इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो
फ्लॅट घेतला, मोजून पाहिला का?
सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपयांची भाजी किंवा अन्य वस्तू घेताना आपण खुप घासाघीस करतो. भाजी किंवा फळ घेताना आपण विक्रेत्याला त्याच्या तराजूबद्दलही विचारतो. पण, जेव्हा आपण लाख किंवा कोटी रुपयांची वास्तू (घर) घेतो त्यावेळी आपण मात्र हा व्यवहार डोळे झाकून करतो. आपण आपले घरच मोजून घेत नाही. इथेच खरी ग्राहकाची मोठी फसवणूक होते.
मित्रानो फ्लॅट घेतला…..मोजला का?
किती स्क्वेअर फूट आहे…
अग्रिमेंट मध्ये किती स्क्वेअर फूट आहे आणि प्रत्यक्ष किती स्क्वेअर फूट आहे?
आपण घर ताब्यात घेताना ते मोजून पाहिलेच नसेल.
अगदी इंजिनियर लोक पण मोजून पहात नाहीत तर सामान्य लोकांचे काय?
घराची मोजणी न करताच फ्लॅट चा ताबा घेतात.
ग्राहक इतके जागृत असतात की बाजारातून भाजी आणताना वजनाची भरपूर काळजी घेतात. शिवाय एखादा बटाटा कांदा खराब असेल तर त्वरित बदलून घेतात. अगदी व्यवस्थित निवड करून घेतात कारण पैसे द्यायचे असतात.
आणि वीस रुपये किलो चे बटाटे, कांदे हे वजनात ५० ग्रॅम कमी भरले तर किती मोठे नुकसान होईल ? हो की नाही?
फ्लॅट घेताना कर्जाचे पैसे असतात म्हणजेच आपले स्वतःचेच पैसे असतात.
आपल्या निष्काळजीपणा मुळे आणि आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे घर घेतल्यावर क्षेत्रफळ कमी मिळाले तर जास्त नुकसान होऊ शकते.
१ चौ. फूट जागा कमी मिळाली तर कमीत कमी रुपये ३५०० ते १५००० नुकसान होते. (कोणत्या शहरात आणि कोणत्या भागात आपण फ्लॅट घेता त्यावर अवलंबून असते.
आपण करारनामा करतो तो पण वाचत नाही पण रजिस्ट्रार आपणास घराचे क्षेत्रफळ, किंमत इत्यादी बाबत इंडेक्स दोन मध्ये नमूद गोष्टी चेक करणेस सांगतात.
बिल्डर करारनामा करताना फ्लॅटचे क्षेत्रफळ नमूद करतात आणि त्यात फुटाचे अपूर्णांक पण लिहितात म्हणजे ४८९.३ चौरस फूट असे. मग आपण सांगा घर ताब्यात घेताना मोजून नको का घ्यायला. बाजारातून सदरा घेताना पण आपण ४ वेळा घालून बघतो व बरोबर साईज आहे का ते तपासून बघतो.
कांदे बटाटे मोजून व खराब असतील तर बदलून घेतो. मॉल मधे तर ग्रामचा पण विचार केला जातो तसेच करारनामा करताना बिल्डर अपूर्णांक पण पकडतो व फ्लॅट विकतो मग प्रत्येक ग्राहकाची ही जबाबदारी आहे की नाही की आपण आपला गाळा फ्लॅट ताब्यात घेताना मोजून घेतलाच पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल मी इंजिनियर नाही एक सामान्य ग्राहक आहे मग मी कसा मोजू?.
फ्लॅटचे क्षेत्रफळ मोजणे सोपे करून सांगतो. आपण शाळेत ७वी-८वी मधे गणितात चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे शिकला आहात. लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ. तसेच फ्लॅट मधे प्रत्येक खोलीची लांबी व रुंदी मोजून आपणास आपले कार्पेट एरिया (चटई क्षेत्रफळ) काढता येते व रेरां नुसार कार्पेट येरियानेच गाळा विकावा असे बंधन घातले आहे. आता आपणास कार्पेट व बिल्टअप मधील फरक सांगतो. कार्पेट एरियामधे आपण भिंतीची एरिया मिसळली की आपणास बिल्टअप एरिया मिळेल.
जर खोलीची लांबी १० फूट व रुंदी १० फूट असेल तर कार्पेट एरिया १०० चौरस फूट होतो. बाहेरची भित साधारण पणे ६ इंच जाड असते व अंतर्गत भितींची जाडी ३ते४ इंचच असते.
आपण सर्व भिंती ६ इंच पकडल्या तर बिल्टअप क्षेत्र हे ११ फूट गुणिले ११ फूट म्हणजेच १२१ स्केअर फूट होईल.
तसेच मोजणी करताना ज्या भिंती सामाईक आहेत त्या निम्या निम्याच पकडायाला पाहिजेत म्हणजे ६ इंच असतील तर ३ इंच एकाची व ३ इंच दुसऱ्या फ्लॅट धर्माची. या केस मध्ये बांधीव(बिल्टअप) क्षेत्रफळ हे १० फूट ६ इंच गुणिले १० फूट ६ इंच म्हणजेच ११५.५ चौरस फूट होईल.
बिल्डर लोक हे बिल्टअप एरिया काढताना कार्पेट एरियामधे ३५% ते ४०% लोडींग करतात व जास्त फायदा घेतात.
म्हणजेच १०० स्क्वेअर फूट कार्पेट हा ११५.५ स्क्वेअर फूट बिल्टअप असताना आपणास १४० स्क्वेअर फूट बिल्टअप म्हणून विकतात.
तर ग्राहक राजा आता आपण आपला फ्लॅट मोजा आणि जर कमी क्षेत्रफळ असेल तर बिल्डरकडे नुकसान भरपाई अवश्य मागा.
सदर नुकसान भरपाई आपण ग्राहक कोर्टात मागू शकता.
मित्रांनो, फ्लॅट मोजताना आपण फ्लॅटची उंची पण मोजली पाहिजे. कारण त्यात पण आपण फसू शकता. फ्लॅटची उंची किती आहे हे नकाशामधे एक सेक्शन काढून नमूद केलेले असते. साधारण पणें खालील फ्लॅटचा स्लॅब ते वरील फ्लॅटचा स्लॅब यात १० फूट अंतर असते पण बिल्डर व आर्किटेक्ट हे जास्त मजली इमारत असते तेव्हा प्रत्येक फ्लॅटची अंतर्गत उंची ८ फूट ६ इंच ते ९ फूट ६ इंच ठेवतात त्यामुळे इमारतीच्या उंचीमधे अजून एखादा गाळा बसेल असा विचार केला जातो.
तसेच नकाशामध्ये जर १० फूट उंची असेल व प्रत्यक्षात ९ फूट ६ इंच दिली तर शंभर फ्लॅटचे स्कीम मधे ५० फूट उंची कमी बांधली जाऊन परत ५ फ्लॅट ग्राहकांचेच पैशात फुकटात बांधून मिळतील असा विचार करून उंची कमी देतात असा आमचा अनुभव आहे.
तरी ग्राहकांनी फ्लॅटचा ताबा घेताना क्षेत्रफळ व उंची नक्की मोजून बघावी व वेळ पडल्यास नुकसान भरपाई साठी ग्राहक आयोगात जावे.
आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत सल्ला घेऊ शकता.
आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005. तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675