येळगिरी (थंड हवेचे ठिकाण)
हटके डेस्टिनेशन या मालिकेतील आतापर्यत दिलेल्या सर्वच पर्यटन स्थळांच्या माहितीचा आपण आस्वाद घेत आहात. गेल्या लेखातील येरकाॅड हे नाव पहिल्यांदाच ऐकले असेही काही वाचकांनी आवर्जून सांगितले. असेच प्रेम असू द्या. तुमच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी गायकाला मिळणार्या टाळ्यांसमान असतात. म्हणून प्रतिक्रीया पाठवत रहा. प्रतिसादामुळेच कशावर लिहायचे ते मला समजते व त्याप्रमाणे माहिती देण्यासाठीची पर्यटन स्थळे निवडता येतात. आज आपण पाहूया अजून एक हटके पर्यटनस्थळ तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाण येळगिरी
गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे पर्यटकांना साधारणतः दक्षिण भारतातील थंड हवेचे ठिकाण किंवा हिलस्टेशन म्हणजे उटी, कोडाई कॅनाल याव्यतिरिक्त फारशी माहिती नसते. पण दक्षिण भारतात पश्चिम व पुर्व घाटांच्या पर्वत श्रृंखलेत अनेक हिल स्टेशन्स आहेत. पण ती फारशी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे येथे पर्यटकांचा फारसा राबता नसतो. म्हणून आज आपण तामिळनाडूतील येळगिरी या अशाच एका हटके हिल स्टेशनला भेट देणार आहोत.
येळगिरी हे तामिळनाडू राज्यातील तिरुपाथूर जिल्ह्यातील एक नयनरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. येळगिरी समुद्रसपाटीपासुन ३ हजार ६४५ फुट उंचीवर वसलेले असल्याने येथे वर्षभर छान प्रदूषणमुक्त हवामान असते. सुरुवातीला येथे फक्त ट्रेकिंगचा आनंद घेणारे ट्रेकर्सच जायचे. पण हळूहळू येथे पर्यटनाच्या सोयी झाल्याने पर्यटकांचे पाय येळगिरीकडे वळायला लागले. अशा रितीने येळगिरी हिलस्टेशन उजेडात आले.
येळगिरी व येरकाॅड हे आपल्या माथेरान व महाबळेश्वर प्रमाणे जवळ जवळ असून दोन्ही ठिकाणचे हवामान, जंगले, पर्यटन स्थळे यात भरपूर साम्य आहे.
येळगिरी येथील पंगनुर सरोवर व नीलावर तलाव हे मानवनिर्मित तलाव आहेत. यात आपण बोटिंगचा आनंद घेऊ शकतो. या तलावांचे वैशिष्ट्य म्हणजे तलावा सभोवताली असलेला डोंगराळ हिरवागार प्रदेश, शांत व निळेशार पाणी यामुळे हा तलावाचा परिसर येळगिरी मधील पर्यटकांचा सर्वात आवडता भाग आहे. येळगिरी सुंदर व आकर्षक धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. यात येळगिरी गावापासून ५ किलोमीटर अंतरावरील जलगमपराय धबधबा अत्यंत मोहक आहे. येळगिरी येथील सर्वाधिक उंचीचे ठिकाण म्हणजे स्वामीमलाई हे ट्रेकर्सचे आवडते शिखर आहे. तसा हा ट्रेक मध्यम स्वरुपाचा असून साधारणपणे कुणालाही करता येईल असा आहे.
येळगिरी येथे बारा एकर जमिनीत छान निसर्ग उद्यान साकारलेले आहे. येथील उद्यानात विविध जातींच्या वनस्पती आहेत. उद्यानात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम धबधबा व संगीत कारंजा बनवला आहे. तसेच येथील निसर्गाने नटलेल्या परिसरात जालगंदिश्वर मंदिर व भगवान मुरुगन यांचे वेल्वन मंदिर ही दोन मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक व स्थानिक नागरिक यांची वर्षभर वर्दळ असते.
येळगिरी येथे पॅराग्लायडींगची सोय असून आकाशात पक्ष्याप्रमाणे उडून हा सर्व हिरवागार डोंगराळ परिसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच इतरही साहसी क्रिडा प्रकार येथे आहेत. येळगिरी येथील स्वच्छ व सुंदर जलाशय, धबधबे, मंदिरे, साहसी क्रिडा व अमर्याद निसर्ग सौंदर्यामुळे येळगिरी हे एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे असे म्हणायला हरकत नाही. चला तर येळगिरी हिल स्टेशनला.
केव्हा जावे
येळगिरी हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे वर्षभरात केव्हाही गेले तरी चालते. पण नोव्हेंबर ते मार्चचा कालावधी सहलीसाठी उत्तम असतो.
कसे पोहचाल
येळगिरी येथून बंगळुरू हे जवळचे विमानतळ १६० किमी अंतरावर आहे. तसेच जोलारपट्टी हे रेल्वे स्टेशनही जवळच २० किमी वर आहे. रस्तेमार्गे येळगिरी येथे कुठूनही सहज पोहचता येते.
कुठे रहाल
येळगिरी परिसरात भरपूर चांगली हाॅटेल्स व चहाच्या मळ्यातील सुंदर छोटे छोटे होम स्टे आहेत.
खरेदी
येळगिरी परिसरातील मध अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच घरगुती चाॅकलेटसही येथे छान मिळतात.