इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
हॉस्पिटलमधील औषध दुकान
ग्राहक मित्रांनो, आज आपण अतिशय गंभीर आणि आपल्या जीवनाशी निगडीत अतिशय महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत. आजकाल जवळपास सर्वच हॉस्पिटल किंवा क्लिनिकचेच स्वतःचे फार्मसी (औषध दुकान) असते. आणि तेथूनच औषध घेण्याची सक्ती केली जाते. मात्र, ही सक्ती कायद्यान्वये आहे का, हे जाणून गेणे आवश्यक आहे. हॉस्पिटल मधील फार्मसी मधून औषध घेणे जरुरी नाही, शक्यतो टाळा आणि कमीत कमी ४०% पैसे वाचवता येतात. ते कसे, हे आता आपण सविस्तरपणे पाहू
ग्राहक राजा हॉस्पिटल मध्ये जेव्हा आपला पेशंट दाखल असतो तेव्हा आजकाल जवळ जवळ ९०% हॉस्पिटल मध्ये त्यांचे स्वतःचे फार्मसी(औषध दुकान) असते आणि आपल्याला सांगितले जाते की तुम्ही काहीही आणायची गरज नाही एकदा पेशंट दाखल झाला की त्याला लागणारी औषधे, इंजेक्शन, सलाईन, वेगवेगळे किट, कॅथरिटर, सिरिंज, सुया, डीस्पोसेबल साहित्य, ग्लोव इत्यादी सर्व साहित्य आम्ही ऑनलाईन आमच्या फार्मसीला पाठवू तुम्ही निश्चिंत रहा. आपण भेटायच्या वेळी या, भेटा आणि आम्ही सांगू त्या त्या वेळी फक्त पैसे भरा. पैसे भरण्यासाठी देखील आपण हॉस्पिटल मध्ये येणेची गरज नाही ऑनलाईन भरा असे सांगितले जाते.
शिवाय पेशंट ॲडमिट करताना आपल्याला आवर्जून विचारले जाते की इन्शुरन्स आहे का? काही पॉलिसी आहेत का?, एखाद्या कंपनीचे कर्मचारी आसल्यास त्यांचे पत्र वगैरे आहे का?
आपल्याला प्रथम वाटते की काय भारी सोय आहे ह्या हॉस्पिटल मध्ये. काहीही कटकट नाही, एकदा हॉस्पिटल मध्ये ठेवले की डायरेक्ट डिस्चार्जचे वेळी घेऊन जायचे, खूप छान.
ग्राहक मित्रानो जेव्हा डिस्चार्जची वेळ येते तेव्हा मात्र डोळे पांढरे होतात कारण त्यावेळी बिल पाहून एवढे पैसे कसे झाले असे वाटते आणि मग काही नातेवाईक जे गरम डोक्याचे असतात ते सरळ हॉस्पिटल मॅनेजमेंटशी भांडायला जातात.
मॅनेजमेंट मधील लोक तर मास्टर बिझनेस मॅनेजमेंट कोर्स(MBA) करून आलेले असतात. शिवाय हॉस्पिटल मध्ये मार्शल ठेवलेले असतात तेव्हा तसे भांडून काही उपयोग होत नाही.
हॉस्पिटल मॅनेजमेंट जास्त त्रास नको म्हणून हजार दोन हजार रुपये बिल कमी करते आणि नातेवाईकांची बोळवण करते.
ग्राहक मित्रानो, आपणास माहीत आहे का, हॉस्पिटल मधील फार्मसी मध्ये जी औषधे असतात, इतर साहित्य असते ते सर्व ठराविक कंपन्यांचेच असते. शिवाय त्यावर ठराविक किंमत छापलेली असते.
हॉस्पिटल मधील डॉक्टरने लिहून दिलेली औषधे ठराविक ब्रँडची असतात ती इतर ठिकाणी मिळत नाहीत असे आपल्याला वाटते. मित्रानो कोणतेही औषध ब्रँडेड म्हणजे चांगले असे अजिबात नाही. जेनरिक औषधे देखील त्याच क्वालिटीची असतात कारण त्यांना उत्पादन करणे साठी एफडीए त्याशिवाय परवानगी देत नाही.
काही हॉस्पिटल मधील मॅनेजमेंट ही डॉक्टर लोकांना टार्गेट देत असते असे कित्येक डॉक्टर खाजगीत सांगतात. त्यामुळे तेवढा धंदा मिळालाच पाहिजे असे त्यांना बजावलेले असते. शिवाय ठराविक हॉस्पिटलचे पॅनल वरील डॉक्टर म्हणून डॉक्टरचे नाव मोठे होत असते त्यामुळे डॉक्टर हे नाईलाजाने अशा हॉस्पिटल्स मध्ये कन्सल्टंट म्हणून काम स्वीकारतात.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की यात ग्राहक म्हणून आपण जास्तीत जास्त काय करू शकतो.
