येरकाॅड
आपल्या या अनोख्या मालिकेतून आतापर्यंत दिलेल्या सर्वच पर्यटनस्थळांच्या माहितीचा आपण आस्वाद घेत आहात. तसेच काही वेळा लेख लिहायला वेळ मिळत नाही व एक-दोन दिवस उशीर होतो तर पर्यटकांचे फोन ‘इंडिया दर्पण’च्या कार्यालयात खणखणायला लागतात. असो असेच प्रेम असू द्या. तसेच आमच्याकडे खुप छान छान प्रतिक्रीया येत आहेत. आपणही प्रतिक्रीया पाठवत रहा. त्यामुळे तुमची आवड-निवड मला समजते. त्याप्रमाणे माहिती देण्यासाठीची पर्यटनस्थळे निवडता येतात. कृपया आपला प्रतिसाद असाच असू द्या. आज आपण अशाच एका हटके डेस्टिनेशनवर जाणार आहोत. ते म्हणजे तामिळनाडूतील येरकाॅड तामिळनाडू…
आपल्याला साधारणतः थंड हवेचे ठिकाण किंवा हिलस्टेशन म्हटले की उत्तर भारत डोळ्यासमोर येतो. परंतु आपल्या दक्षिण भारतातही अनेक हिल स्टेशन्स आहेत. त्यातील उटी-कोडाईकॅनाल सारखी काही प्रमुख थंड हवेची ठिकाणे सोडली तर येरकाॅड, वायनाड, कुर्ग इ. भरपूर हिल स्टेशन्स आहेत. पण ती फारशी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे येथे पर्यटकांचा फारसा राबता नसतो. म्हणून आज आपण तामिळनाडूतील अशाच एका हटके हिल स्टेशनला भेट देणार आहोत.
येरकाॅड हे आपल्या देशातील पुर्व घाटातील सर्वरायन पर्वत राजीत वसलेलं छोटसं थंड हवेचे ठिकाण आहे. आजकालच्या डिजीटल माध्यमांमुळे येरकाॅड बद्दल पर्यटकांची उत्सुकता वाढत आहे. तरीही येथे उटी-कोडाई सारखी पर्यटकांची गर्दी नसते. त्यामुळे स्वस्तात मस्त व शांत सहल करायची असेल तर येरकाॅड हा उत्तम पर्याय आहे. दक्षिणेकडील इतर पर्यटनस्थळांपेक्षा तुम्हाला येथे एक वेगळा, शांत व सुखकारक अनुभव येईल हे नक्की.
येरकाॅड येथेही इतर पर्यटनस्थळांप्रमाणे एक मोठा तलाव आहे. या तलावामुळे व या परिसरातील गर्द वनराजीमुळे येथे सदैव हवा थंड असते. येथे पर्यटकांना बोटिंगची सोय उपलब्ध आहे. तसेच या तलावात निसर्ग निर्मित एक बेटही आहे. या बेटावर पर्यटकांना जाता यावे यासाठी एक छानसा पुल बनवला आहे. या बेटावर हरिण, मोर, ससा इ. असे काही प्राणी पाळण्यात आलेले आहे. या तलावाला लागूनच आण्णा पार्क हे प्रशस्त गार्डन बनवले आहे.
येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध जातीची फुलझाडे लावण्यात आलेली आहेत. तसेच येरकाॅड येथील अजून एक प्रमुख आकर्षण म्हणजे सर्वरायन पर्वतावर शेवाराय हे मंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ५३२६ फूट उंचीवर बांधण्यात आले असून या मंदिरात सरवरन व कवरीअम्मा या स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. स्थानिक लोक येथे दरवर्षी मे महिन्यात यात्रेचे आयोजन करतात. या मंदिर मार्गात एक गुहा लागते. त्यास भालू गुंफा असे म्हणतात.
येरकाॅड येथून तीन किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध किलियूर धबधबा आहे. येथे साधारण ३०० फुटावरुन पाणी कोसळते. पाण्याचा प्रवाह जास्त असेल तर काही वेळा या धबधब्यावर जाण्यास मनाई केली जाते.
येरकाॅड येथील लेडीज सीट या पाॅईंटवरुन येरकाॅडचा पुर्ण घाट रोड बघता येतो. असंख्य हेअर पीन सारखी वळणे असलेला हा घाट परिसर म्हणजे येरकाॅडचे एक प्रमुख आकर्षण आहे. येथून सालेम हे शहर तसेच कावेरी नदीवरील मेत्तूर धरण दिसते. येरकाॅड येथील प्रसिद्ध वनस्पती उद्यानात अनेक दुर्मिळ जातीच्या वनस्पती खास जतन करण्यात आलेल्या आहेत. त्या आपणास बघावयास मिळतात. तसेच दर बारा वर्षांनी फुलणारी कुरंजीची झाडेही येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी देशातील तिसरे मोठे आर्केडेरीयम आहे. येथील काही वनस्पती जगात इतरत्र कुठेही आढळत नसल्याने वनस्पतीशास्राचा अभ्यास करणारे लोक येथे येतात. अशा या विविधतेने नटलेल्या व अस्पर्शित निसर्गसौंदर्य लाभलेल्या येरकाॅडला एकदा जायलाच हवे.
केव्हा जावे
येरकाॅड हे थंड हवेचे ठिकाण असल्याने मार्च ते जुन या कालावधीत भर उन्हाळ्यातही येथील हवामान आल्हाददायक असते. पण येथे वर्षभरात केव्हाही गेले तरी चालते.
कसे पोहचाल
येथून तिरुचिरापल्ली हे जवळचे विमानतळ १७५ किमी अंतरावर आहे. तसेच सालेम हे रेल्वे स्टेशनही जवळच ३१ किमीवर आहे. रस्तेमार्गे येरकाॅड हे सालेमला जोडले असल्याने व सालेम हे मोठे शहर असल्याने कुठूनही सहज पोहचता येते.
कुठे रहाल
येरकाॅड परिसरात भरपूर चांगली हाॅटेल्स व होम स्टे आहेत. तसेच सालेम येथून एक दिवसाची येरकाॅडची सहल करता येते. पण येरकाॅडला राहण्यात वेगळी मजा आहे.