व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अर्थात इंद्राचे उपवन
भारतातील वैशिष्ट्यपूर्ण अशा पर्यटनस्थळांची ओळख करुन देणाऱ्या या मालिकेत आपण आजवर निसर्ग, पर्वत, मंदिरे, राजवाडे, सागर किनारे, अभयारण्ये, बर्फाच्छादित प्रदेश अशी जवळपास सर्व प्रकारांची माहिती घेतली. परंतु आपला देश इतका वैविध्यपूर्ण आहे की आपल्याकडे पर्यटकांना हवे असलेले सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. म्हणून आज आपण एका वेगळ्या पर्यटनस्थळाला भेट देणार आहोत, जेथे तुंम्हाला निसर्ग निर्मित शेकडो फुलांनी भरलेली पूर्ण दरी पहावयास मिळेल. या ठिकाणाचे नाव आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अर्थात इंद्राचे उपवन….

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
उत्तराखंड राज्यातील गढवाल भागात चमोली जिल्ह्यात ही जगप्रसिद्ध दरी आहे. याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अथवा झुंडार घाटी असेही म्हणतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हा एक नैसर्गिक चमत्कार असून दरवर्षी या ठिकाणी देश-विदेशातील हजारो पर्यटक व यासंदर्भात विशेष आवड असलेले संशोधक भेट देत असतात. उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून आपण जेव्हा चारधाम यात्रेतील प्रसिद्ध बद्रीनाथ धामकडे जातो, तेव्हा रस्त्यात जोशीमठ नंतर गोविंदघाट नावाचे छोटेसे गाव लागते. तेथे आपली वाहने पार्क करुन पुढे पायी घोडा, डोली मार्गाने आपण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स येथे पोहचू शकतो. येथून जवळच शिख धर्मियांचे पवित्र गुरुद्वारा हेमकुंड साहिब देखील आहे. तेथेही आपण जाऊ शकतो.
व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स हे ठिकाण हिमालयाच्या झांन्सकर पर्वत रांगेत सुमारे ६ हजार ७१९ मीटर उंचीवर वसलेले आहे. अति उंचीवरील ठिकाण असल्याने येथे साधारणपणे ८/९ महिने बर्फ तर उर्वरीत महिने विविध रंगाचे व लहान-मोठ्या आकारातील फुलांचा दरवळ असतो.
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या जागेचा शोध ब्रिटिश गिर्यारोहक फ्रॅंक स्मिथ यांनी लावला असला तरी आपल्या पौराणिक ग्रंथातही या दरीचा उल्लेख आढळून येतो. तसेच रामायणात लक्ष्मण मुर्छित झाल्यावर संजीवनी बुटी याच ठिकाणावरुन आणली असे म्हणतात. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने या दरीला खरी ओळख दिली ती स्थिम यांनीच हे आपल्याला मान्य करावे लागेल.

सन १९३१ मध्ये फ्रॅंक व त्याचा सहकारी होल्डवर्थ हे गढवाल मधील कोमेट शिखर सर करुन परत येत असतांना ते वाट चुकले आणि या दरीत पोहचले. येथील फुलांचे विविध प्रकार बघून ते अचंबित झाले. त्यांनी काही दिवस तंबू टाकून येथेच मुक्काम ठोकला. येथे त्यांनी काही फुलांचे नमुने गोळा केले. यातील अनेक फुले जगाला प्रथमच माहित झाली.
फ्रॅंक यांनी सन १९३७ मध्ये या व्हॅलीला परत भेट दिली. “व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स” हे पुस्तक प्रकाशित करुन जगाला या अदभूत निसर्ग निर्मित पर्यटन स्थळाची माहिती करुन दिली. यानंतर खर्या अर्थाने व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स येथे पर्यटकांचा ओघ वाढला. यानंतर शासनाने १९८० मध्ये येथे नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली. १९८२ मध्ये या व्हॅली ऑफ फ्लाॅवर्सची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झाली आहे.
व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स व नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाचा साधारण ८७.५ चौरस किलोमीटरचा परिसर शासनाने संरक्षित म्हणून घोषित केलेला आहे. या निसर्ग निर्मित दरीची तुलना जगातील कुठल्याही राष्ट्रीय पार्कशी होऊ शकत नाही. कारण येथे भेट देणार्या अभ्यासकांच्या मते या ठिकाणी किमान ५८५ प्रकारची फुले आढळून आलेली आहेत. यातील काही जातीची फुले केवळ याच ठिकाणी आढळतात, हे विशेष आहे.

येथे वर्षातील नऊ महिने बर्फ असल्याने फुलांना बहरण्यास केवळ तीनच महिन्यांचा कालावधी मिळतो. जो काही काळ फुलांना फुलण्यास मिळतो त्या अल्पावधीत फुले पुर्ण क्षमतेने फुलतात असे येथे भेट देणार्या तज्ञांचे मत आहे. या दरीची रुंदी अर्धा किलोमीटर असून लांबी तीन किलोमीटर इतकी आहे. या परिसरातून लक्ष्मणगंगा ही नदी वाहते जी पुढे अलकनंदा नदीस मिळते.
हा संपुर्ण परिसर हिमालयातील जीवांच्या संवर्धनासाठी महत्वाचा आहे. येथील अनेक प्रजातींच्या फळा-फुलांसोबतच अतिशय दुर्मिळ असे सस्तन प्राणी आढळतात. यात हिमालयीन थार, हिम बिबटे (स्नोलेपर्ड), कस्तुरी मृग, हिमालयीन अस्वल, मोनल, सोनेरी गरुड इ. असे दुर्मिळ प्राणी व पक्षी येथे आहेत. चला तर मग अशा या अचंबित करणार्या जागेवर कसे पोहाचायचे, प्रवेश फी, कुठे रहायचे याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
प्रवेश फी
१५०/- रुपये प्रत्येकी
दंड
फुलों की घाटीचा परिसर संरक्षित असल्याने येथील फुले तोडल्यास दहा हजार रुपयांचा दंड केला जातो. तसेच येथे प्लास्टिक कॅरीबॅग व पॅकेटस घेऊन जाण्याची मनाई आहे.