तर ग्राहक मित्रानो जेव्हा आपण आपल्या पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करतो तेव्हा आपण हॉस्पिटल मॅनेजमेंटला लिहून द्या की लागणारी सर्व औषधे, गोळ्या, इंजेक्शन आणि औषधोपचाराचे साहित्य आम्ही स्वतः विकत आणून देऊ.
आपण हॉस्पिटलचे जवळील इतर फार्मसी मध्ये जाऊन सदर औषध आणू शकता किंवा त्या दुकानातील व्हॉट्सॲप नंबर घेऊन येऊन त्यावर प्रिस्क्रीप्शन पोस्ट केल्यास, आपणास सदर सर्व औषधे तो दुकानदार आणून देऊ शकतो किंवा डायरेक्ट हॉस्पिटल मॅनेजमेंटकडे सुपूर्द करू शकतो. आज काल पुण्यात असे कित्येक औषध दुकानदार मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर दुकान टाकून औषधे डिलिव्हर करत आहेत.
असे का करायचे तर ग्राहक मित्रानो फार्मसी लॉबी उपचारात लागणारी सर्व औषधे, गोळ्या, इंजेक्शन आणि इतर सर्व मेडिकल साहित्य यांचेवर एमआरपी ३००% ते ६००% जास्त छापते आहे कारण एमआरपी किती छापावी त्यावर सरकारचे कुठलेही बंधन नाही. कायद्यातील याच पळवाटीचा गैरफायदा घेत आहेत.
कित्येक औषध दुकानदारांचे दुकानावर आपण बोर्ड पाहतो की आमच्याकडे औषधांवर ७०% ते ८०% डिस्काउंट मिळेल. हे का शक्य आहे कारण एमआरपी जास्त छापली जाते.
ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्ण दाखल असतो तिथे बिल हे आपणास एमआरपी प्रमाणेच लावतात आणि त्यावर कोणतेही डिस्काउंट दिले जात नाही आणि तसे करणे हे बेकायदेशीर पण नाही. त्यामुळे आपल्याला ४०% ते ७०% बिल जास्त लागते कारण इतर ठिकाणी त्यावर डिस्काउंट मिळत असतो जो हॉस्पिटल देत नाही.
वास्तविक हॉस्पिटलला होलसेल मध्ये औषधे लागतात आणि ते होलसेलनेच खरेदी करतात त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात डिस्काउंट मध्ये औषधे मिळत असतात पण ते हा फायदा ग्राहकाला देत नाहीत जरी हॉस्पिटल्स धर्मादाय ट्रस्ट खाली नोंदलेली असली तरीही ते धर्मादाय काम करत नाहीत तर ते कॉर्पोरेट इंडस्ट्री चालवत आहेत असेच वाटते. सरकार कडून करात सवलत मात्र याच कारणासाठी घेत असतात.
भारतातील कोणत्याही हॉस्पिटलमधे आपण आपला पेशंट दाखल करताना लेखी अर्ज देऊन आपण स्वतः औषधे आणू असे सांगू शकता.
हॉस्पिटल किंवा डॉक्टर आपणावर त्यांच्याच फार्मसी मधून औषध घ्या अशी सक्ती अजिबात करु शकत नाही.
हॉस्पिटलला खालील प्रकारचे अर्ज देऊन आपले बिल कमी व्हायला मदत करा.
प्रती,
चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर/ मॅनेजर,
…………….. हॉस्पिटल
अर्ज़दार –
विषय – मेडिकल औषधे / साहित्य हॉस्पिटल बाहेरच्या फ़ार्मसी मधुन पुरवण्या बाबत …
महोदय ,
उपरोक्त विषयान्वये , आपणास विनंती अर्ज़ करतो / करते की आपल्या ……….. येथे माझे नातेवाईक श्री / श्रीमती / सौ ……………………………………………………………………………
हे पेशंट दाखल असुन त्यांना लागणारी सर्व मेडिकल औषधे / साहित्य हे बाहेरच्या फ़ार्मसी मधुन आपल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार उपलब्ध क़रुन देईल. या साठी मला परवानगी दयावी ही नम्र विनंती
कळावे,
आपला विश्वासु
…… पेशंटचे नातेवाईक
तेव्हा ग्राहक मित्रानो आपले हक्क समजून घ्या, आपली जबाबदारी समजून घ्या.
हॉस्पिटल मधील लोकांना बिल जास्त आले म्हणून मारपीट करू नका, कायदा हातात घेऊ नका. त्यापेक्षा आधीच काळजी घ्या आणि आपले मोलाचे कष्टाचे पैसे वाचवा.
आपणास ग्राहक म्हणून मोफत मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी संपर्क साधा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे ४११०३०.
वेबसाईट: www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
Column Jago Grahak Jago Hispital Medical Shop by Vijay Sagar
Drug Medicines Consumer Customer