इंडिया दर्पण विशेष लेखमाला – जागो ग्राहक जागो
बिल्डरने अजून सोसायटीची स्थापना केली नाही? मग हे करा…
ग्राहक राजा, फ्लॅटचा ताबा घेतला पण बिल्डरने अजुन सोसायटीची स्थापना केली नाही? त्यामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत आता काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात फारशी आणि योग्य माहिती नसल्याने ग्राहक काहीच करताना दिसत नाहीत. आज याचसंदर्भात आपण सविस्तरपणे जाणून घेऊ…
ग्राहक मित्रानो आपण फ्लॅट बुक केला आणि करारनामा केला. सदर करारनामा नक्कीच संपूर्ण वाचला नसेल त्यामुळे सोसायटी स्थापन कधी होते हेही माहीत नाही. बिल्डरने फ्लॅटचा ताबा दिला पण सोसायटीची स्थपना केली नाही अशा घटना या सर्रास होत असतात. पुण्या सारख्या शहरात आज पर्यंत फक्त २०००० सोसायटी स्थापन झाल्या आहेत. वास्तविक एका वर्षात कमीत कमी 1 हजार सोसायटीचे/इमारतीचे बांधकाम होत असेल पण तरीही बिल्डर सोसायटीची स्थापना करत नाही.
बिल्डरने सोसायटी स्थापन करण्यासाठी करारनाम्यात नमूद करून पैसे तर घेतले असतील आणि त्याशिवाय ताबा पण दिला नसेल.
तर मित्रांनो आता आपण प्रथम पाहू की बिल्डर सोसायटीची स्थापना का करत नाही आणि केली तरी सोसायटीचे हस्तांतरण का करत नाही. सोसायटी ची स्थापना झाली की बँकेतून लोन घेणे साठी सोसायटी noc देते, बिल्डर ला noc मागायची गरज नाही. काही बिल्डर हे noc साठी प्रचंड प्रमाणात पैसे घेतात. सोसायटी स्थापन झाली की राहिलेला एफएसआय किंवा काही कायद्यात बदल होऊन एफएसआय वाढला तर त्याचेवर सोसायटीची मालकी येते ते अधिकार बिल्डर ला राहत नाहीत.
बिल्डर टीडीआर विकत घेऊन आपल्या इमारतीवर अधिकचे मजले चढवू शकत नाही त्यामुळे सभासद वाढून सेवा सुविधा वर ताण येणे, पार्किंग चे प्रश्न निर्माण होणे. इत्यादी, कॉर्पोरेशन मध्ये सोसायटी कडून विविध ना हरकत चे दाखले मागितले जातात.
आता आपण समजून घेऊ सोसायटी स्थापन कायद्या नुसार कधी करतातय
तर मित्रानो सहकार कायदा 1960 नुसार आणि मोफा कायदा 1963 नुसार, त्यातील कलम 10, नियम ८ नुसार सोसायटीची स्थापना ही 51 टक्के फ्लॅट ची विक्री झाली म्हणजेच 100 फ्लॅट पैकी 51 फ्लॅटची विक्री करारनामे बिल्डर ने केले की त्या दिवसापासून चार महिन्यात सोसायटी स्थापन झाली पाहिजे.
ग्राहक मित्रांनो अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे काम करत असताना आमच्या असे लक्षात आले आहे की बऱ्याच बिल्डरनी फ्लॅट ची 100 टक्के विक्री केलेली असूनही तसेच सर्व लोकांना फ्लॅटचा ताबा देऊनही कित्येक वर्षे झाले तरीही सोसायटी ची स्थापना केलेली नाही. त्यामुळे असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत, पाणी, लाईट बिल, पार्किंग, मेंटेनन्स अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय बिल्डरने जे वन टाईम मेंटेनन्स जमा केले आहे, अडवांस मेंटेनन्स गोळा केला आहे तो सोसायटी कडे हस्तांतरीत न करता स्वतः साठी वापरात आहे.
आता याची कारणे काहीही असूद्या पण बिल्डरने 51 टक्के लोकांना फ्लॅटची विक्री केले नंतर चार महिन्यात सोसायटीची स्थापना केली नसेल तर तो मोफा 1963 या कायद्याचे कलम १३ प्रमाणे गुन्हा आहे आणि आपण बिल्डर वर इंडियन पिनल कोड प्रमाणे सुधा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवू शकता, त्याचे वर FIR दाखल करू शकता आणि स्थानिक पोलीस त्याबाबत चाल ढकल करत असतील तर पोलिसांची पण वरिष्ठांकडे तक्रार दाखल करू शकता. प्रथम आपल्या भागातील सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा सुप्रिटेडेंट ऑफ पोलीस (SP) तसेच त्यांनीही तक्रार दाखल करून घेतली नाही तर पोलिस कमिशनर यांचे कडे तक्रार दाखल करावी. आणि यातील कुणीही तक्रार दाखल करून घेतली नाही तर आपण स्थानिक कोर्ट मध्ये पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करणे साठी आदेश देणे साठी केस दाखल करू शकता.
