वेल्लोर (दक्षिण भारताचे सुवर्ण मंदिर)
हटके पर्यटन स्थळांची माहिती देणार्या या लेख मालिकेत आपण आज भेट देणार आहोत दक्षिण भारतातील वेल्लोरच्या सुवर्ण मंदिराला. ते नक्की कुठे आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, तिथे केव्हा आणि कसे जायचे याची इत्थंभूत माहिती आपण आज जाणू घेऊ..
आपल्या देशात सुवर्ण मंदिर म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते अमृतसरचे सुवर्ण मंदिर. पण आता दक्षिण भारतात देखील तामिळनाडू राज्यात वेल्लोर जिल्ह्यातील श्रीपुरम येथे हे अत्यंत देखणे असे सुवर्ण मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना शक्तिअम्मा या साधु पुरुषाने अगदी अलिकडे म्हणजे सन २००७ मध्ये केली आहे. पायापासून तर कळसापर्यंत सुवर्णाने मढवलेल्या या मंदिराच्या उभारणीस साधारण सात वर्षांचा कालावधी लागला. सुमारे ८०० कुशल कारागिरांनी सात वर्षे अहोरात्र मेहनत घेऊन हे मंदिर पुर्णत्वास आणले.
वेल्लोर जवळील मलाईकोडी पर्वतांच्या कुशीत साधारणपणे १०१ एकरांपेक्षाही जास्त परिसरात हे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची व एकूणच मंदिर परिसराची रचना अत्यंत आखीव-रेखीव पद्धतीने केलेली आहे. मूळ मंदिर हे सहा टोकांच्या चांदणीच्या आकारातील जमिनीवर उभारले आहे. यास श्रीचक्र असे म्हणतात. या मंदिराच्या उभारणीस सुमारे १५०० किलो सोने वापरण्यात आलेले आहे. मंदिराच्या सर्व बाजूंना असलेल्या या सहा कोनांच्या आकाराचे कृत्रिम सरोवर बनवले असून यात पाणी साचवलेले आहे. या सरोवरातील पाणी हे देशभरातील सर्व प्रमुख नद्यांमधून थोडे थोडे आणलेले आहे. या सरोवरामुळे तयार झालेल्या स्टार आकृतीच्या आकारात मूळ मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासभोवताली छान हिरवळ तयार करण्यात आलेली आहे. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मंदिर आकर्षक बनले आहे. हे मंदिर दिवसा सुर्य प्रकाशात चकाकते तर रात्रीच्या वेळी येथे केलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण विद्युत रोषणाईमुळे. नेहमीच या मंदिराचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसते.
हे मंदिर महालक्ष्मी नारायणी देवीस समर्पित आहे. या मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती ७० किलो सोन्यापासून घडवलेली आहे. दररोज पहाटे चार ते सकाळी आठ या कालावधीत मूर्तीची पुजा आणि अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते. महत्वाचे म्हणजे या मंदिरात मूर्ती पर्यंत जाण्याची तसेच अभिषेक करण्याची भाविकांना मुभा आहे. दररोज किमान २० ते २५ हजार भाविक या मंदिरास भेट देतात.
मंदिर परिसरात कासवाच्या पाठीवरील १००८ दिव्यांची दिपमाळ, तसेच माॅं दुर्गा, माॅं सरस्वती, माॅं लक्ष्मी यांच्या मुर्ती, चांदीची गाय, गोशाळा, सुमारे २० हजार नैसर्गिक व औषधी वनस्पती असलेला विस्तीर्ण बगीचा अशी अनेक आकर्षणे आहेत. त्यामुळे पर्यटक आणि भाविकांचा ओढा वेल्लोरकडे असतोच. काही ठराविक दिवशी तर लाखभर पर्यटक येथे हजेरी लावतात. मंदिर प्रशासनातर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. अशा या दक्षिण भारतातील सुवर्ण मंदिरास भेट द्यायला आपणास नक्कीच आवडेल.
केव्हा जावे
या मंदिरास आपण वर्षभर केव्हाही भेट देऊ शकतो. परंतु स्थानिकांची गर्दी असलेल्या ठराविक यात्रेच्या तारखा टाळाव्यात. हवामानाच्या दृष्टीने ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ योग्य.
पोषाख
कुठलाही अंगभर पोषाख चालतो.
कसे पोहचाल
वेल्लोरला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ चेन्नई हे १७५ तर तिरुपती हे १२० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच काटपाडी हे रेल्वे स्टेशन फक्त सात किमी अंतरावर आहे. रस्तेमार्ग वेल्लोर सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.
कुठे रहाल
वेल्लोर येथे सर्व प्रकारची व सर्व दराची अनेक हाॅटेल्स उपलब्ध आहेत.