यांच्या आवाजात काही कविता ऐकूया.