या शिवाय शासनाचे धोरणानुसार आपण बिल्डर चे सहकार्याविना सोसायटी ची स्थापना करू शकता.
बिल्डरचे सहकार्य शिवाय कशी सोसायटी स्थापन करायची ते आता पाहू.
शक्यतो सर्व लोकांनी एकत्र येवून बिल्डरला नोटीस द्यावी त्याचा नमुना खालील प्रमाणे..,( वकीलाकडे याच नोटिशिला ५०००/- आकारले जाऊ शकतात)
विषय: ……..नियोजीत सहकारी गृह निर्माण संस्था स्थापन करणे बाबत.
महोदय,
महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायदा १९६३ चे कलम १०, नियम ८ नुसार सहकारी संस्था स्थापन करणे साठी प्रोजेक्ट/इमारतीतील ५१ टक्के लोकांना आपण फ्लॅटची विक्री केली की ४ महिन्यांचे आत त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे बिल्डर/प्रमोटर वर बंधनकारक आहे. आपण मात्र आज रोजी पर्यंत सहकारी संस्था स्थापन केली नाही आणि आपण सदर कायदा कलमाचे उल्लंघन केले आहे आणि महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट १९६३ चे कलम १३ नुसार आपण शिक्षेस पात्र आहात आणि त्यानुसार एक वर्ष कारावास आणि रुपये ५०००० दंड आपणास होऊ शकतो.
तरीही आपणास पुन्हा एकदा संधी देणेसाठी या नोटीस द्वारे असे सूचित करण्यात येते की आपण येत्या १५ दिवसात सोसायटीची स्थापना करणे साठी योग्य ती कार्यवाही करावी जसे सर्व सभासदांची सभा बोलावणे, त्यात मुख्य प्रवर्तकाची निवड करणे, सोसायटीचे नाव ठरवणे आणि ते आरक्षित करणे साठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे इत्यादी.
तसेच सर्व फ्लॅट धारक लोकांशी केलेल्या वैयक्तिक करारनामा मधील पान……मधील अट क्रमांक ……नुसार आपण सोसायटी स्थापन करणे साठी प्रत्येकी रुपये…….. येवढे घेतले आहेत. वास्तविक सोसायटी स्थापन करणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि सहकार खाते यांचेकडे चौकशी केली असता जास्तीत जास्त रुपये १०००/- एवढाच खर्च येतो तो असा
१) रुपये ५००/- शेअर मनी प्रत्येकी (५ भागाचे रुपये १००/- प्रमाणे एकूण रुपये ५००/-) ,
२) रुपये १००/- प्रवेश फी प्रत्येकी
३) सर्वांचे मिळून रुपये ३००/- सोसायटी कागदपत्रे त्यात byelaw पुस्तके ३, फॉर्म A,B,C,D आणि आय बुक, प्रोसिडींग वही इत्यादी
४) रुपये ४०० प्रत्येकी, सभासदांचे प्रवास खर्च, स्टेशनरी, वकील फी इत्यादी साठी.
मात्र आपण रुपये…… प्रत्येक फ्लॅट धारकाकडून सोसायटी स्थापन करणे साठी घेतले आहेत. सदर रक्कम ही खूपच जास्त होते तरी जादा घेतलेले रुपये…….. प्रत्येकी १८% व्याजाने ही नोटीस पोहोचले पासून १५ दिवसात परत करावेत.
सदर नोटीसचा खर्च रुपये…….आपणावर लावत आहे सदर खर्च आपणाकडून वसूल केला जाईल
सही
नाव
तारीख
सदर पत्राची एक प्रत आपण जपून ठेवावी आणि आपण रजिस्टर पत्राने, स्पीड पोस्ट ने त्या बिल्डरला ही नोटीस पाठवली.
बिल्डरने एक महिन्यात सोसायटीची स्थापना केली नाही तर आपण बिल्डर चे सहकार्यविना सोसायटी स्थापन करणे साठी जिल्हा उप निबंधक यांचे कडे आर्ज दाखल करावा.
तसेच आपण ग्राहक आयोगात संयुक्त रित्या तक्रारही दाखल करावी.
ग्राहक मित्रांनो आपण शांत बसू नका, अन्याय सहन करू नका. जागे व्हा आणि आपले हक्क, आपले अधिकार जाणून घ्या, त्याची मागणी करा अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही सर्व देशभर विस्तारलेली संस्था आहे आणि आपण मोफत मागदर्शन घेऊन सोसायटीची स्थापना करा आणि ग्राहक आयोगात तक्रार पण दाखल करा. आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.. मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*सातारा* – शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* – अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* – रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- शशीकांत हरीदास 9423536395
*सांगली* – सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* – वदंना तोरवणे 9421526777
Column Jago Grahak Jago how to form society by vijay sagar